Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांसह तिघांना लुटले ; दुचाकीस्वार चोरटय़ांची दहशत
औरंगाबाद, ४ जुलै/प्रतिनिधी

दुचाकीवरून ते येतात आणि लुटून पळ काढतात, अशा घटनांमुळे औरंगाबादकरांच्या मनात दहशत

 

निर्माण झाली आहे. काल रात्री तीन घटनांत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन महिला आणि एका रिक्षाचालकाला लुटले. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नातेवाइकाकडे रुग्णालयात जात असताना एका महिलेला रस्त्यावर अडवून दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास माणिक रुग्णालयाजवळ घडली. शाहिना इम्तियाझ भट (वय ३६, रा. मिलकॉर्नर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.माणिक रिक्षातून उतरत असतानाच अल्ताफ आणि त्याचा एक साथीदार तेथे आला. त्यांनी शाहिना यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी काढून घेतली. त्यांच्या पाठीवर चाकूचा वार केला आणि दोघेही पळून गेले.
घराकडे पायी जाणाऱ्या ६२ वर्षाच्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी पळविले. वेदिका नरेंद्र वैद्य (रा. शिवदत्त गृहनिर्माण संस्था) या ओंकार गॅस एजन्सीतून घराकडे परतत होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवून पसार झाले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री बारा वाजता बसस्थानकाकडे रिक्षा घेऊन जाणाऱ्यास दोघांनी दुचाकी आडवी करून धमकी देऊन लुटले. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. जावेदखान गुलाबखान या रिक्षाचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एक हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख ३२० रुपये चोरले.