Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सेरेना सरस
व्हीनसला नमवून तिसरे विम्बल्डन जेतेपद
विम्बल्डन ४ जुलै/पीटीआय

 

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत लागोपाठ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याचे व्हीनस विल्यम्सचे स्वप्न आज हुकले. अंतिम फेरीत तिचीच धाकटी बहिण सेरेना हिने तिला ७-६ (७-३), ६-२ असे पराभूत करीत या स्पर्धेत तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळविले. अमेरिकेच्या विल्यम्स भगिंनीमध्ये झालेल्या या लढतीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: या स्पर्धेत अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी व्हीनसला होती. तथापि व्हीनसच्या तुलनेत अधिक वेगवान सव्‍‌र्हिस व परतीचे फटके असे बहारदार खेळणाऱ्या सेरेनाने स्वत:ची सव्‍‌र्हिस एकदाही गमावली नाही. हेच तिच्या यशाचे गमक ठरले. सेरेना हिने यापूर्वी २००२ व २००३ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. या दोन्ही अंतिम फेरीत तिने व्हीनसला हरविले होते. अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची तिची ही सहावी वेळ होती. दोन वेळा तिला व्हीनसकडूनच पराभव पत्करावा लागला होता. व्हीनसने येथे २०००, २००१, २००५,२००७, २००८ मध्ये अजिंक्य होण्याचा मान मिळविला होता. स्टेफी ग्राफ हिने १९९१ ते १९९३ या कालावधीत येथे सलग तीन वर्षे विजेतेपदाचा वेध घेतला होता.तिच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी व्हीनसला साधता आली नाही. व्हीनसने उपांत्य फेरीत अग्रमानांकित दिनारा सॅफिनाचा धुव्वा उडविला होता. सेरेनास मात्र एलिना दिमेंतिएवाविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. आज मात्र व्हीनसला सूर सापडला नाही. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी स्वत:च्या सव्‍‌र्हिस राखल्यानंतर टायब्रेकरचा उपयोग करावा लागला. त्यामध्ये सेरेनाने दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक घेतला आणि याच ब्रेकच्या आधारे तिने टायब्रेकर ७-३ असा जिंकून हा सेट घेतला. सेरेनाने पासिंग शॉट्सचा सुरेख उपयोग केला. तिने या सेटमध्ये आठ बिनतोड सव्‍‌र्हिस केल्या.
दुसऱ्या सेटमध्ये व्हीनस खूपच दडपणाखाली खेळली, साहजिकच तिच्या खेळात खूपच चुका झाल्या त्याचा पुरेपूर फायदा घेत सेरेना हिने या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. सहाव्या गेमच्या वेळी तिने पहिला सव्‍‌र्हिस ब्रेक घेतला तर आठव्या गेममध्ये पुन्हा तिने ही संधी साधून सेट व सामनाही जिंकला. या गेममध्ये चार वेळा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी वाया घालविल्यानंतर पुन्हा परतीच्या खणखणीत फटक्यांच्या जोरावर सेरेनाने यश मिळविले.हा सामना तिने ८६ मिनिटांत जिंकला.

जागतिक क्रमवारीच्या पद्धतीवर सेरेना नाराज
विम्बल्डन विजेतेपदानंतर सेरेनाने जागतिक क्रमवारीच्या प्रक्रियेवरच तोफ डागली आहे. हे विजेतेपद पटकाविल्यानंतरही सॅफिना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरच असल्याबद्दल सेरेना नाराज आहे. या स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात व्हीनसकडून दिनाराला ६-१, ६-० असा खळबळजनक पराभव स्वीकारावा लागला होता. सेरेनाने यासंदर्भात सांगितले की, जर तुम्ही तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतीपदे पटकाविली असतील तर तुम्ही क्रमांक एकवर राहाल. केवळ त्यासाठी केवळ डब्ल्यूटीए स्पर्धाचा विचार होऊ नये. सेरेना म्हणते की, आणखी एक ग्रॅण्डस्लॅम जिंकल्यानंतरही मी दुसऱ्या क्रमांकावरच राहिले तर त्याला अर्थ काय?