Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

लोहा तालुक्यात ११ हजार कुटुंबांना स्मार्टकार्ड
लोहा, ४ जुलै/वार्ताहर

दारिद्रयरेषेखालील, असंघटित क्षेत्रातील कामगार व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचा राष्ट्रीय स्वास्थ्य

 

बीमा योजनेंतर्गत बीमा काढण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक स्मार्टकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यात ११४२४ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून तीस हजार रुपयांपर्यंत नि:शुल्क शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने दारिद्रयरेषेखालील कुटुंबाकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना सुरू केली आहे. जिल्ह्य़ात लव्हेकर हॉस्पिटल, तोष्णीवाल हॉस्पिटल, लोक हॉस्पिटल तर यवतमाळ जिल्ह्य़ातील तीन रुग्णालय या योजनेंतर्गत आहे. लोहा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतीअंतर्गत ११४२४ कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. उमर (२७०), शेलवाडी (२२७), बेरळी (२०१), बेनूर (२१४), हडोळी (२१७), माळाकोळी (२६३), आष्टूर (२२५), रिसनगाव (२९९), सावरगाव (३८३), कलंबर (खु.) (३४९), सोनखेड (२६७) या गावात दोनशेपेक्षा अधिक कुटुंब पात्र आहेत.
तहसीलदार संतोष गोरड यांनी स्मार्टकार्डसाठी त्या-त्या भागातील तलाठी, ग्रामसेवकांना गावात उपस्थित राहून लाभार्थ्यांचे कार्ड देण्यासाठी सूचना दिल्या तर लोहा तालुक्यातील सर्व दारिद्रयरेषेखालील पात्र कुटुंबीयांनी आपले स्मार्टकार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभाती रुस्तुम धुळगंडे, आदींनी केले आहे.