Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सेलू तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
परभणी, ४ जुलै/वार्ताहर

जून कोरडा गेला. जुलै सुरू झाला तरी अद्यापि पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे

 

आकाशाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा भयानक स्थितीत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सेलू तालुका शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
जून महिन्यात सेलू तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. यावर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून खरीप पेरणी केली; परंतु त्यानंतर पाऊस न झाल्याने ही पेरणी वाया गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचीही वानवा जाणवत आहे.
दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी करण्याची ऐपत राहिली नाही. यात आघाडी सरकारने २० हजार रुपयांची कर्जमाफी देताना रक्कम भरण्याची अट घातल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्याकडील चालू असलेली कर्जवसुली थांबवावी, जनावरांसाठी चारा डेपो व छावणीची व्यवस्था करावी, दुबार पेरणीसाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावेत, ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, गेल्या वर्षीच्या पीकविम्याची रक्कम वाटप करावी व सेलू तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्या सेलू तालुका सेनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास ८ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तालुकाप्रमुख अशोक काकडे यांनी दिला आहे.