Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

विक्रमी विजेतेपदासाठी फेडरर सज्ज
विम्बल्डन ४ जुलै/पीटीआय

 

कारकीर्दितील १५ व्या विजेतेपदासाठी स्वित्झलर्ंडच्या रॉजर फेडरर याला विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या अमेरिकेच्या अ‍ॅंडी रॉडिक याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.या लढतीत फेडररचे पारडे जड राहील असा अंदाज आहे.
द्वितीय मानांकित खेळाडू फेडरर याने या स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा अजिंक्यपद मिळविले असून कारकीर्दित त्याने आतापर्यंत चौदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे आपल्या नावावर जमा केली आहेत. त्याने सलग २१व्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत रॅफेल नदाल याने फेडरर याची सलग पाच वर्षांची विजयी मालिका खंडित केली होती. पाच सेट्सच्या रंगतदार अंतिम लढतीत नदाल याने विजय मिळवित कारकीर्दितील पहिले विम्बल्डन विजेतेपद जिंकले होते. या लढतीचा अपवाद वगळता येथे फेडरर याने गेली सहा वर्षे वर्चस्व गाजविले आहे.
फेडरर हा ग्रासकोर्टवरील सर्वोत्तम खेळाडू मानला जात आहे.अर्थात यंदा त्याने क्लेकोर्टवरील फ्रेंच खुली स्पर्धा जिंकून आपण क्लेकोर्टवरही चांगला खेळ करु शकतो हे दाखवून दिले आहे. या विजेतेपदामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या फेडरर याने येथे यंदा सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविला आहे. उपांत्य फेरीत त्याने टॉमी हास याच्यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्यावर सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविताना फेडरर हा किती अव्वल दर्जाचा खेळ करु शकतो हे दाखवून दिले आहे.या सामन्यात त्याने स्वत:च्या सव्‍‌र्हिसवर केवळ अकरा गुण गमाविले होते. फेडरर याच्या तुलनेत रॉडिक याला उपांत्य फेरीत अ‍ॅंडी मरे याच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले होते. चार सेट्समध्ये त्याने हा सामना जिंकला व त्यापैकी शेवटचे दोन सेट त्याने टायब्रेकरद्वारा जिकंले होते.
रॉडिक याने विम्बल्डन स्पर्धेपूर्वी सरावाची स्पर्धा असलेल्या हॅले चषक स्पर्धेत अिजक्यपद मिळविले होते. या स्पर्धेत त्याने नोव्हाक जोकोविचवर सनसनाटी विजय नोंदविला होता. या स्पर्धेसह त्याने ग्रासकोर्टवर सलग दहा सामने जिंकले आहेत. त्याने फेडरर याच्याविरुद्ध २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत विजय मिळविला होता. त्यानंतर येथे २००४ व २००५ मध्ये फेडरर याने अंतिम फेरीत रॉडिकला नमवित विम्बल्डन किताब जिंकला होता. फेडरर याने २००४ मध्ये चार सेट्समध्ये तर २००५ मध्ये तीन सेट्समध्ये त्याला हरविले होते. फेडरर याने यंदा या स्पर्धेत प्रत्येक फेरीनंतर कौशल्यपूर्ण खेळाची चढती कमान दाखविली आहे.
सव्‍‌र्हिसवर त्याने चांगले नियंत्रण राखले आहे. या खेळाबाबत समाधान व्यक्त करीत फेडरर म्हणाला, सध्या माझी सव्‍‌र्हिस अधिक वेगवान होत आहे. प्रतिस्पध्र्यास ब्रेकची संधी द्यायची नाही हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत मी सव्‍‌र्हिस केली आहे. सुदैवाने परतीचे फटके फारसे चुकत नाही हा माझा गुण आहे.