Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आषाढी यात्रेसाठी अतिरिक्त केरोसिन पंढरीत आलेच नाही
पंढरपूर, ७ जुलै/नंदकुमार देशपांडे

 

आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीकरिता सोलापूर, पुणे व सातारा या जिल्ह्य़ांसाठी केरोसिन कोटाच मंजूर केला नसून या जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्य़ातील तालुक्यास येणाऱ्या कोटय़ातून रॉकेल पुरवठा करून वारकऱ्यांची गैरसोय दूर केली, असे एका जबाबदार अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आळंदी येथून प्रस्थान पूर्वी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची पालकमंत्री यांच्या समवेत यात्रा नियोजन बैठका घेण्यात येऊन पालख्या ज्या जिल्ह्य़ात प्रवेश करतील तेव्हा तेथील प्रशासनाने वारकऱ्यांना रॉकेलचा पुरवठा करण्यास सांगितले होते. परंतु वारीसाठी शासनाने रॉकेल मंजूर केले नसल्याने जुलै महिन्याच्या नियतनातून वाटप करण्यात आले.त्यामुळे त्या जिल्ह्य़ातील कार्डधारक रॉकेलपासून वंचित राहणार आहेत.
आषाढी यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात सप्तमी ते पौर्णिमा या दहा ते बारा दिवसांच्या काळात वारकऱ्यांना स्वयंपाक करण्यासाठी २ लाख ५२ हजार लिटर रॉकेल उपलब्ध करण्यात आले आहे, असे पंढरपूर येथील जिल्हा आढावा बैठकीत सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र आषाढी वारीसाठी शासनाने रॉकेलचा अतिरिक्त कोटा मंजूर केला नाही, ही बाबा चौकशीअंती निदर्शनास आली. मागील आषाढी यात्रेकरिता रॉकेल कोटा मंजूर करून तो ५५ हॉकर्समार्फत वितरित करून वारकऱ्यांची सोय करण्यात आली होती.
एकीकडे पंढरीत येणाऱ्या वारकऱ्याच्या सोयीसुविधांकरिता शासन प्रयत्नशील आहे, असे सांगताना वारकऱ्यांसाठी मागणी करून देखील शासनाने रॉकेल कोटा मंजूर केला नाही. जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील, अप्पर जिल्हाधिकारी एम. जी. मांडुरके यांचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील नाडकर, सहायक पुरवठा अधिकारी अविनाश पुजारी, तहसीलदार शैलेश सूर्यवंशी, पुरवठा निरीक्षक संजय फडतरे या सर्वानी ग्राहक पंचायतीचे कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रॉकेल पुरविले. वारी तर अवघ्या तीन दिवसावर असताना कल्पना वापरून समर्थ अक्कलकोट १ टँकर, चंद्रकांत कंपनी- जेऊर २ टँकर, दीपक कंपनी- कुर्डूवाडी १ टँकर, भगवंत- बार्शी १, शुभ लक्ष्मी -मंगळवेढा, अकबर अली, व्ही. जी. कोले प्रत्येकी १. पंढरपूर, कोळे, सांगोलामध्ये जप्त करण्यात आलेला टँकर १, जगदंबा (करमाळा) १ असे मिळून १ लाख २० हजार दहा टँकरद्वारे उपलब्ध केले.
शिवाय सोनाडा टेंभुर्णी १, शहा घारसी अकलूज १, व्ही. जी. कोले १, अकबर अली १, जय मल्हार २, पंढरपूर असे ७२ हजार एकूण १ लाख ९२ हजार लिटर रॉकेल जिल्ह्य़ातील कोटय़ातून वारीकरिता पुरवठा करून वारकऱ्यांची सोय केली. परंतु शासनाकडे येथील तहसील कार्यालयाने वारीकरिता २ लाख ४ हजार लिटरची तसेच येथील सेवाभावी संघटना व पत्रकार यांनी आषाढी वारीकिरता ३ लाख लिटर रॉकेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे केली होती.