Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका अधिकाऱ्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी निदर्शने
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

वानखेडेनगर येथील पथदिव्याच्या खांबामध्ये विद्युतप्रवाह उतरून झालेल्या अपघातात

 

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे गुन्हे मागे घेण्यासाठी महानगरपालिका अधिकारी संघटनेच्या वतीने शनिवारी निदर्शने करण्यात आली.
वानखेडेनगर येथील महानगरपालिकेच्या पथदिव्याच्या खांबामध्ये वीज प्रवाह आल्याने पावणेतीन वर्षाचा अनिकेत संजय सोनवणे हा खांबाला चिकटून मरण पावला. वानखेडेनगरवासीयांनी आणि मुलाच्या वडिलांनी महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असा अर्ज केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही शहनिशा न करता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. याचा निषेध अधिकारी संघटनेने केला आहे.
विद्युत खांब बसविण्याचे काम दीड वर्षापूर्वी झालेल आहे. नियमानुसार या घटनेबाबत विद्युत निरीक्षक, उद्योग कामगार विभाग यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. या ठिकाणी नळाचे खोदकाम करण्यात आले. केबल ज्या ठिकाणाहून गेलेली आहे, तेथे हे खोदकाम करण्यात आले. केबलच्या लाल वायरचे इन्सुलेशन कट होऊन लोखंडी आवरणाला स्पर्श झाल्यामुळे केबल विद्युतवाहिनी प्रवाहित झाली, त्यामुळे ही घटना घडली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी या घटनेस जबाबदार नसताना पोलिसांनी विनाचौकशी कारवाई करून अटक केली. ही बाब गैरकायदेशीर असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करतात यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यापूर्वी तसेच फौजदारी गुन्हा नोंदविण्यापूर्वी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध घडलेल्या वस्तुस्थितीबाबत खातरजमा करून घेणे आवश्यक आहे, असे आदेश राज्यसरकारच्या गृहविभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहे.
हे आदेश डावलून पोलिसांनी अधिकाऱ्यास अटक केली, त्याचा आम्ही निषेध करतो. या अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अशी मागणीही अधिकारी संघटनेने केली आहे. या निदर्शनामध्ये सर्व अधिकारी सहभागी झाले होते.