Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र बालाजी गंगाधर चिंतलवार यांना देण्याचा आदेश मुंबई उच्च

 

न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. व्ही. हरदास व न्या. आर. के. देशपांडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे.
देगलूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी बालाजी चिंतलवार यांचे कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. या निर्णयाला बालाजी चिंतलवार यांनी आव्हान दिले.
याचिकाकर्ते हे मूळचे देगलूर तालुक्यातील भक्तापूरचे रहिवासी. त्यांच्या व घरातील अन्य सदस्यांच्या शालेय पुराव्यावर कोळी महादेव असाच उल्लेख आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांनीही हेच प्रमाणपत्र दिले आहे. मंडल निरीक्षकांच्या अहवालातही अर्जदार कोळी महादेव या जमातीचे असल्याची नोंद आहे.
अर्जदारांच्या वडिलांना संबंधित अधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. असे असतानाही जमातीचे प्रमाणपत्र नाकारले. या निर्णयाविरोधात समितीकडे अपील करण्यात आले. समितीनेही कुठल्याही पुराव्याचा विचार न करता अपील फेटाळून लावले.
न्या. हरदास व न्या. देशपांडे यांनी उपविभागीय अधिकारी व अनुसूचित जमाती समिती यांचे आदेश रद्दबातल करून अर्जदार बालाजी चिंतलवार यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असा आदेश दिला.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रताप जाधवर, सरकारतर्फे एस. के. कदम आणि समितीतर्फे महेश देशमुख यांनी काम पाहिले.