Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

डिकसळ येथे गुरुपौर्णिमा व गोपाळ काला महोत्सव
कळंब, ४ जुलै/वार्ताहर

भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुशिवाय शिष्याचे कुठलेही स्वप्न पूर्ण

 

होत नाही. गुरुंना आदराचे स्थान असते. परंतु आता सध्याच्या गुरुंना आदर्श मानावे की नाही, याबद्दल न बोललेले बरे, राजकारणात तर गुरुची विद्या गुरुलाच शिकविण्याचे धाडस शिष्य करत आहे. त्यामुळे गुरुंची महती कमी होऊ लागली आहे. गुरु आणि शिष्याच्या पवित्र्य नात्याला कलियुगामध्ये किंमत राहिलेली नसल्याने आर्थिक निकषावर हे नाते जोडले जाऊ लागले आहे.
जीवनाची कृतार्थता होण्यासाठी गुरुंची सेवा व उपदेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भगवान रामचंद्र व श्रीकृष्ण यांनाही गुरु अनुग्रह घेतल्याची उदाहरणे आहेत. सकळ देवाचे दैवत। सदगुरु नाथ एकला। कृष्ण गुरु सांधी पाणी। पूर्ण ब्रह्म दाविले।। राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ट मुनी तारक या परंपरेला अनुसरून संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, संत निलोबारायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रत्यक्ष पांडुरंगाने अनुग्रह दिलेले संत शिवाजी व संत माणकोजी बोधले महाराजांची परंपरा गेली दहा पिढय़ांपासून गुरु अनुग्रह देऊन भक्ती, ज्ञानाची परंपरा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर चालवत आहेत. कळंबपासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र डिकसळ येथील गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराजांची समाधी आहे. याला धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. प्रकाश महाराज बोधले यांनी बोधले घराण्याची परंपरा व सद्गुरुच्या आदेशाने चांगल्या रितीने गुरुगादीची परंपरा चालविली असून शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिला आहे.
भरकटलेल्या व्यक्तींना पुन्हा जागेवर आणण्यासाठी गुरुंची आवश्यकता असते. गुरुंचा उपदेश महत्त्वाचा असतो. इतर क्षेत्रातील गुरु आणि धार्मिक क्षेत्रातील गुरु यांच्यात अंतर असल्याने धार्मिक गुरुंना सध्या तरी आदराचे स्थान आहे. शिष्यासाठी गुरुपौर्णिमा महत्त्वाची असते. या दिवशी शिष्याला आपल्या गुरुंच्या भेटीची आस लागलेली असते. या दिवशी डिकसळ येथे गुरुपौर्णिमा व गोपाळ काला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्ती गार्डन’मध्ये शिष्यांना गुरुसंदेशही देण्यात येणार असून सर्व क्षेत्रातील तरुणांनी उपस्थित राहिल्यास गुरुंचे महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही.