Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

काँग्रेस निरीक्षकांपुढे इच्छुकांची गटबाजी!
राजळे नगर शहरातूनही इच्छूक

नगर, ४ जुलै/प्रतिनिधी

येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांची माहिती घेण्यास आलेल्या काँग्रेस निरीक्षकांसमोर जिल्ह्य़ातील नेते-पदाधिकाऱ्यांनी गटबाजीचे प्रदर्शन केले. विधानसभा निवडणूक काँग्रेसने ‘राष्ट्रवादी’ला बरोबर न घेता स्वतंत्र लढवावी, अशी मागणीही बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी केली. उमेदवारीची मागणी करताना इच्छुकांनी घोषणाबाजीसह शक्तिप्रदर्शन केले. राज्याचे अल्पसंख्याक विभाग मंत्री अनिस अहमद, पुण्याचे माजी महापौर शांतिलाल सुरतवाला व बुलढाण्याचे गणेश पाटील या तिघांची जिल्ह्य़ासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसने नियुक्ती केली.

गणेशमूर्तीचे काम पूर्णत्वाकडे!
शिल्पा रसाळ
नगर, ४ जुलै

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या निर्गुण निराकार गोळ्यातून श्रीगणेशाच्या सगुण मूर्ती साकारण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नगरमध्ये श्रींच्या मूर्ती बनविणारे छोटे-मोठे १५० ते १७५ कारखाने आहेत. महाराष्ट्रात गणेशमूर्ती उत्पादनात नगरचा पहिला क्रमांक लागतो. दर वर्षी ५ ते ६ लाख लहान-मोठय़ा गजाननाच्या मूर्ती या कारखान्यांमध्ये तयार होतात. या कारखान्यांच्या माध्यमातून ३ ते ५ कोटींची आर्थिक उलाढाल होते.

ऊसतोडणी कामगारांचा पवार, मुंडेंकडून अपेक्षाभंग
साखर कामगार महासंघाची टीका
नगर, ४ जुलै/प्रतिनिधी
ऊसतोडणी कामगारांना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी न्याय दिला नाही, उलट अपेक्षाभंगच केल्याची टीका राज्य साखर कामगार महासंघाने केली. राज्यातील ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या दरात हंगाम २००८-०९साठी २० व पुढील तीन हंगामांसाठी २५ टक्के दरवाढ करण्यात आल्याचे जाहीर झाले.

अकरावी विज्ञानसाठी हवेत ९० टक्के गुण
नगर, ४ जुलै/प्रतिनिधी

रेसिडेन्शियल विद्यालय ९०.३० टक्के, भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय ९२.६२ टक्के, पेमराज सारडा कॉलेज ९०.९२, न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ८९.२३ टक्के, अहमदनगर कॉलेज ८३.०७ टक्के ही आहे शहरातील काही शाळा-कॉलेजमधील विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी लागणारी टक्केवारी! अकरावीच्या प्रवेशासाठी आज पहिली यादी जाहीर करताना खुल्या वर्गातील मोजक्याच गुणवंतांना विज्ञान शाखेस प्रवेश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

राहात्यातील एकमेव पेट्रोलपंप बंद!
वाहनधारकांची गैरसोय
राहाता, ४ जुलै/वार्ताहर
शहरात एकमेव असलेला पेट्रोल व डिझेल पंप अचानक बंद झाल्याने वाहनधारकांचे सध्या हाल होत आहेत. आता साकुरी अथवा शिर्डी येथील पेट्रोलपंपावर जावे लागते. शहरात भाजीपाला, फळे, वाहतूक करणारी वाहनेष तसेच तीनचाकी, चारचाकी, मोटरसायकली यांची संख्या मोठी आहे. नगर-मनमाड रस्त्यावर बसस्थानकासमोर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोलपंप अनेक वर्षांपासून बोरावके ब्रदर्स चालवित होते.

दारूविक्रीबाबत हॉटेलवर छाप्यात १४जणांना अटक
श्रीरामपूर, ४ जुलै/प्रतिनिधी

संगमनेर रस्त्यावरील कैलास हॉटेलमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी दारूविक्री सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून १४जणांना अटक केली.कैलास हॉटेलला दारूविक्रीचा परवाना आहे. परंतु आषाढी एकादशीस दारू विकण्यास परवानगी नव्हती. तेथे दारू विकली जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकरराव जाधव यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी सतीश पटारे, राजू गायकवाड, अरुण पाटील, श्याम बोडखे, अशोक पाटील, इलियाब शेख, किरण नवले, संदीप पटारे, किशोर कांबळे, अब्दुल मेनन, अकबर शेख, संदेश मन्तोडे, किशोर साळुंके, सागर मिरीकर यांना अटक केली. दारूविक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा मोर्चा
कोपरगाव, ४ जुलै/वार्ताहर
केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला. पेट्रोल संपलेली मोटरसायकल उचलून धरीत प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, राजेश नवाळे, शिवाजी जाधव, अशोक चांदगुडे, प्रवीण चौधरी, आर. के. वाकचौरे, शशी गुरसळ, सुकदेव माळी, चांगदेव कोल्हे, गोरख टेके, शरद पवार, अतीष खरात, सुनील पवार, शिवाजी कवडे, राहुल होन आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारला निवडून दिले त्या जनतेची या सरकारने घोर फसवणूक केली. त्यामुळे सरकारच्या विरोधात तालुका शिवसेना आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलनाची दिशा ठरवेल, असा इशारा नेत्यांनी दिला.

लिपिकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कोपरगाव, ४ जुलै/वार्ताहर
नगरपालिकेतील लिपीक वसंत लक्ष्मण ठोंबरे यांना कार्यालयात जाऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या कारणावरून अनिल ऊर्फ अण्णा रंगनाथ जोशी याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. ठोंबरे कामकाज करीत असताना कोणतेही कारण नसताना अनिल जोशी यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार दि. १ रोजी दुपारी घडला. पोलिसांनी ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून जोशीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पठारे करीत आहेत.

कोपरगावला २८ हजार कांदा गोण्यांची आवक
कोपरगाव, ४ जुलै/वार्ताहर

येथील बाजार समितीत २८ हजार ४५७ कांदा गोण्यांची आवक झाली. १५० ते ९२५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळाला. गहू ३०४ क्विंटल १४०० रुपये कमाल, तर १०९० किमान भाव, ज्वारी १५० क्विंटल - ९७५ रुपये कमाल, तर ८९० किमान भाव, हरभरा १५० क्विंटल, २३४८ रुपये कमाल, १८०० किमान भाव, मका ७८ क्विंटल - ९१० रुपये कमाल, ८५० किमान भाव प्रतिक्विंटलला मिळाले.

महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी करमासे
राहाता, ४ जुलै/वार्ताहर

महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी सीमा करमासे यांची निवड झाली. कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्षा सुमनताई वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस शालिनी मुर्तडक, पद्मा बोठे, रेखा घोडे, संगीता बोठे, आरती सदाफळ, कल्पना वहाडणे, चैताली खर्डे, तनुजा शिंदे, रंजना तुपे, मनीषा करमासे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. करमासे यांचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी अभिनंदन केले.

वडाळ्यात मंगळवारी गुरूपौर्णिमा उत्सव
श्रीरामपूर, ४ जुलै/प्रतिनिधी

वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमात मंगळवारी (दि. ७) गुरूपौर्णिमा उत्सव आयोजित केल्याची माहिती मुख्य विश्वस्त रेवणनाथमहाराज यांनी दिली. मंगळवारी पहाटे ५ वाजता रेणुकामातेची पूजा, सप्तशती पाठ, त्यानंतर ध्वजपूजा, तसेच डोमेगावकडे जाणाऱ्या शिख भाविकांच्या दिंडीचे स्वागत, उदयराज गंधे यांचे कीर्तन, महाआरती व प्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. दुसऱ्या सत्रात मनुगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाटय़म्चा कार्यक्रम होईल. शहरात चार दशकांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणाऱ्या शुभलक्ष्मी थत्ते यांचा सत्कार, चारूदत्त आफळे यांचा भैरवी ते भुपाळी हा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी श्रीरामपूर ते माहूर पायी दिंडीचे प्रयाण होईल.

केसापूर बंधाऱ्याची दुरुस्ती प्रगतिपथावर
राहुरी, ४ जुलै/वार्ताहर

गेल्या वर्षी प्रवरा नदीच्या महापुराने वाहून गेलेल्या केसापूर बंधाऱ्याच्या भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, जुलैअखेर पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी दिली. तनपुरे यांनी या कामाची नुकतीच पाहणी केली. या वेळी कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पवार, माजी संचालक द्वारकानाथ बडधे, भास्करराव कोळसे, शिवाजी कोळसे, वसंतराव कोळसे, भाऊसाहेब टाकसाळ, तुकाराम पवार उपस्थित होते. केसापूर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा झाला होता. प्रवरा नदीला महापूर आल्याने बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाहून गेलेल्या भरावाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तनपुरे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार बंधाऱ्याचे भरावाचे काम सुरू झाले. जुलैअखेर काम पूर्ण होईल.

दाखले त्वरित न मिळाल्यास सेतू कार्यालय बंदचा इशारा
कोपरगाव, ४ जुलै/वार्ताहर

सेतू कार्यालयात चालू असलेली सर्वसामान्यांची लूट थांबावी व सर्व प्रकारचे दाखले त्वरित मिळावेत; अन्यथा संपूर्ण जिल्ह्य़ातील सेतू कार्यालये बंद करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय वहाडणे यांनी दिला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की, सेतू कार्यालयाचा अकार्यक्षम कारभार अनुभवयास मिळतो. मोफत असलेल्या अर्जासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. दररोज सेतू कार्यालयात अधिकृत पावतीशिवायही नागरिकांकडून पैसे घेतले जातात. दाखल्याची घाई असल्याने गरजू व्यक्ती निमूटपणे पैसे देऊन मनमानी सहन करतो. सात दिवसांच्या आत दाखला मिळतो. असे असताना सेतू कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. अनेकदा खेडय़ापाडय़ातून एका दाखल्यासाठी येणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नाही.