Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कर्नाटक शासनाच्या वतीने पावसासाठी कृष्णा उगमस्थानी पूजा
महाबळेश्वर, ७ जुलै/वार्ताहर

 

गेला महिना-सव्वा महिना कर्नाटक राज्यात पाऊस न पडल्याने येथील नद्यांची, अलमट्टी धरणाची, तसेच नदीकाठी राहाणाऱ्या शेतकऱ्यांची अत्यंत गंभीर अवस्था झाली आहे. पाऊस भरपूर पडावा, कृष्णा नदी दुथडी भरून वाहावी, तसेच राज्यात सर्वत्र सुबत्ता नांदावी यासाठी कर्नाटक शासनाच्या जलसंधारण खात्यामार्फत ‘कृष्णा नदीचे’ उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात (शासकीय महापूजा) कर्नाटकचे माजी मंत्री व विद्यमान आमदार एस. के. बेल्लबी, तसेच इंडीचे आमदार डॉ. सार्वभौम बगली यांनी केली. या वेळी कृष्णाईच्या उगमस्थानी व पंचगंगा तीर्थाच्या कुंडामध्ये श्रीमती भागीरथी बगली व श्रीमती बेल्लबी यांच्या हस्ते ‘कृष्णाबाईची’ ओटी भरण्यात आली व गंगापूजन करण्यात आले.
महाआरती होऊन संपूर्ण राज्याच्या वतीने पाऊस पडण्यासाठी सामुदायिक प्रश्नर्थना करण्यात आली. या वेळी कर्नाटक राज्याच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धनाथ शिवण गुत्ती, बी. पी. हल्लुर, कृष्णाकाठ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते बसवराज कुंभार यांसह विजापूर, बागलकोट, बेळगाव, गुलबर्गा भागातील कृष्णाकाठी राहाणारे सुमारे ५०० नागरिक उपस्थित होते.
गेल्या वीस ते बावीस वर्षात कर्नाटक राज्यातील कृष्णेचा काठ कधी एवढा सुकला नव्हता. यामुळे कृष्णाकाठचा नागरिक, शेतकरी, तसेच सर्व राज्यच चिंतेत आहे. आमचे सरकार यावर उपाययोजना करतेच आहे. यासाठी कर्नाटक राज्यातील कृष्णाकाठची जनता, लोकप्रतिनिधी येथे कृष्णा नदीच्या उगमस्थानी उपस्थित राहिले. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रमध्ये भरपूर पाऊस पडून सर्वत्र सुबत्ता लाभावी यासाठी आज कर्नाटक शासनाच्या वतीने कृष्णेची शासकीय महापूजा करण्यात आली. अशीच परिस्थिती यापूर्वी १९८७-८८ साली आली होती. त्यावेळेही म्हणावा पाऊस पडला नव्हता. कर्नाटकात भरपूर पाऊस पडावा व सर्वत्र सुबत्ता यावी यासाठी प्रतिवर्षी राज्यामध्येच कृष्णा नदीच्या काठी शासनाच्या वतीने महापूजा केली जाते. मात्र यावर्षी परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केल्याने कृष्णा नदीची महापूजा तिच्या उगमस्थानी करण्याचे शासनाच्या वतीने ठरविले. यासाठी आमच्याबरोबर विजापूर, बागलकोट, बेळगाव, गुलबर्गा भागातील कृष्णाकाठचे सुमारे ५०० नागरिक उपस्थित आहेत, अशी माहितीही आ. बेल्लबी व आ. बगली यांनी दिली.
यावर्षी प्रथमच आमच्या शासनाच्या वतीने या पवित्र उगमस्थानी कृष्णाबाईची महापूजा झाली. पुढील वर्षी या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्रिगणही उपस्थित राहाणार असल्याचे आ. बेल्लबी व आ. बगली यांनी पत्रकारांना सांगितले.