Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका मुख्याधिकाऱ्यांशी माजी नगरसेवकाची खडाजंगी
इचलकरंजी, ७ जुलै /वार्ताहर

 

थकबाकीच्या ना हरकत दाखला देण्यावरून मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील व माजी नगरसेवक हरिष लाटणे यांच्यात मंगळवारी जोरदार खडाजंगी झाली. या वादातून गळपट्टी धरण्याचा प्रकार घडल्याने त्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली. तथापि याबाबत दोघांनीही कोठेही तक्रार करणार नसल्याचे सांगून आपलीच भूमिका योग्य असल्याचे सांगितले.
प्रभाग क्रमांक १९ मधील पोटनिवडणूक लढविण्यासाठी माजी नगरसेवक हरिष लाटणे इच्छुक आहेत. घरातील महिलेस ते या निवडणुकीचा उमेदवार बनवणार आहेत. निवडणुकीसाठी पालिकेची थकीत देयके भरण्यासाठी ते बंधू सुहास लाटणे यांच्यासह पालिकेत आले होते. नगरपालिकेला कळवलेली थकबाकी त्यांना मान्य नव्हती. तथापि लाटणे यांनी थकबाकीपेक्षा जादा रक्कम भरतो ती नंतर एकूण थकबाकीतून कमी करावी आणि तसे पत्र पालिकेने द्यावे अशी इच्छा प्रकट केली. त्यासाठी त्यांनी जादा रक्कमेचा धनाकर्ष आणला होता. थकबाकीच्या विषयावरून मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील व हरिष लाटणे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. कर विभागाकडून आलेल्या माहितीच्या आधारे थकबाकी कळवली आहे. ती माझी वैयक्तिक नाही. त्यामुळे कर विभागाने कळवल्याप्रमाणे रक्कम भरल्याशिवाय ना हरकत देता येणार नाही अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. याबाबत पत्रकारांशी बोलताना दोघांनीही वाद होण्यास आपण कारणीभूत नसल्याचे सांगून परस्परांकडे बोट दाखवले. तर या निवडणुकीत आपण अपात्र ठरावे यासाठी मुख्याधिकारी अडवणुकीचे धोरण घेत असल्याची टीका लाटणे यांनी केली. त्याचे मुख्याधिकाऱ्यांनी खंडन केले.