Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तीला दोन लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

अपघातात अपंगत्व आलेले कारभारी जगन्नाथ पाचे यांना जीपमालक, चालक आणि विमा कंपनी

 

यांनी संयुक्तरित्या दोन लाख १५ हजार ७२० रु. नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, असा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे अध्यक्ष यु. के. हनवते यांनी दिले आहेत.
कारभारी जगन्नाथ पाचे हे आढळू येथे स्वत:च्या सायकलवर घराकडून शेताकडे जात होते. ते कल्याण वाघ यांच्या शेताजवळ पोहोचले असता औरंगाबादहून भरधाव वेगाने टाटा सुमो आली आणि या गाडीने कारभारी यांना धडक दिली. त्यामुळे ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या अपघातात कारभारी यांचे पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना कायमस्वरूपी २२ टक्के अपंगत्व आले. पाचोड पोलीस ठाण्यात टाटा सुमोच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आला. हा अपघात टाटा सुमोचालकाच्या चुकीमुळे झाला आहे. त्यात अर्जदाराची कोणतीही चूक नव्हती. हा अपघात होण्यापूर्वी ते शेती व दुग्धव्यवसाय करीत होते.
या अपघातात २२ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने त्यांच्याकडून आता शेतीत काम करणे होत नाही तसेच दुग्धव्यवसायही केला जात नाही. त्यांचे कायमचे उत्पन्न बुडाले आहे. वादी आणि प्रतिवादीचे म्हणणे ऐकून न्यायालयाने अर्जदाराला दोन लाख १५ हजार ७२० रु. साडेसात टक्के व्याजाने द्यावेत, असा आदेश दिला. या प्रकरणात अर्जदारातर्फे आर. के. ढगे-पाटील यांनी काम पाहिले.