Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अक्कलकोटला गुरुपौर्णिमेसाठी दीड लाखावर भाविकांची गर्दी
अक्कलकोट, ७ जुलै/वार्ताहर

 

गुरुपौर्णिमा मुहूर्तावर भक्तजनांचा जनसागर विश्वगुरु श्री दत्त अवतारी स्वामी समर्थाच्या चरणी वटवृक्षास्थळी नतमस्तक झाला. श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ महाराज की जय या नामघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली. सुमारे दीड लाख भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री दत्तात्रय विश्वगुरू मानले जातात. दत्तात्रय अवतार स्वामी समर्थानी २२ वर्षे वटवृक्षस्थळी निवास केला. अनेक अद्भुत लीला केल्या. अक्कटकोट येथील वटवृक्ष मंदिर स्वामी समर्थाचे मूळ पीठ आहे.
गुरुपौर्णिमा उत्सव वटवृक्ष मंदिरात मोठय़ा भक्तिभावाने साजरा झाला. पहाटे काकड आरती, नंतर देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब इंगळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता परंपरेप्रमाणे गुरुपूजन करण्यात आले. या वेळी सनईचौघडा निनादात हजारो भक्तजनांनी स्वामीनामाचा गगनभेदी जयघोष केला. महाराष्ट्रीयन पद्धतीचा फेटा धारण केलेली श्री स्वामी समर्थाची तेजस्वी मूर्ती नंदादीपांच्या प्रकाशात भक्तजनांना ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे जणू अभिवचन देत होती. स्वामी समर्थ दर्शनासाठी पहाटेपासूनच प्रचंड रांगा लागल्या. गुरुपौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर भक्तजनांची प्रचंड गर्दी झाल्याने निवास व्यवस्था अपुरी ठरली. शहरातील सर्व भक्तनिवास, शासकीय विश्रामगृहे, संस्थांची मंगल कार्यालये गर्दीने भरून गेली.
श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक झालेला जनसागर पाहून आनंदी झालेल्या मेघराजाने देखील जलसुरींचा अभिषेक केला. स्वामी समर्थाच्या अद्भुत लीलांचा एकमेव साक्षीदार असलेल्या प्रश्नचीन वटवृक्षाने आपल्या पर्णाची माला अर्पण केली. मोठय़ा भक्तिभावाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला.
भक्तांना सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब इंगळे, विश्वस्थ विलास फुटाणे, आत्माराम घाटगे, महेश इंगळे, दयानंद हिरेमठ, सौ. उज्ज्वला सरदेशमुख, राजेंद्र निलवावी, मंगेश जाधव, मंदार पुजारी आदी कार्यरत होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.