Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बोरीतील पोलीस वसाहत ओसच
बोरी, ४ जुलै/वार्ताहर

गेल्या वर्षी लाखो रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आलेली बोरी येथील पोलीस वसाहत आज ओस

 

पडली आहे. २६ पैकी केवळ एकच कर्मचारी या वसाहतीत राहत आहे.
बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत ६८ गावे असून बोरी, कौसडी व आसेगाव असे तीन बीट तयार करण्यात आले आहेत. या ६८ गावांचे संरक्षण करण्यासाठी केवळ २६ कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी येथे पोलीस वसाहत फार पूर्वीपासून आहे. पाच-सहा वर्षाअगोदर या वसाहतीतील संपूर्ण म्हणजे १६ क्वॉर्टरमध्ये कर्मचारी राहत होते.
परंतु आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एक-एक करत सर्वानीच क्वॉर्टर सोडले व जिंतूर-परभणीहून ये-जा करत आहेत. पाच वर्षापासून १६ पैकी पाच कर्मचारी वसाहतीत राहत होते. त्यापैकी तिघांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांनी क्वॉर्टर रिकामे केले तर एकजणाने मुलाच्या शिक्षणासाठी घर परभणीला हलवले आहे. आज या वसाहतीची पाहणी केली असता फक्त एकच कर्मचारी या ठिकाणी राहत असल्याचे निदर्शनाआले. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून वसाहतीची दुरुस्ती केली. तसेच वसाहतीच्या मोकळ्या जागेत झाडेझुडपे वाढल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत होता म्हणून काही दिवसांपूर्वी सहायक पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी जे.सी.बी.च्या साह्य़ाने सर्व झाडे-झुडपे काढून मैदान स्वच्छ केले. परंतु आज तिथे कुणी राहतच नसल्याने त्यांनी केलेले काम व्यर्थच गेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच सकाळी पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे यांनी बोरी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. ठाण्याकडे जात असताना त्यांनी ओस पडलेली पोलीस वसाहत पाहिलीच असेल. या बाबीकडे त्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे.