Leading International Marathi News Daily

सोमवार, ६ जुलै २००९

प्रणवदांची पोतडी आज उघडणार!
नवी दिल्ली, ५ जुलै/खास प्रतिनिधी
जागतिक मंदीचा ‘मर्यादित’ का होईना फटका सहन करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उच्च विकासदराच्या पथावर आणून ठेवण्यासाठी २००९-१० सालच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी पगारदार वर्गाला सुखावणाऱ्या कर सवलतींसह कटु अशा आर्थिक सुधारणांचे कसे संतुलन साधतात, याकडे उद्या साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असेल. गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाचा अर्थसंकल्प असा उद्या सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाचा गाजावाजा झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणि उत्कंठा वाढल्या आहेत.

वेधशाळेला वाकुल्या दाखवत पावसाची ‘टाइम प्लीज’
मुंबई, ५ जुलै / प्रतिनिधी

शनिवारी पावसाने ‘मुंबईस्टाइल’ एंट्री घेतल्यानंतर रविवारी, सुट्टीच्या दिवशीही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी मुंबईकरांची अपेक्षा होती. त्यात वेधशाळेने ‘मुसळधार ते अतिमुसळधार’ पावसाची शक्यता वर्तविली होती. परंतु नेहमीप्रमाणेच वेधशाळेचा ‘अंदाज’ चुकवित पावसाने आज पूर्ण सुट्टी घेतली आणि ‘ओला रविवार’ साजरा करण्याच्या सर्वसामान्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले.

चार कोटी कामगारांना आता धनादेशाद्वारे वेतन
स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी

संदीप आचार्य
मुंबई, ५ जुलै

असंघटित क्षेत्रातील तसेच कारखाने व दुकानांमध्ये काम करणाऱ्या सुमारे चार कोटी कामगारांना धनादेशाद्वारे वेतन मिळण्याकरिता संगणकीकरण करण्याचा निर्णय कामगार मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे कामगार क्षेत्रातील ‘इन्स्पेक्टर राज’ संपुष्टात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार असल्यामुळे कामगारांना मालकांनी दिलेले वेतन व अन्य फायदे संकेतस्थळावर तात्काळ तपासणे शक्य होणार आहे. यामुळे कामगारांना धनादेशाद्वारे वेतन देणे बंधनकारक असल्याने कामगारांच्या फसवणुकीला पूर्णपणे आळा बसणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मशिन वापरायला भाजपचा विरोध
विधानसभा निवडणुकीत मतपत्रिकेची मागणी आयोगाने फेटाळली
नवी दिल्ली, ५ जुलै / पी.टी.आय.
इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) मध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार करता येणे शक्य असल्याचा दावा करीत आज भाजपने महाराष्ट्र तसेच हरयाणामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जुन्या पध्दतीनेच म्हणजे मतपत्रिकांवर शिक्के मारून त्या मतपेटीत टाकण्याची पध्दत अवलंबण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा प्रकार घडला असल्याबाबत मात्र भाजपतर्फे याबाबतीत कोणताही आरोप करण्यात आलेला नाही.

विम्बल्डन ५ जुलै/पीटीआय
अँडी रॉडिकची भेदक आणि प्रभावी सव्‍‌र्हिस.. रॉजर फेडररची स्लाईस, फोरहॅण्ड, बॅकहॅण्ड, ड्रॉप शॉट्स अशी भात्यातील सर्व हुकमी अस्त्रे आणि या अस्त्रांसह दोघांनी तब्बल चार तास १६ मिनिटे, पाच सेटपर्यंत एकमेकांवर केलेले अचूक प्रहार..अशी भूतो न भविष्यती रोमांचक झुंज विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर पाहायला मिळाली आणि उपस्थित तमाम चाहत्यांचा पैसा वसूल झाला. फेडररने आपल्या कारकीर्दीतील १५वे विक्रमी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविले. हे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद फेडररसाठी जेवढे अविस्मरणीय ठरले, तेवढेच चाहत्यांसाठीही ठरले. फेडररच्या या १५व्या ग्रॅण्डस्लॅमच्या प्रेमातच जणू प्रत्येक चाहता पडला. अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसच्या १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचा विक्रम आज फेडररने मागे टाकला. (सविस्तर वृत्त)

