Leading International Marathi News Daily

सोमवार, ६ जुलै २ ० ० ९

शरदातील मेघ बरसू लागतील काय?
हा लेख सकाळी वाचकांच्या हाती पडेल व काही तासांत अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प संसदेत मांडतील. ऐतिहासिक ठरावा असा तो असेल असे सगळ्यांना वाटत असले तरी धाडसी वा मोठी पावले टाकण्याची या शासनाची कुवत नाही. आम आदमीला छत्रीखाली घेण्याचा प्रयत्न दिसेल; पण शरदातले मेघ नुसती गर्जना करतात, बरसत नाहीत, (शरदि न वर्षाते, गर्ज, वर्षति वर्षासु निखनो मेघा:) या ओळीप्रमाणे त्यात फक्त वायदे असतील. फ्यूचर्स व ऑप्शन्समध्ये रमणाऱ्या शासनाकडून ‘स्पॉट’ व्यवहार अपेक्षिणे चुकीचे आहे. पण भारतीय उद्योग शासनाच्या मदतीची इच्छा करीत असतानाही स्वत:च्या हिमतीवरच पावले टाकतो व त्यावर शेअरबाजार वर जातो हे आजपर्यंत दिसले असल्याने निवेशकांनी चांगल्या कंपन्यांवर, दीर्घ मुदतीसाठी भर दिला आहे. खासगी- सार्वजनिक भागीदारी हा शब्द वापरला जातो. त्यात खासगी क्षेत्राचे योगदानच मोठे असते. ते असणेही योग्यच आहे. कारण शासनाने फक्त योग्य, उत्तेजक पाश्र्वभूमीच द्यायची असते व अडथळे वा नियंत्रणे आणून खासगी क्षेत्राचे जखडायचे नसतात.
जागतिक मंदीच्या माहेरी, अमेरिकेत शासनाने असेच उत्तेजक वातावरण निर्माण केले होते. फ्रेडी मॅक, फॅनीमे, एआयजी इन्शुरन्स, बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक यांना भांडवल पुरवले, भांडवलाचा

 

ओघ आटला होता तो सुरू केला. अर्थात, वस्तूंची मागणी त्यामुळे वाढली नाही. त्यामुळे तो पुरवठा सध्या असून नसल्यासारखा आहे. आपल्याकडे मागणी कमी म्हणून मंदी आली आहे, असे मुळीच नाही. रास्त व्याजदराने भरपूर कर्जे हवीत व शासकीय निर्णय पटपट हवेत एवढीच इथली जरुरी आहे. जागतिक चित्र व इथळे चित्र यातील ही तफावत टाटा स्टीलचे मार्च ०९ वर्षाचे एकाकी (stand alone) व संगठित (consolidated) आकडे गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झाले आहेत त्यावरून लक्षात येईल. दोन्ही बाबतीत तुलनेसाठी चारही तिमाहीचे आकडे चौकटीत दिले आहेत.
आकडय़ांवरून डिसेंबरचे एकाकी आकडे निरुत्साही होते, पण मार्च ०९ ला त्यात खूप सुधारणा झाली आहे. पुढील वर्षी भारतातली विक्री २५ टक्क्य़ाने वाढेल असा विश्वास कंपनीने प्रकट केला आहे. त्यासाठी जमशेदपूरच्या कारखान्याची उत्पादनक्षमता वाढवली गेली आहे. त्यामुळे मार्च १० वर्षाचा नफा ६३०० कोटी रुपये व्हावा.
संगठित आकडय़ांचा विचार करता युरोपमधील मंदीमुळे, कोरस कारखान्याचे इंग्लंडमधील उत्पादन गेल्या सहा महिन्यात ३२ टक्क्य़ाने कमी झाले. मार्च १० ची पहिली सहामाही कमीच विक्री दाखवेल. पण ऑक्टोबर ०९ पासून परिस्थिती सुधारेल. मिट्टल अर्सेलरच्या लक्ष्मी मिट्टलनी हा आशावाद प्रकट केला आहे. शिवाय लंडनमध्ये सन २०१२ मध्ये ऑलिंपिक्स सोहळा होणार आहे. सुमारे ६०००० कोटी रुपये खर्च होतील. चीनमध्ये भरलेल्या २००८ च्या ऑलिंपिक्ससाठी, तीन वर्षे आधी तयारी चालली होती. तेव्हा ब्रिटनमध्ये ऑक्टोबर ०९ पासून मोठा खर्च सुरू होईल व कोरस तेव्हापासून आपला तोटा कमी करेल. अनेक विश्लेषकांच्या ही बाब ध्यानात आलेली दिसत नाही. त्यामुळे टाटा स्टीलचा २०१० व २०११ साली नफा कमीच राहील, असे वाटून ते ‘विका’ असा सल्ला देत आहेत. माझा दृष्टिकोन त्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे निवेशकांनी साधकबाधक विचार करून आपल्या जोखमीवर निर्णय घ्यावा. माझ्या मते डिसेंबर १० ला भाव ७०० रुपये व्हायला हवा.
सध्याच्या ४०० रुपये भावाला, २००९ चे उपार्जन बघता फक्त ६.५ पट dIaY/DY गुणोत्तर दिसते. भूषण स्टीलचे मार्च ०९ चे आकडे गेल्याच आठवडय़ात प्रसिद्ध झाले. तिची विक्री ४९५७ कोटी रुपये होती. अन्य उत्पन्न १८ कोटी होते. नक्त नफा ४१२.७५ कोटी रुपये आहे. ४२.४७ कोटी रुपयांच्या भागभांडवलाचा विचार करता शेअरगणिक उपार्जन ९७.१९ रुपये दिसते. सध्याच्या ६८० रुपये भावाला dIaY/DY गुणोत्तर सात पट दिसते.
मॉनेट इस्पात अ‍ॅण्ड एनर्जीचे मार्च ०९ वर्षाची विक्री १५६८ कोटी रुपये होती. नक्त नफा २१२ कोटी रुपये आहे. भागभांडवल ४८ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन ४३.५३ रुपये आहे. सध्याचा भाव २४५ रुपयांच्या आसपास असल्याने dIaY/DY गुणोत्तर सहा पट पडते. लाभांश शेअरला पाच रुपये आहे.
म्हणजे टाटा स्टीलपेक्षा कितीतरी लहान असलेल्या कंपन्यांचे dIaY/DY गुणोत्तर जेवढा आहे, त्यापेक्षा टाटा स्टीलला जास्त गुणोत्तर मिळायला हवे. सध्याच्या ४०० रुपये भावात १६ रुपये लाभांश दर शेअरमागे मिळणार असल्याने परतावा चार टक्क्य़ापेक्षा जास्त पडतो. मॉने इस्पातचा परतावा दोन टक्के आहे. त्यामुळे सर्व बाजूने टाटा स्टीलची गुंतवणूक फायदेशीर ठरावी.
पण शेअरची निवड करताना प्रत्येकाने आपले अभ्यासपूर्ण निकष लावूनच निर्णय घ्यायला हवा. कुठल्या शेअरला किती गुणोत्तर द्यावे, त्याचे वर्षभराचे उद्दिष्ट काय असावे याबाबत मतभेद होऊ शकतो. अशा वेळी, अडचणीमध्ये असता हुकूम खेळा, असा ब्रिजमधला सल्ला पाळावा व इंफोसिस, भेल, सेंचरी टेक्स्टाइल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, BEML ,NTPC अशा शेअर्सची निवड करावी हे उत्तम.
वसंत पटवर्धन
०२०-२५६७०२४०