Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

राज्य

‘विकासमार्गी राजकारण न करणाऱ्यांचा होणार विधानसभा निवडणुकीतही मुखभंग’
नाशिक, ४ जुलै / प्रतिनिधी

काही राजकीय पक्षांकडे मुद्देच शिल्लक नसल्याने मराठी अथवा नामकरणासारखी प्रकरणे काढून ते पुढे येतात, असे सांगताना या पद्धतीने विकासाऐवजी भलतेच राजकारण करण्यात धन्यता मानणाऱ्या पक्षांचा लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही मुखभंग होणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित खान्देशच्या संपर्क अभियानास आज नाशिक जिल्ह्य़ात प्रारंभ झाला.

लग्नाचे आमिष दाखवून दोन मुलींची विक्री केल्याची विधवेची तक्रार
भगूर, ४ जुलै / वार्ताहर

मुलीचा विवाह निश्चित करण्याच्या नावाखाली एका महिलेने शहरातील दोन युवतींना परस्पर गुजरातच्या भावनगर येथील काही व्यक्तींच्या हाती सोपवून संबंधित युवतीच्या आईला दमबाजी करून माघारी पाठवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलींची संबंधित महिला व गुजरातमधील व्यक्तींनी विक्री केल्याची तक्रार त्यांच्या आईने पोलिसात दिली आहे. पंचवटी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका विधवेवर हा प्रसंग ओढवला. या घटनेबाबतचा तक्रार अर्ज आपण पंचवटी पोलीस ठाण्यात दिला असल्याचे पीडीत महिलेचे म्हणणे आहे.

धावण्याच्या सरावावेळी एनडीएमध्ये तरुणाचा मृत्यू;
न्यायालयातर्फे चौकशी होणार..
पुणे, ४ जुलै/प्रतिनिधी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) होणाऱ्या ‘क्रॉसकंट्री ’ स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करताना नीतेश रामनारायण गौर (१९) या छात्राचा गुरुवारी सायंकाळी अचानक मृत्यू झाला. वारजे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रबोधिनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौर हा प्रबोधिनीच्या १२१ व्या तुकडीचा छात्र होता. तो गेल्या जानेवारीत प्रबोधिनीमध्ये दाखल झाला होता.
नुकतेच त्याचे प्रथम सत्र संपले होते. तो शारीरिकदृष्टय़ा संपूर्ण तंदुरुस्त होता. प्रबोधिनीमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या व यंदाच्या वर्षी १८ जुलै रोजी होणाऱ्या ‘क्रॉसकंट्री’ या स्पर्धेसाठी गौर याच्यासह सत्तर छात्र गुरुवारी धावण्याचा सराव करीत होते. बारा किलोमीटर धावण्याचा सराव सायंकाळी संपल्यानंतर गौर अचानक कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. नीतेश याने बारावीच्या परीक्षेनंतर प्रबोधिनीत प्रवेश घेतला होता. त्याच्या वडिलांचा भोपाळमध्ये व्यवसाय आहे. दुर्घटनेची माहिती समजताच त्याचे आईवडील पुण्यात आले व पार्थिव भोपाळला घेऊन गेले. वारजे पोलिसांनी नीतेशच्या मृत्यूची ‘आकस्मिक मृत्यू’ अशी नोंद केली आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयामार्फत केली जाणार आहे.

पानेवाडीतील संपामुळे राज्याच्या बहुतांश भागातील इंधन वाहतूक ठप्प
मनमाड, ४ जुलै / वार्ताहर
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी वाहतुकीचे दर नव्याने वाढवून मिळावेत या मागणीसाठी आज सकाळपासून पुकारलेल्या संपामुळे इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील निम्म्या भागात येथून पेट्रोल, डिझेल, घासलेटचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो. ही सर्व वाहतूक कोलमडल्याने येत्या काळात इंधन टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम टर्मिनल प्रकल्पातून व रेल्वे वाघिणींद्वारे राज्यातील १२ जिल्ह्य़ांना इंधन पुरवठा केला जातो. त्यासाठी कंपनी प्रशासन इंधन वाहतूक दराची निविदा काढत असते. त्यानुसार दर निश्चित होवून वाहतूक प्रक्रिया सुरू असते. या वाहतूक दराच्या निविदेची मुदत संपुष्टात आली असून कंपनीने आता वाहतुकीच्या नवीन निविदा काढावी, अशी वारंवार मागणी करूनही व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करते, अशी वाहतूकदारांची तक्रार आहे. या कारणावरून कंपनीचे अधिकारी वाहतूकदारांना अवमानास्पद वागणूक देत असल्याच्या निषेधार्थ संतापलेल्या वाहतूकदारांनी आज संप पुकारला. परिणामी, दिवसभरात एकही टँकर प्रकल्पातून बाहेर पडला नाही. नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, परभणी, नांदेड, जालना, अहमदनगर, उस्मानाबाद आदी जिल्ह्य़ात येथून इंधनाचा एकही टँकर पोहचू शकला नाही. संप लवकर न मिटल्यास अनेक भागात इंधन टंचाईला सामोरे जावे लागण्याची भिती आहे. दरम्यान, वाहतूकदारांना नवीन वाढीव दर देवून तशा निविदाही काढल्या जातील, मात्र त्यांनी आधी वाहतूक सुरू करावी, अशी भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतली आहे. तथापि, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने तूर्तास संपावर तोडगा निघू शकलेला नाही.