Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘महावितरण आपल्या दारी’ मोहीम सुरू
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

नवीन वीजग्राहकांच्या वीजजोडणी घेण्यातील अडचणी लक्षात घेता स्वत:च त्यांच्यापर्यंत पोहोचून

 

त्यांना वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या लातूर परिमंडळाने सुरू केलेल्या महावितरण आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ लातूरजवळील पाखरसांगवी येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे होते.
यावेळी श्री. मुंडे म्हणाले, महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीजजोडणी घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे असे सुमारे २५ ते ३० टक्के ग्राहक अनधिकृत वीज वापरतात. त्यांना जागेवरच वीजजोडणी मिळाल्यास ते असे करणार नाहीत. म्हणून नवीन वीजग्राहकांच्या सोयीसाठी ‘महावितरण आपल्या दारी, वीजजोडणी घरोघरी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महावितरणचे कर्मचारी गावागावांत जाऊन गरजू ग्राहकांचे अर्ज घेणे, पैसे भरण्यासाठी कोटेशन देणे व वीजजोडण्या देणे अशी कामे करणार आहेत. या उपक्रमास प्रतिसाद देऊन सर्वानी मीटर घेऊन प्रश्नमाणिकपणे वीज वापर करावा. मागासवर्गीय ग्राहकांना ६२५ रुपयांत, सर्वसामान्य ग्राहकांना ११२५ रुपयांत व दारिद्रयरेषेखालील ग्राहकांना राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेखाली फक्त १५ रुपयांत वीजजोडणी दिली जाते. यापेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास त्वरित महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेतील १३ लाभधारकांना व इतर १७ वीजग्राहकांना वीजमीटर देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पाखरसांगवी, खाडगाव व गंगापूर गावातील नागरिकांनी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. याच वेळी नवीन वीजग्राहकांचे अर्ज स्वीकारून त्यांना पैसे भरण्यासाठी कोटेशन दिले व पैसे भरून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता मदन शेवाळे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता डी. डी. हामंद यांनी मानले.