Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

उदयोन्मुख आमीर चमकला;श्रीलंका सर्व बाद २९२
पाकिस्तानचीही घसरण; २ बाद १५
गॉल, ४ जुलै / एएफपी

 

उदयोन्मुख गोलंदाज मोहम्मद आमीरच्या भेदक गोलंदाजीपुढे यजमान श्रीलंकेने आज गुडघे टेकले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेला सर्व बाद २९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानचीही खराब सुरुवात झाली असून त्यांनी १५ धावांत २ फलंदाज गमावले होते. १७ वर्षीय आमीरने आज आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. त्याने श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना माघारी परतवले. त्याला कसोटी पदार्पण करणाऱ्या अब्दुर रौफने दोन बळी घेत चांगली साथ दिली. स्वत: कर्णधार युनूसने २३ धावांत २ बळी घेतले. यष्टीरक्षक कामरान अकमलनेही यष्टीपाठी चमक दाखविताना चार झेल पकडले. सर्वांच्या या एकत्रित कामगिरीमुळे श्रीलंकेचा संघ ६ बाद १९४ असा अडचणीत सापडला होता.
पण तळाच्या फलंदाजांनी टक्कर दिल्यामुळे त्यांना तीनशेच्या जवळपास पोहोचता आले. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली असून कर्णधार युनूस खान सात धावांवर खेळत आहे तर नाइटवॉचमन म्हणून मैदानात उतरलेला अब्दुर रौफला अजूनही आपले खाते उघडायचे आहे. सलमान बट्ट व खुर्रम मंजूर हे पहिल्या चार षटकांतच माघारी परतले. श्रीलंकेच्या थरंगा पर्णवितना याने चिवट खेळी करताना ७२ धावा केल्या आणि तिसऱ्या विकेटसाठी महेला जयवर्धनेसह (३०) ७५ धावांची भागीदारी केली. नंतर थिलन समरवीरासह चौथ्या विकेटसाठी त्याने ४३ धावाही जोडल्या. श्रीलंकेची घसरण सुरू असताना तळाचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने ५७ चेंडूंत ४२ धावांची झुंजार खेळी करून कुलसेखरासह सातव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारीही केली. पाकिस्तान आणि श्रीलंकायांच्यातील ही पहिली कसोटी आहे.
श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच हे दोन देश परस्परांशी खेळत आहेत. विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीतही हे दोघे एकमेकांशी झुंजले होते. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्या हल्ल्यानंतर ते प्रथमच आमनेसामने आले आहेत. विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत चमकलेल्या डावखुऱ्या आमीरने या कसोटी सामन्यातही चमक दाखविली. आपल्या पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने मलिंदा वर्णपुराला बाद केले. त्यानंतर कुमार संगकाराला आपल्या दुसऱ्या षटकात बाद करून त्याने श्रीलंकेची अवस्था २ बाद २१ अशी केली.
आमीरला या तीन विकेट्सव्यतिरिक्त आणखी दोन बळी मिळविता आले असते, पण क्षेत्ररक्षणातील गलथानपणामुळे त्याची संधी हुकली. चिवट खेळी करणाऱ्या पर्णवितनाचा झेल शोएब मलिकने सोडला तर अकमलने जयवर्धनेला झेलचीत करण्याची संधी सोडली. पर्णवितना त्यावेळी अवघ्या ४ धावांवर होता त र जयवर्धनेने एकही धाव केली नव्हती.