Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारताची विंडीजवर २-१ अशी आघाडी
धोनीची कर्णधाराला साजेशी खेळी
सेंट ल्युशिया, ४ जुलै / पी. टी. आय.

 

डकवर्थ लुईसच्या नियमाने कठीण केलेले लक्ष्य आणि वारंवार आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतरही महेंद्रसिंग धोनीने कर्णधाराला साजेशी खेळी करून भारताला वेस्ट इंडिजवर सहा विकेट्स आणि एक चेंडू राखून विजय मिळविला. या विजयामुळे भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेत आपण ही मालिका गमाविणार नाही याची तजवीज केली आहे. २२ षटकांत विजयासाठी १५९ धावा असे लक्ष्य निश्चित झाल्यानंतर भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. कर्णधार धोनीने (नाबाद ४६) जेरोमी टेलरच्या त्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मिडविकेटला षटकार ठोकला व त्यानंतर चार चेंडूंत चार धावा फटकाविण्याचे आव्हान एक चेंडू राखून पूर्ण केले. ही एकदिवसीय लढत पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास ट्वेण्टी-२० लढतच ठरली. नियोजित वेळेच्या दोन तास पाच मिनिटे उशिरा सुरू झालेल्या या लढतीत चार वेळा पावसामुळे खेळ थांबवावा लागला होता. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून यजमान विंडीज संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरविले.
रामनरेश सरवानच्या ६२ धावांच्या जबरदस्त खेळीमुळे तसेच त्याने रुनाको मॉर्टनसह (२२) केलेली ५१ धावांची तर चंद्रपॉलसह (१५) केलेल्या ४८ धावांच्या भागीदारीमुळे त्यांना २७ षटकांत ७ बाद १८५ धावांचे लक्ष्य उभारता आले. मात्र डकवर्थ लुईस नियमाचा अवलंब केल्याने भारतासमोर २७ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाची सुरुवात दणक्यात होण्याची गरज होती. दिनेश कार्तिक (४३ चेंडूत ४७) व गौतम गंभीर (३८ चेंडूंत ४४) या जोडीने ८४ धावांची दणकेबाज भागी रचून संघाच्या विजयाचा पाया रचण्याचे चोख काम केले. रवी रामपॉलच्या थेट फेकीने कार्तिकला धावचीत करून विंडीजने ही जोडी फोडली. त्यानंतर गंभीर-धोनी जोडीने १३.३ षटकांत १ बाद ९५ अशी मजल मारली आणि पुन्हा पाचव्यांदा पावसाचा व्यत्यय आल्याने भारतासमोर २२ षटकांत १५९ धावांचे नवे लक्ष्य आले. ५१ चेंडूंत ६४ धावांची गरज असताना गंभीर व युवराज (२) हे दोन मोहरे भारताने गमाविले. शेवटी सात चेंडूंत ११ धावा हव्या असताना रोहित शर्माही बाद झाल्याने भारताच्या साऱ्या आशा धोनीवरच एकवटल्या होत्या. धोनीने ३४ चेंडूंत नाबाद ४६ धावांची खेळी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गंभीर कार्तिकने रचलेल्या पायावर धोनीने विजयाचा कळस चढविला.
धावफलक
वेस्ट इंडिज-
ख्रिस गेल झे. धोनी गो. नेहरा २७, रुनाको मॉर्टन यष्टीचित धोनी गो. हरभजन २२, रामनरेश सरवान धावचीत ६२, शिवनारायण चंद्रपॉल झे नेहरा गो. पठाण १५, ड्वेन ब्राव्हो झे. धोनी गो. नेहरा १३, डॅरेन ब्राव्हो त्रिफळाचीत नेहरा २१, दिनेश रामधीन नाबाद १४, जेरोमी टेलर झे. शर्मा गो. हरभजन १. अवांतर १०, एकूण २७ षटकांत ७ बाद १८५
बाद क्रम: १/२७, २/७८, ३/१२५, ४/१३५, ५/१६९, ६/१७२, ७/१८५
गोलंदाजी- ईशान्त शर्मा- ५-०३५- ०, नेहरा- ५-१-२१-३, आर. पी. सिंग- ५-०-३४-०, हरभजनसिंग- ५०- ३५-२, युवराज- २-०-१९-०, रोहित शर्मा १-०-७-०, पठाण- ४-०२७-१
भारत - दिनेश कार्तिक धावचीत ४७, गौतम गंभीर झे. रामधीन गो. बेन ४४, महेंद्रसिंग धोनी नाबाद ४६, युवराज सिंग झे. डॅरेन ब्राव्हो गो. बर्नार्ड २, रोहित शर्मा झे. बर्नार्ड गो. ड्वेन ब्राव्हो ११, युसूफ पठाण नाबाद १. अवांतर ८, एकूण २१.५ षटकांत ४ बाद १५९. गोलंदाजी- टेलर- ३.५-०-३९०, रामपॉल- ४-०-२६-०, ब्राव्हो- ४०- २७-१, बर्नार्ड- ३-०-२१-१, बेन५- ०-३१-१, गेल- २-०-११-०.