Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

क्रीडा

विक्रमी विजेतेपदासाठी फेडरर सज्ज
विम्बल्डन ४ जुलै/पीटीआय

कारकीर्दितील १५ व्या विजेतेपदासाठी स्वित्झलर्ंडच्या रॉजर फेडरर याला विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या अमेरिकेच्या अ‍ॅंडी रॉडिक याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.या लढतीत फेडररचे पारडे जड राहील असा अंदाज आहे. द्वितीय मानांकित खेळाडू फेडरर याने या स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा अजिंक्यपद मिळविले असून कारकीर्दित त्याने आतापर्यंत चौदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे आपल्या नावावर जमा केली आहेत. त्याने सलग २१व्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

भारताची विंडीजवर २-१ अशी आघाडी
धोनीची कर्णधाराला साजेशी खेळी

सेंट ल्युशिया, ४ जुलै / पी. टी. आय.

डकवर्थ लुईसच्या नियमाने कठीण केलेले लक्ष्य आणि वारंवार आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतरही महेंद्रसिंग धोनीने कर्णधाराला साजेशी खेळी करून भारताला वेस्ट इंडिजवर सहा विकेट्स आणि एक चेंडू राखून विजय मिळविला. या विजयामुळे भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेत आपण ही मालिका गमाविणार नाही याची तजवीज केली आहे. २२ षटकांत विजयासाठी १५९ धावा असे लक्ष्य निश्चित झाल्यानंतर भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती.

पावसामुळे बचावात्मक भूमिकेत राहिलो - धोनी
सेंट ल्युशिया, ४ जुलै / वृत्तसंस्था

शुक्रवारी झालेल्या सामन्यात पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे आम्हाला बहुतांश काळ बचावात्मक भूमिकेतच राहावे लागले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली. वेस्ट इंडिजविरुद्ध सहा विकेट्सनी विजय मिळविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला की, आम्ही फलंदाजी करीत असतानाही पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे आम्हाला विजयासाठी दिल्या जाणाऱ्या धावांच्या उद्दिष्टांतही बदल होत होता.

उदयोन्मुख आमीर चमकला;श्रीलंका सर्व बाद २९२
पाकिस्तानचीही घसरण; २ बाद १५
गॉल, ४ जुलै / एएफपी
उदयोन्मुख गोलंदाज मोहम्मद आमीरच्या भेदक गोलंदाजीपुढे यजमान श्रीलंकेने आज गुडघे टेकले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेला सर्व बाद २९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानचीही खराब सुरुवात झाली असून त्यांनी १५ धावांत २ फलंदाज गमावले होते. १७ वर्षीय आमीरने आज आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. त्याने श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना माघारी परतवले. त्याला कसोटी पदार्पण करणाऱ्या अब्दुर रौफने दोन बळी घेत चांगली साथ दिली.

आयटीएफ स्पर्धेत युकी भांब्री विजेता
नवी दिल्ली, ४ जुलै/पीटीआय

युकी भांब्री याने आज येथे आयटीएफ टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.अंतिम फेरीत त्याने सहाव्या मानांकित रोहन गज्जरला हरविले. सव्वा तास चाललेला हा सामना भांब्री याने ६-२, ७-६ (८-६)असा जिंकला.या मोसमातील त्याचे हे चौथे विजेतेपद आहे. युकीने एप्रिल व मे महिन्यात झालेल्या आयटीएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत रोहनलाच हरविले होते. युकीने आजच्या अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये त्याची एकाग्रता थोडीशी ढळली त्याचा फायदा घेत रोहन याने सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवीत ३-१ अशी आघाडी घेतली. तथापि युकीने रोहनची सव्‍‌र्हिस छेदली त्यानंतर हा सेट टायब्रेकपर्यंत गेला. त्यामध्ये युकीने रोहनला नमविण्यात यश मिळविले.युकीने विजेतेपदासह एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व २५ एटीपी गुणांची कमाई केली.

ब्रेट लीबाबतचा निर्णय चुकला - हिल्डिच
मेलबर्न, ४ जुलै/वृत्तसंस्था

वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्याबाबत निर्णय घेताना आमच्या हातून काही चुका झाल्या, अशी कबुली ऑस्ट्रेलिया निवड समितीचे अध्यक्ष अँड्रय़ू हिल्डिच यांनी दिली आहे. डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले की, घटस्फोट झाल्यानंतर ब्रेट ली मानसिकदृष्टय़ा विचलित झाला होता. शिवाय तो शारीरिकदृष्टय़ाही फिट नव्हता. त्यामुळे त्याला मागील वर्षी भारताच्या दौऱ्यावर पाठवायला नको होते. भारताच्या दौऱ्यावर त्याला यश न मिळाल्याने तो आणखीनच निराश झाला. तेव्हापासून त्याच्या गोलंदाजीचा सूर हरवला.

अंतिम फेरीत आनंद विरुद्ध आनंद
नेहा पंडित-सायली गोखले आमनेसामने
टाटा बॅडमिंटन
मुंबई, ४ जुलै / क्री. प्र.

पुढील महिन्यात हैदराबाद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी अव्वल मानांकित चेतन आनंद याने तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणजे त्याने टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. कश्यपला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली.आनंदने कश्यपवर २१-११, २१-१२ असा विजय मिळविला. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उद्या चेतन आनंदची गाठ आनंद पवारशी पडेल. आनंद पवारने उपान्त्य सामन्यात गुरु साई दत्तला २१-१२, २१-१४ असे पराभूत केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राची नेहा पंडित आणि राष्ट्रीय विजेती सायली गोखले यांच्यात झुंज होणार आहे. नेहाने उपान्त्यपूर्व फेरीत आदिती मुटाटकरला तर उपान्त्य सामन्यात गायत्री वर्तकला नमविले.

वझे बुद्धिबळ प्रशिक्षण
मुंबई, ४ जुलै / क्री. प्र.

डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने नवोदित व नियमित बुद्धिबळ खेळत असलेल्या खेळाडूंसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड, ठाणे, कल्याण, चेंबूर, दादर, माझगाव व बोरिवली येथे हे शिबीर होणार आहे. अधिक माहितीसाठी वझे यांच्याशी ९८२१०३१००६, २१६३५०४४ येथे संपर्क साधावा.