Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

चुकीच्या उपचारांमुळे झालेल्या रुग्णाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
गडिहग्लज, ७ जुलै / वार्ताहर

 

येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने उपचार व शस्त्रक्रिया केल्यामुळे दगावलेल्या रुग्णाच्या मृत्यूची चौकशी व्हावी आणि बेजबाबदार डॉक्टरवर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन मृताचे नातेवाईक व हेब्बाळ जलद्याळचे ग्रामस्थ यांनी प्रश्नंताधिकाऱ्यांना आज दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, संजय तुकाराम करंबळेकर (रा. हेब्बाळ जलद्याळ, ता. गडिहग्लज) हे दोडामार्ग येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांचे वडील तुकाराम करंबळेकर यांनी शनिवारी येथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरने रुग्णाची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
संजय यांच्यावर अर्धवट शस्त्रक्रिया करून डॉक्टरने संजयचे वडील व नातेवाइकांना बोलावून घेऊन रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत उपचारास असमर्थता दर्शविली व पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. संजय यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले, पण त्यांचा रविवारी मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयातील डॉक्टरने बेजबाबदारपणे केलेली अर्धवट शस्त्रक्रियाच संजय यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असून, त्यांच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी व्हावी व त्यांच्या आई-वडिलांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मृताचे चुलते जोतिबा करंबळेकर यांच्यासह हेब्बाळ जलद्याळच्या ग्रामस्थांच्या सहय़ा आहेत. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.