Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

उसाला भाव न दिल्यास शेकापतर्फे आंदोलन
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

कारखान्यांनी उसाला प्रतिटन १८०० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे

 

राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य चिटणीस प्रश्न. एस. व्ही. जाधव यांनी दिला.
लातूर तालुक्यातील मुरुड येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबक मांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतराम चेवले, अ‍ॅड. उदय गवारे उपस्थित होते. ऊस उत्पादनासाठी लागणारा खर्च व शेतकऱ्यांचे किमान राहणीमान याचा विचार केला तर २००८-०९ या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन १८०० रुपये भाव मिळाला पाहिजे. कारण एक टन उसापासून सरासरी १२० किलो साखर तयार होत असते. त्याचे मूल्य २५०० रुपये आहे. मळी व चोथरी यापासून कारखान्यास एक हजार रुपयांचे उत्पन्न मिळते म्हणून कारखान्यांना १८०० रुपये भाव देणे सहज शक्य आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
यावेळी संतराम चेवले म्हणाले, कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशी केंद्र शासनाने धुडकावून लावत शेतक ऱ्यांवर अन्याय केला आहे. अ‍ॅड. उदय गवारे म्हणाले, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर जनचळवळीशिवाय पर्याय नाही. जिल्ह्य़ातील विकासाची भाषा करणारे तथाकथित साखर सम्राट शेतकऱ्यांचा ऊस दरवर्षी गाळप करण्याऐवजी दीड वर्षानंतर गाळप करतात. अशा शेतकरीविरोधी साखर सम्राटांना वठणीवर आणण्यासाठी जिल्ह्य़ात शेकापतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या ११ जुलैला प्रश्न. एस. व्ही. जाधव यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथे रास्ता रोको करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अ‍ॅड. एन. जी. माने यांनी केले.