Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आषाढी यात्रा सोहळय़ाची गोपाळकाल्याने सांगता
पंढरपूर, ७ जुलै/वार्ताहर

 

आषाढी यात्रेच्या सोहळ्याची सांगता मंगळवारी पंढरपूरपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात सात मानाच्या पालख्या, इतर पालख्या, शेकडो दिंडय़ा, हजारो वारकरी यांच्या उपस्थितीत गोपाळकाला करण्यात येऊन झाली.
आषाढी एकादशी सोहळ्यास आलेल्या सर्वच संतांच्या पालख्या गोपाळपूर येथे काल्याकरता येतात. गोपाळपूर काल्यानेच आषाढी वारीची सांगता होते. काल्यासाठी पहाटे साडेतीनपासूनच पालख्या गोपाळपूरकडे विठ्ठलनामाचा गजर करत मार्गस्थ होत होत्या. ४ वाजता ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.
काल्याकरिता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सोपानकाका, संत दामाजीपंत, संत निवृत्तिनाथ या मानाच्या पालख्यांसोबत सर्वच पालख्या अन् हजारो वारकरी दिंडय़ा टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा गजर करत काल्यासाठी येताच सर्वाचे स्वागत गोपाळपूर ग्रामपंचायत सरपंच सविता गुरव, उपसरपंच क्षीरसागर यांनी केले. संत ज्ञानेश्वर पादुकांचे पूजन दिलीप गुरव व सौ. सुरेखा गुरव यांनी केले, तर संत तुकाराम महाराज पालखीपूजन विठ्ठल आसबे यांनी केले.
येथे आलेल्या प्रत्येक दिंडीकऱ्याचे काल्याचे कीर्तन होऊन लाह्य़ा-चुरमुरे यांचा काला एकमेकांना वाटण्यात येतो, तर ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या सर्वच वारकऱ्यांना काला दिला जातो. काल्यावरून परतल्यावर सर्व संतांच्या पालख्या देहू, आळंदी, पैठणकडे मार्गस्थ झाल्या. संतांच्या पालख्यांना निरोप देण्यासाठी शेकडो पंढरपूरकरांनी विसावा (इसबावी) येथपर्यंत चालत जाऊन निरोप दिला