Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

एस. टी. आगारप्रमुखाच्या बदलीची मागणी
वसमत, ४ जुलै /वार्ताहर

येथील एस. टी. आगारप्रमुखांच्या मनमानी कारभारामुळे एस.टी. चे आर्थिक नुकसान होत

 

असल्यामुळे त्यांची चौकशी करून बदली करण्यात यावी, अशी मागणी येथील एस. टी. कामगार संघटनेने उपमहाव्यवस्थापक (मुंबई) यांना निवेदन देऊन केली.
वसमत येथील एस. टी. आगारात गेल्या दीडवर्षापासून प्रभारी आगारप्रमुख म्हणून श्री. राठोड रुजू आहेत. ते रुजू झाल्यापासून त्यांच्या मनमानी कारभारामुळे आगाराचे आर्थिक नुकसान होत आहे. या आगारातून नित्यनियमाने एकही बस वेळेवर जात नाही. त्यामुळे दररोज बऱ्याचशा फेऱ्या रद्द होतात. त्याचे कारण म्हणजे श्री. राठोड हे डय़ूटी बुकमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप करून आपल्या हितसंबंधातील मंडळींची मर्जी सांभाळत आहेत. त्यामुळे डय़ूटी बुकात डय़ूटी टाकताना व प्रत्यक्ष वाहनाचे ऑपरेशन चालविण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेड, परभणी, औंढा येथे जाण्यासाठी भरपूर प्रवासी असतात पण इकडे जाणाऱ्या फेऱ्या श्री. राठोड रद्द करून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आर्थिक हितसंबंधातून पाठिंबा देत असल्याने या मार्गावर भरपूर मिळणारे उत्पन्न ते अवैध वाहतुकीला देत आहेत. त्यामुळे एस. टी. आगाराचे मोठे नुकसान होत आहे.
तरी श्री. राठोड यांची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी एस. टी. कामगार संघटनेचे शेख युनूस, ए. डी. कळंबे, सुंदरराव कदम, एस. ए. हारफळ, प्रकाश भोसले, चंद्रकांत दहाड, नामदेव दुधमल, विजय सहजराव यांनी उपमहाव्यवस्थापक यांना निवेदन देऊन केले.