Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद पालिकेची बदनामी ‘आयएएस’ लॉबीमुळे - वैद्य
औरंगाबाद, ४ जुलै/प्रतिनिधी

औरंगाबाद पालिकेत चांगले अधिकारी आहेत. मला त्यांच्याकडून अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद

 

मिळाला. आयएएस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत असताना या पालिकेचा उल्लेख वाईट असाच करण्यात येतो. प्रत्यक्षात तसे चित्र नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या त्या बोलण्यामुळेच औरंगाबाद पालिका बदनाम झाली आहे, असे गुपीत मावळते आयुक्त वसंत वैद्य यांनी आज पत्रकारांसमोर जाहीर केले.
अवघ्या तीनच महिन्यांत वैद्य यांची येथून बदली झाली आहे. काल त्यांच्या बदलीचे आदेश निर्गमीत झाले होते. आज सायंकाळी त्यांनी पदभार सोडला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
येथील अधिकारी खूपच चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी दिले. येथील अधिकारीही चांगले आहेत. नगरसेवकही सहकार्य करतात. तरीही औरंगाबाद पालिका बदनाम का आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता ‘प्रत्यक्षात तसे चित्र नाही. फक्त आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तशी चर्चा होत असल्यामुळेच ही प्रतिमा निर्माण झाली आहे.’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
अन्य कामांकडे लक्ष देणे गरजेचे असले तरी समांतर वाहिनीसाठी पाठपुरावा करणे हे प्रश्नधान्याचे काम असल्याचे ते म्हणाले. येथील तीन महिन्यांच्या कामाबद्दल वैद्य यांनी समाधान व्यक्त केले. अधिकाऱ्यांच्या वतीने रात्री त्यांना निरोप देण्यात आला.