Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

वाढीव निधी हवा..
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राला बराच निधी दिलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात या निधीमध्ये वाढ अपेक्षित आहे. मुंबईच नव्हे तर सर्व मेट्रो शहरांना या निधीची गरज आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने या निधीचा चांगला विनियोग केला आहे. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी खास ‘एनएसजी कमांडो’ असावेत, अशी मागणी २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर सातत्याने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र आता त्यांना अत्याधुनिक हत्यारे, इतर साधने उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तोही केंद्राकडून उपलब्ध होणे अपेक्षित आहे. ‘आम आवास’ योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईला जास्त निधी मिळाला पाहिजे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मी या मागण्या त्यांच्यापुढे सादर केल्या आहेत. एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीवर व्याज दर किमान ९.५० टक्के तरी मिळाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे.
खासदार मिलिंद देवरा
मुंबई हे आर्थिक केंद्र आहे. देशाच्या या आर्थिक राजधानीचा अधिक जलद गतीने विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज देण्याची गरज आहे. मुंबईतून केंद्राला मोठा निधी मिळतो. मुंबईचा विकास झाला तर देशालाही त्याचा फायदा होईल. मागासवर्गीयांचा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाला पाहिजे. महाराष्ट्रात हा निधी फक्त १०.५ टक्के मिळतो, तो १६ टक्के मिळाला पाहिजे. मागासवर्गीयांच्या आणि मुंबई विकासाच्या योजनांचा फेरआढावा घेतला पाहिजे. त्यानुसार निधी मिळाला पाहिजे. महिलांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. हीच परंपरा या अर्थसंकल्पात सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.
खासदार एकनाथ गायकवाड

मंदीच्या पाश्र्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प आशादायी असावा अशीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत असलेले जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात यावेत, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘अर्थसंकल्प-२००९’मध्ये तरतूद असावी अशी माफक अपेक्षा सामान्यजन बाळगून आहेत. तर आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी विविध सवलती पदरात पडतील का याकडे उद्योगविश्वाचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत वाढ व्हावी, असा आग्रह आजी-माजी खासदारांकडून धरण्यात येत आहे. आगामी ‘अर्थसंकल्पा’बाबत नेते आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आमच्या मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा..

अग्नीशिखा
पाऊस स्थिरावला, की एक अतिशय देखणी वेल भुईतून वर येते आणि हातपाय पसरत आपला संसार थाटते. ती वेली म्हणजे ‘कळलावी’ खरं तर या देखण्या वेलीला ‘कळलावी म्हणणं अगदी जिवावर येतं, आणि तेही ‘अग्नीशिखा’, नखस्वामिका अशी या वेलीइतकीच अप्रतिम नावं असताना! अगदी खुरटय़ा झुडुपांच्या आधारानेसुद्धा अग्नीशिखा आपला छोटासा संसार थाटते आणि निभावूनही नेते. आता थोडं नाम महात्म्य : ‘कळलावी’ हे नाव कशावरून आलं असेल? काहींच्या मते ही वेल घराच्या अंगणात लावली तर घरात कलहाची कळ लागते म्हणून ही कळलावी (राहून-राहून वाटतं, की इतक्या देखण्या वेलीत माणसाच्या घरात कलह माजविण्याचं सामथ्र्य माणसापेक्षा नक्कीच जास्त नसावं!) काहींच्या मते, बाळंतपणात प्रसववेदनेच्या काळात ‘कळा’ वाढवायला हिचा उपयोग होतो म्हणून ही कळलावी.

या देशात जीव रमत नाही..!
जेव्हा तुमच्या हाती कथानक नसतं, चांगला चित्रपट काढण्याचा हेतूही नसतो आणि इच्छाही नसते. तेव्हा मग काय असतं? ‘मार्केट व्हॅल्यू’ असणाऱ्या कलावंतांच्या तारखा असतात, पैसा असतो आणि या जोरावर प्रसिद्धी करून किमान ‘ओपनिंग रिस्पॉन्स’ मिळविण्याची व्यवस्था असते. त्यातून जे काही बालीश, बाष्कळ आणि बिनडोक हाती येतं त्याला प्रत्येक वेळी वेगळं शीर्षक असतं.. यावेळी त्याला ‘कम्बख्त इष्क’ असं म्हटलं गेलं आहे. अलिकडे बहुधा एखाद्या चित्रपटाचं कथानक ‘भारतात’ घडल्याचं दाखवणं हे ‘डाऊन मार्केट’ समजलं जाऊ लागलेला आहे. त्यामुळं एखादं फुसकाट कारण काढून सगळा चित्रपट विदेशात ‘शूट’ केला जातो. परंतु या लोकांचा जसा ‘या देशात जीव रमत नाही’ तसाच आपला ‘या चित्रपटात जीव रमत नाही!’

चल, लवकर बाहेर पड
काही दिग्दर्शकांनी मराठी प्रेक्षकांचा बुध्यांक ठरवूनच ठेवलेला आहे. हा प्रेक्षकवर्गही त्यांनी निश्चित केला आहे. त्या प्रेक्षकाला हसवून आपला गल्ला भरणे हा या दिग्दर्शकांचा उद्देश आहे. मग विनोदाची पातळी कशी आहे, याला फार महत्त्व नाही. चित्रपटामध्ये लॉजिकचा विचार करणे तर या दिग्दर्शकांच्या गावीही नाही. अशा प्रकारचे चित्रपट पाहण्यास येणारे प्रेक्षकही तसा विचार करत नाहीत यावर त्यांचा अगदी ठाम विश्वास आहे. त्यामुळे दोन विनोदी कलाकारांना ‘जुंपायचे’, चार कंबरेखालचे विनोद टाकायचे, सहा भावनिक संवाद म्हणायचे आणि नायिकेला पावसात भिजवायचे.. एक झकास (?) मराठी चित्रपट तय्यार! ‘चल लव कर’ या शीर्षकावरूनच त्यातील ‘मालमसाल्या’ची साधारण कल्पना येते. चित्रपट सुरू होऊन तासभर झाला की, चित्रपटाच्या ढाच्याची एकूण कल्पना येते आणि कधी एकदा बाहेर पडतोय, असे वाटू लागते.

सुरक्षा क्षेत्रातील करिअर संधींविषयी ठाण्यात ८ जुलै रोजी कार्यक्रम
प्रतिनिधी

सुरक्षा क्षेत्रात प्रशिक्षित व्यक्तींची मागणी आज मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. ‘झायकॉम’ आणि इस्रायलची ‘आय.एम.आय. अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा व्यवस्थापनातील पद्धती आणि तंत्रज्ञान याविषयीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स्ड सिक्युरिटी ट्रेनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ (एएसटीएम) या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण आणि उत्तम शारीरिक क्षमता हे दोन निकष पूर्ण करणाऱ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यात ८ जुलै रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रश्नयोजक आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, पुणे येथील सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटजिक स्टडीजचे संचालक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर व वॉल्ट डिस्ने कंपनीचे दक्षिण पूर्व आशिया विभागाचे सहयोगी संचालक प्रशांत नायक हे यावेळी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.