Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

विविध

इंदूरात ‘संत तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दी सोहळा’
(डॉ. गणेश मतकर)

इंदूरच्या गांधी सभागृहात संत शिरोमणी तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दी सोहळा संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुमित्रा महाजन आणि प्रमुख पाहुणे देवासचे महापौर शरद पाचुनकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत तुकारामांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, नंतर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डीएनए नमुन्यासाठी दोन्ही तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्याचे हायकोर्टाचे आदेश
शोपियातील बलात्कार-खून प्रकरण

श्रीनगर, ४ जुलै/पीटीआय

गेल्या महिन्यात शोपिया येथे दोन महिलांवर झालेला बलात्कार आणि त्यांच्या हत्येप्रकरणी दोघींचे डीएनए नमुने मिळवण्याकरिता दफनभूमीतील मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी असेल तरच डीएनए चाचणी घ्यावी, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

मुंबईवरील हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांवरील पाकिस्तानातील सुनावणी १८ जुलैपर्यंत स्थगित
इस्लामाबाद, ४ जुलै / पी.टी.आय.

रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात लष्कर ए तय्यबाच्या पाच प्रमुख दहशतवाद्यांवरील सुनावणी १८ जुलैपर्यंत न्यायाधीश उपलब्ध नसल्याने आज स्थगित करण्यात आली. या दहशतवाद्यांमध्ये सूत्रधार झाकीर उर रहमान याचाही समावेश आहे.
दहशतवादी न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश साकी मोहम्मद काहुत यांच्यासमोर २३ मे पासून या प्रकरणी सुनावणी चालू होती. न्यायालयीन सुधारणांच्या कामासंदर्भात न्या. काहुत यांना या न्यायालयातून नंतर हटविण्यात आले होते. मुंबई हल्ल्याशी संबंधित अशा लष्कर ए तय्यबाचे हे दहशतवादी आहेत. त्याचवेळी पाकिस्तानातील फेडरल इन्व्हिस्टिगेशन एजन्सीने न्या. मोहम्मद अक्रम आवान यांच्या न्यायालय क्रमांक एकमध्ये हे प्रकरण हस्तांतरीत करून घेतले. दरम्यान अवान हे वैयक्तिक कारणामुळे रजेवर असून न्यायालय क्रमांक दोनमध्येही बकीर अली राणा यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. ते आता या पाच दहशतवाद्यांच्या प्रकरणी काम पाहाण्याची शक्यता आहे. अन्य मोठय़ा दहशतवाद्यांची प्रकरणेही त्यांच्यासमोर सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

जामीनावरील आरोपींची जीप, रायफल जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
चिंकारा शिकार प्रकरण
सासवड, ४ जुलै/वार्ताहर

पुरंदर व बारामती तालुक्यांच्या हद्दीवरील गुळुंचे येथे १४ जून २००८ रोजी झालेल्या चिंकारा जातीच्या दोन हरणांच्या कथित शिकार प्रकरणी जामिनावर मुक्त झालेल्या सात आरोपींमधील तपासामध्ये जप्त करण्यात आलेली बोलेरो जीप, रायफल व एक बंदूक ताब्यात मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायाधीश अश्विनी कुलकर्णी यांनी जप्त करण्याचे आदेश दिले. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी सासवड न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार आहे.राज्याचे माजी वनराज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या सहभागामुळे राज्यभर गाजलेल्या या ‘चिंकारा’ हरणांच्या शिकार प्रकरणाची दोषारोपपत्रे ३० जून ०८ रोजी तपास अधिकारी व भोर उपविभागीय वन अधिकारी हनुमंत धुमाळ यांनी न्यायालयास सादर केली आहेत.ज्या बोलेरो जीपमधून सात आरोपींसाठी घटनास्थळी बिर्याणी नेण्यात आली, ती श्रीमती रतन आनंदराव बिरामणे यांची एमएच १५ बीएच ६१०१ ही गाडी, आनंद शिवराम बिरामणे यांची रायफल व महेश आनंद बिरामणे यांची बंदूक तपासकामी जप्त करण्यात आली होती. त्यावर आज सासवड न्यायालयात सुनावणी होती.

पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून २६ जण ठार
इस्लामाबाद, ४ जुलै / पी.टी.आय.

पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना व सैनिकांना घेऊन जाणारे पाकिस्तानचे चॉपर हेलिकॉप्टर पेशावरपासून २० किलोमीटर अंतरावर आदिवासी भागात कोसळून २६ जण ठार झाले. हे हेलिकॉप्टर आपण पाडले असल्याचा दावा तालिबानने केला आहे. रशियन बनावटीचे हे एमआय-१७ असे हेलिकॉप्टर असून शुक्रवारी ऑर्काझाई व खैबर आदिवासी भागात हेलिकॉप्टर कोसळले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यातील २६जण ठार झाले. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अथर अब्बास यांनी मात्र तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. तालिबानच्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यामाशी बोलताना मात्र, आम्ही हे हेलिकॉप्टर पाडले असल्याचे सांगून दक्षिण वझिरिस्तानमधील पाकिस्तानच्या लष्करी कारवाईविरोधातील हे प्रत्युत्तर असल्याचे स्पष्ट केले.