Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भटक्या समाजातील ‘जोशीं’ चे भविष्य अंधारातच
कळंब, ४ जुलै/वार्ताहर

कोणत्याही माणसाला भविष्य पाहण्याची मोठी हौस असते. भविष्य पाहणारी मंडळी ही पोपटपंची

 

असतात. नाव, रास, गाव, जन्मतारीख, हस्तरेषा पाहून उर्वरित आयुष्य व गेलेले आयुष्याबद्दल अचूक माहिती देऊन पुढच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करतात. भविष्य पाहणारी मंडळी ही अशिक्षित असतानाही केवळ अभ्यासाच्या जोरावर भविष्य सांगतात. समोरच्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव आम्हाला ताकद देऊन जातात. शासन मात्र आमच्याकडे पाठ फिरवीत असल्याने आम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याची खंत भविष्यकार शिवाजी कानडे यांनी व्यक्त केली.
जन्मनाव काय? ग्यानदेव.. तुमची रास तूळ. तुम्ही ज्या कामात हात घालता ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुमच्यावर जादूटोणा चालत नाही. राजकारणात यश आहे. मुलगा परदेशवारी करणार आहे. मुलीला चांगले स्थळ मिळणार आहे. घरात नवरा-बायकोची सतत भांडणे होतात. समाधान नाही. गुरुवार, शनिवार करा. धंद्यात यश येईल. प्रेमप्रकरणातही यश आहे. सासुरवाडीचे धन मिळेल. तुम्ही धाडसी आहात. राग येत नाही. येणारा काळ हा उज्ज्वल आहे.. असे एक ना अनेक समस्यांचे निराकरण करणारी, समाधानकारक उत्तरे देणारी ही भविष्य सांगणारी मंडळी अशिक्षित असतानाही केवळ अंकगणित व हस्तरेषा, चेहरा पाहून भविष्य वर्तवितात. बीड जिल्ह्य़ात ही मंडळी मोठय़ा संख्येने आहेत. सध्या आषाढी वारीमुळे त्यांचाही धंदा तेजीत असून देईल त्यात ते समाधान मानतात. शिवाजी कानडे हे लहानपणापासूनच भविष्य सांगतात. त्यांचा हा परंपरागत व्यवसाय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मोठमोठय़ा माणसांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचे सांगून ते पुढच्या व्यक्तीवर छाप पाडतात.
सर्व जाती-जमातीचे रितीरिवाज त्यांना पाठ असतात. समोरच्या माणसांचे समाधान करून वेळप्रसंगी उपयुक्त सल्ला देणे आणि त्यांच्या आयुष्यातले मानसिक गुंते सोडविण्याचा प्रयत्न करणे असा एकंदरित नित्यपाठ असतो. दुसऱ्याचे भविष्य सांगून त्यांना पाठबळ देण्याचे काम ही मंडळ करतात; परंतु त्यांचेच भविष्य मात्र अंध:कारमय असून शासन दरबारी भटके-विमुक्त म्हणून यांची नोंद असतानाही यांच्या झोपडय़ांपर्यंत शासनाच्या योजना आल्या नसल्याची खंत शिवाजीराव कानडे यांनी व्यक्त केली. आमचे वाटोळे झाले.
यापुढे तरी आमची मुले शिकली पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.समोरच्या व्यक्तीचे जन्मगाव, जन्मतारीख विचारून कॅलक्युलेटरवर बेरीज, गुणाकार करीत आयुष्य कंठणाऱ्या मेंढगी जोशी या भटक्या जातीचे भवितव्य मात्र वजाबाकीत आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागणाऱ्या या समाजाला शासन कितपत भवितव्याचा वेध घेण्यास संधी देतो, यावर सर्व अवलंबून आहे.