पावसाची मेहेरबानी
भारताने विंडीजविरुद्ध मालिका जिंकली
सेंट ल्युशिया, ५ जुलै / वृत्तसंस्था

पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा आणि अखेरचा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला आणि चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी बाजी मारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडिजने ७.३ षटकांत २७ धावा केल्या होत्या. सलामीवीर गेल शून्यावर बाद झाल्यानंतर मॉर्टन (१२) व सरवान (१२) हे नाबाद होते. पण पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर मैदानावर जमलेल्या पाण्यामुळे खेळ होणे शक्य नसल्याने सामना रद्द करण्यात आला. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

जॉर्ज लिहिताहेत आत्मचरित्र
धरमशाला, ५ जुलै/पी.टी.आय.

राजकारणाचा आपल्याला कंटाळा आला असून सध्या आपण आत्मचरित्र लिहिण्यात स्वत:ला गुंतवून घेतले आहे, असे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी म्हटले आहे. एकेकाळी लढाऊ कामगार नेते असलेले व त्यानंतर वेगवेगळ्या सरकारांमध्ये मंत्रिपदे भूषविणारे ७९ वर्षीय फर्नाडिस सध्या गंभीर आजारपणामुळे खंगले आहेत. मेंदूत झालेल्या गाठीवर तिबेटी पद्धतीने निसर्गोपचार करवून घेण्यास्तव हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे सध्या त्यांचा मुक्काम आहे. तिबेटचे धार्मिक नेते आणि आपले मित्र दलाई लामा यांच्या खास निमंत्रणावरून फर्नाडिस येथे आले आहेत. त्यांच्या समवेत पक्षाच्या नेत्या जया जेटली आणि माजी मंत्री अजय सिंग हे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना उमेदवारी देण्याचे नाकारूनही फर्नाडिस यांनी मुझफ्फरपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पी. टी. आय.च्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, ‘राजकारणाला मी आता विटलो आहे. सध्या मी आजवरच्या आयुष्यातील आठवणी शब्दबद्ध करण्यात गुंतलो आहे. माझे हे शेवटचे पुस्तक असेल. ते कधी प्रकाशित होईल हे मी सांगू शकत नाही.’
लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार या पूर्वीच्या मित्रांच्या दुरावलेल्या संबंधांविषयी या आत्मचरित्रात उल्लेख असेल काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, कोणाही व्यक्तीविषयी बोलण्याची माझी इच्छा नाही. सध्याच्या राजकारणाविषयी तीव्र नापसंती व्यक्त करून ते म्हणाले की, राजकारणातील सेवाभाव कधीच संपला असून आता हा एक धंदा झाला आहे. हे अध:पतन देशाला विनाशाकडे नेणारे आहे. भारताला जगात सर्वोच्च स्थानी न्यायचे असेल तर देशाच्या पंतप्रधानपदी तरुण व्यक्तीच असली पाहिजे असे मत फर्नाडिस यांनी व्यक्त केले. तुमचा रोख कॉँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याकडे आहे काय, असे विचारता त्यांनी कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला.

राज्यातील सर्व महाविद्यालये आज बंद
मुंबई, ५ जुलै / प्रतिनिधी
शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करावा तसेच १९९९ सालापर्यंत भरती झालेल्या शिक्षकांना मान्यता देण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांनी उद्या, सोमवारी (६ जुलै) सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेजेस् टिचर्स’ (एमफुक्टो) या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात हे आंदोलन पुकारण्यात आले असून त्यात मुंबईतील ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) ही प्रमुख संघटनाही सहभागी झाली आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईसह राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील सर्व जवळपास सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांनी प्राचार्याकडे सामूहिक रजांचे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे उद्या कोणतेही महाविद्यालय उघडले जाणार नाही, असे बुक्टूच्या सचिव मधू परांजपे यांनी सांगितले.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी