Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कागदोपत्री पुरावे देऊनही गुन्ह्य़ाच्या तपासात वजिराबाद पोलिसांची चालढकल
नांदेड, ४ जुलै/वार्ताहर

फसवणूक प्रकरणात दोन वर्षापूर्वी दाखल झालेल्या एका गुन्ह्य़ात कागदोपत्री पुरावे देऊनही

 

वजिराबाद पोलिसांनी राजकीय दबावामुळे या गुन्ह्य़ाचा तपास करण्यास चालढकल सुरू केली आहे.
देगलूर नाका परिसरातल्या वॉर्ड क्र. ४० (देवीनगर) मधून निवडून आलेले नगरसेवक रहीम अहेमद खान मसूर अहेमद खान यांनी जुलाहा जातीचे बनावट प्रमाणपत्र लावून निवडणूक लढविल्याची तक्रार जाफर अलीखान पठाण यांनी केली होती. १ ऑक्टोबर २००७ ला पठाण यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सर्व कायद्याचा अभ्यास करून ११ ऑक्टोबरला रहीम अहेमद खान याच्याविरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे आदी आरोपांवरून गुन्हा दाखल केला. निवडणूक लढविताना रहीम अहेमद खान यांनी जोडलेले जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे नांदेड तहसीलदारांनी लेखी कळविले आहे. तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी करून तसेच बनावट शिक्का तयार करून हे प्रमाणपत्र वापरण्यात आले. शिवाय शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रही खोटे असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे.
स्वत:च्या स्वार्थासाठी तहसीलदारांच्या खोटय़ा स्वाक्षऱ्या करणे किंवा तहसील कार्यालयाचे खोटे शिक्के तयार करणे असे प्रकार रहीमखान यांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला खरा; परंतु या प्रकरणाचा तपास अजूनही जैसे थे अवस्थेत आहे. पोलिसांनी तहसील कार्यालयाकडे या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली. तहसील कार्यालयाने पोलिसांना हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे कळविले आहे. असे असले तरी राजकीय दबावामुळे पोलीस तपास करण्यास चालढकल करीत असल्याची भावना पठाण यांची झाली आहे.
एखाद्या प्रकरणात कागदोपत्री पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करावेत, असे संकेत आहेत. परंतु वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना पाठबळ देण्यातच धन्यता मानली आहे. जात पडताळणी समितीसमोर रहीमखान यांनी दाखल केलेली कागदपत्रे बनावट आहेत. वंशावळीचा उल्लेख करताना त्यांनी काही नातेवाईकांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले; परंतु नागसेन विद्यालय जांब यासह अनेक शाळा बंद आहेत, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी कळविले आहे. कागदोपत्री पुरावे देऊनही राजकीय दबावाला बळी पडत वजिराबाद पोलीस कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. पठाण यांनी काही दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीसप्रमुख शहाजी उमाप यांची भेट घेतली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उमाप यांनी या संपूर्ण प्रकरणाची संचिका कायदेतज्ज्ञांकडे पाठविली.
कायदेतज्ज्ञांनीही हे प्रकरण गंभीर असून तात्काळ कारवाई करावी, असे सुचविले. याउपरही वजिराबाद पोलिसांनी याबाबत कोणतीही हालचाल केली नाही तसेच तपास पुढे जाणार नाही, याचीच दक्षता घेतली, असा आरोप पठाण यांनी केला आहे. नांदेड-वाघाळा मनपाच्या स्थायी समितीचे सभापती मसूदखान यांचे रहीमखान चिरंजीव असल्याने वजिराबाद पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ चालवीत असल्याचा आरोप पठाण यांनी केला. जे खरोखर जातीचे आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यास खेटे मारायला लावणाऱ्या जात पडताळणी समितीने रहीमखान यांच्याबाबतीत दाखविलेल्या औदार्याबद्दल पठाण यांनी आश्चर्य व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणात रहीमखान यांच्यासोबत जात पडताळणीचे अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. रहीमखान यांना ५ मार्च २००८ ला औरंगाबाद विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातीचे वैध प्रमाणपत्र बहाल केले आहे, हे विशेष!