Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विधानसभेची चाचपणी
नांदेड, ४ जुलै/वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत

 

आहे. ही निवडणूक विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारांच्या बैठका घेऊन उमेदवार चाचपणी व मतदारांचे गणित मांडत आहेत.
माजी खासदार गंगाधारराव कुंटूर यांची एकहाती सत्ता असलेल्या कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुंटूरकरांचे पुत्र राजेश कुंटूरकर हे सभापती आहेत. ते आशिया खंडातील सर्वात मोठय़ा असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून मोठय़ा मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळेही या बाजार समितीला नांदेड जिल्ह्य़ात अधिक महत्त्व आहे. तरी आर्थिक व्यवहारात ही कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समिती कमकुवत आहे.
कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ३७ सेवा सहकारी सोसायटय़ा तर ४१ ग्रामपंचायती आहेत. सोसायटी मतदारसंघात ३९१ मतदार तर ग्रामपंचायत मतदारसंघात ३५५ मतदार आहेत. व्यापारी मतदारसंघात १८० तर हमाल मापाडीत १७ मतदार आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ७ जुलै तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २१ व २२ जुलै आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास ९ ऑगस्टला मतदान व १० ऑगस्टला निकाल हाती येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज व माघार घ्यायचे अर्ज आणले आहेत. सर्वचजण या निवडणुकीत आपापल्या परीने सक्षम उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. यात कोणत्या पक्षाचे किती मतदार, कोण कोणासोबत युती करणार याचा अंदाज सध्यातरी बांधणे अवघड असून ही निवडणूक यावेळी बिनविरोध होणार नाही, अशीच एकंदरित परिस्थिती कुंटूर भागात पाहायला मिळत आहे.