Leading International Marathi News Daily

मंगळवार, ७ जुलै २००९

पोलिटिकल इंजिनिअरिंग
नवी दिल्ली, ६ जुलै/खास प्रतिनिधी
जागतिक मंदीचे अजूनही न ओसरलेले सावट, सहा महिन्यांत येऊ घातलेल्या तीन विधानसभांच्या निवडणुका, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपुऱ्या मान्सूनमुळे आ वासून उभा ठाकलेला दुष्काळ अशा सगळ्या निराशाजनक वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करताना प्रणव मुखर्जी यांना मोठीच कसरत करावी लागली. ‘समर्थ भारत घडविण्यासाठी आम्ही एक एक वीट वर चढवत आहोत’, असे सांगणाऱ्या प्रणवदांनी आपले कौशल्य पणाला लावत ‘पॉलिटिकल इंजिनियरिंग’चा नमुना सादर केला. सद्यस्थितीत समाजातील कोणत्याही एका वर्गाला अथवा गटाला खुश करता येणे शक्यच नव्हते. मात्र कोणताही गट नाखुश होणार नाही हे प्रणवदांनी आवर्जून पाहिले आहे. प्राप्तिकराची मर्यादा १० हजार रुपयांनी वाढवून सर्वसामान्यांच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटणार नाही याची निश्चिती करतानाच ग्रामीण भागात राहणारे तसेच शेतकऱ्यांसाठी खास योजना त्यांनी जाहीर केल्या.

मुंबई, ६ जुलै / प्रतिनिधी
इयत्ता ११ वीच्या प्रवेशांमध्ये ‘एसएससी’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के जागा राखून ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, समानतेच्या मुलभूत तत्त्वाचा भंग करणारा आणि पूर्णपणे मनमानी स्वरुपाचा असल्याचे ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केला. विद्यार्थ्यांमध्ये बोर्डानुरूप कोणताही भेदभाव न करता सर्वाना गुणवत्ता व पसंतीच्या ‘गोल्डनरुल’नुसार प्रवेश दिले जावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.

मुंबईत आजपासून ३० टक्के पाणीकपात
मुंबई, ६ जुलै / प्रतिनिधी

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार सुरुवात केली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पालिकेने यापूर्वी केलेल्या २० टक्के पाणीकपातीत १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईकरांना ३० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. नवीन बांधकामांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे तर हॉटेल व्यावसायिक, जलतरण तलाव आदींना पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सध्या अप्पर वैतरणा आणि विहार तलावातील राखीव साठा वापरण्यात येत आहे. त्यामुळे तलावांच्या क्षेत्रात आणखी १५ दिवस पाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे प्रशासनातर्फे आज स्थायी समितीत सांगण्यात आले.

शिवसेनाप्रमुख पुन्हा लिलावतीमध्ये दाखल
श्वसनाचा त्रास वाढला
मुंबई, ६ जुलै/प्रतिनिधी

श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पंधरा दिवसांच्या अंतराने आज पुन्हा लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉ. जलील परकार हेच त्यांच्यावर उपचार करीत आहेत.शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीविषयी चेस्ट फिजिशियन डॉ. जलील परकार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. श्वसनाचा त्रास कमी झाल्यावर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल.दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आपण भेट घेतली तर चालेल का, अशी विचारणा राज यांनी शिवसेनाप्रमुखांकडे केल्यानंतर तू कधीही भेटण्यासाठी येऊ शकतोस, असे बाळासाहेबांनी सांगितले.

‘सर्वोच्च न्यायालयात अपील करू नये’-मुख्यमंत्री
मुंबई, ६ जुलै/प्रतिनिधी

महाविद्यालयीन वर्ष सुरू होत असल्याने उच्च न्यायालयाने ९०-१० कोटय़ाविरुद्ध दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल करू नये, असे आपले व्यक्तिगत मत आहे. मात्र शालेय शिक्षणमंत्री व संबंधितांशीच चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या निकालाने पुन्हा एकदा गेल्यावेळेसारखीच गोंधळाचीच परिस्थिती निर्माण झाली आहे का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, तशी कोणतीही गोंधळाची परिस्थिती नाही. कारण ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे. प्रश्न फक्त प्रवेश देण्याचाच आहे. उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणारच आहेत. त्यामुळे गोंधळ उडण्याचा काही संबंध नाही, असे ठाम प्रतिपादन चव्हाण यांनी केले.

अकरावी प्रवेश अर्ज : आज अंतिम संधी
मुंबई, ६ जुलै / प्रतिनिधी

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी अर्ज सादर करणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर त्याच्या दोन प्रिंट आऊट्स सायंकाळी पाचपर्यंत सबमीशन सेंटरवर सादर करण्याची सूचना शिक्षण उपसंचालकांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाइन अर्ज पाहण्याची सुविधा ८ व ९ जुलै रोजी उपलब्ध आहे. नाव, जात इत्यादी माहिती चुकीची असल्यास त्यात सुधारणा करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमात कोणताही बदल करता येणार नाही.

माकडाने धरले डोंबिवलीकरांना ओलीस!
डोंबिवली, ६ जुलै/प्रतिनिधी
डोंबिवलीतील पांडुरंगवाडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका वानराला सोमवारी सकाळी नेरुरकर शाळेत एका खोलीत बंदिस्त करण्यात अग्निशमन दल व प्लॅन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांना यश आले. रविवारपासून वानराने रा.वि. नेरुरकर शाळेत आपले बस्तान बसविले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी काल पांडुरंगशास्त्री परिसरात वानराला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु काळोख झाल्याने दलाने काम थांबविले. आज सकाळी वानराने शाळेच्या गच्चीचा ताबा घेतला. त्यामुळे मुलांना, पालकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून शाळेला सुट्टी ेण्यात आली. आज पुन्हा अग्निशमन दलाने ‘पॉज’ संस्थेच्या सहकार्याने पकडण्याचा प्रयत्न केला. शाळेतील एका खोलीत केळी ठेवण्यात आली. ती खाण्यासाठी वानर त्या खोलीत घुसताच जवानांनी खोलीचे दरवाजे बंद केले. ‘पॉज’च्या पथकाने ट्रॅन्ग्युलर गनने वानराला बेशुद्ध केले. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी आले होते, पण त्यांच्याजवळ कोणतीही साधने नव्हती. त्यामुळे त्यांना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

भिंत कोसळून दोन बहिणींचा मृत्यू
मुंबई, ६ जुलै / प्रतिनिधी
दोन इमारतींमधील कंपाऊंडची भिंत कोसळल्याने दोन मुलींचा मृत्यू तर दोनजण जखमी झाले. ही घटना आज पहाटे मलबार हिल परिसरात घडली. रोहिणी (१६) आणि पल्लवी तातोबा जाधव (१८) अशा या मुलींची नावे असून त्या बहिणी आहेत. मलबार हिल परिसरातील खटाऊ आणि रॉकी या इमारतींच्यामध्ये असलेली कंपाऊंड िभत आज पहाटे पाचच्या सुमारास कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या घरांवर कोसळली. पहाटेची वेळ असल्याने या घरांमध्ये राहणारे सर्वजण ढिगाऱ्याखाली सापडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसून सगळ्यांना बाहेर काढले. मात्र रोहिणी आणि पल्लवी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात सुरेंद्र कनोजिया आणि रामदिन कनोजिया हे बाप-लेकही जखमी झाले. त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांजूरमार्ग येथील ‘डम्पिंग ग्राऊंड’चा प्रस्ताव मंजूर
मुंबई, ६ जुलै / प्रतिनिधी

मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने कांजूरमार्ग येथे नव्याने डम्िंपग ग्राऊंड सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतच्या प्रस्तावास आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याठिकाणी सुमारे चार हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही खासगी कंपनीमार्फत राबविला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी भागीदारीतून कचऱ्यावर प्रकल्प सुरू करणे बंधनकारक आहे. मुंबईतील गोराई येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे तर देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. त्यामुळे कांजूरमार्ग येथे नवे डम्पिंग ग्राऊंड सुरू करण्यास विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी दरदिवशी किमान चार हजार मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे, दरदिवशी किमान एक हजार टन खत निर्मिती करणे, कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार असल्याने परिसरातील जनतेला कचऱ्याची दरुगधी येणार नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

 महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी