Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पावसामुळे बचावात्मक भूमिकेत राहिलो - धोनी
सेंट ल्युशिया, ४ जुलै / वृत्तसंस्था

 

शुक्रवारी झालेल्या सामन्यात पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे आम्हाला बहुतांश काळ बचावात्मक भूमिकेतच राहावे लागले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली. वेस्ट इंडिजविरुद्ध सहा विकेट्सनी विजय मिळविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला की, आम्ही फलंदाजी करीत असतानाही पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे आम्हाला विजयासाठी दिल्या जाणाऱ्या धावांच्या उद्दिष्टांतही बदल होत होता. डकवर्थ लुईस नियमावलीनुसार दिल्या जाणाऱ्या धावांच्या बदलत्या उद्दिष्टांशी जुळवून घेणे आम्हाला अवघड होत होते.
याच कारणामुळे आम्हाला फलंदाजीवेळी दुसरा पॉवर प्ले वापरता आला नाही. यावेळी धोनीने गंभीर आणि कार्तिक यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली. तो म्हणाला की, आमच्या विजयाचा पाया गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक या जोडीने घातला. या दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत धावगती आटोक्यातठेवली. चांगली सुरुवात मिळाल्याने मधल्या फळीचे काम सोपे झाले. धोनीने आपल्या गोलंदाजांचेही कौतुक केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल याला लवकर बाद करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले होते. आमच्या गोलंदाजांनी हे उद्दिष्ट साध्य केले. गेलचा एकदा जम बसला की त्याला आवरणे महाकठीण काम असते. अशावेळी त्याला बाद करणे हा एकमेव पर्याय असतो. वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी आणखी आक्रमक गोलंदाजी केली असती तर आम्ही विजय मिळवू शकलो असतो.
भारतीय संघाने आमच्यापेक्षा सरस कामगिरी केल्याचेही गेल म्हणाला. पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे आमच्या फलंदाजीच्या गतीवर परिणाम झाला. तरीही सारवानच्या टोलेबाजीमुळे आम्ही चांगली धावसंखया उभी करु शकलो. १८५ ही विजयासाठी पुरेशी धावसंख्या ठरेल असे आम्हाला वाटले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी आमची अपेक्षा फोल ठरविली. भारताच्या आघाडीवीरांनी चांगली सलामी दिली. उर्वरित कामगिरी कर्णधार धोनीने पूर्ण केली, असे गेल म्हणाला.
धोनीमुळे चिंता नव्हती - कर्स्टन
धावांच्या बदलत्या उद्दिष्टांमुळे आम्ही जरा दडपणाखालीच होतो. मात्र त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर टिकून असल्याने आम्ही चिंताग्रस्त झालो नव्हतो, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सांगितले. डकवर्थ लुईस नियमानुसार आम्हाला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोनीसारखा मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणे आमच्या दृष्टीने महत्वाचे होते. धावफलकाकडे पाहिल्यावर थोडे दडपण यायचे पण अजून धोनी खेळतो आहे हे दिसल्यावर मन निर्धास्त व्हायचे, असे कर्स्टन याने सांगितले. पावसामुळे व्यत्यय येणाऱ्या सामन्यात नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो.अशा वेळेस ट्वेंटी २० सामन्याप्रमाणेच स्थिती उत्पन्न होते. अशा स्थितीत आपल्या हातात किती गडी आहेत व आपल्याला किती धावा करायच्या आहेत हे निश्चित ठाऊक असते. त्याप्रमाणे आपण खेळाची गती वाढवू शकतो, असे कर्स्टन याने सांगितले.
आज चौथा आणि अखेरचा सामना; थेट प्रक्षेपण : टेन स्पोर्ट्सवर; रात्री ८ पासून