Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वाळू ठेकेदाराकडून खंडणी घेणारा सरपंच गजाआड
इस्लामपूर, ७ जुलै/वार्ताहर

 

वाळू ठेकेदाराला धमकावून तब्बल एक लाख १५ हजार रुपयांची खंडणी घेणारा सरपंच व त्याचा साथीदार असे दोघे पोलिसांच्या हाती लागल्याचा खळबळजनक प्रकार वाळवा तालुक्यातील बनेवाडी गावात घडला.
तहसीलदार संदेश शिर्के यांनी दिलेल्या आदेशावरून इस्लामपूर पोलिसांनी बनेवाडीचे सरपंच दीपक सुबराव मोटे व त्याचा साथीदार पतंगराव धोत्रे या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केली. सरपंच दीपक मोटे याच्या भावाचे बनेवाडीत शासनमान्य स्वस्त धान्य दुकान आहे. मात्र या दुकानात रॉकेलचा काळाबाजार केला जात असल्याची तक्रार तहसीलदार शिर्के यांच्याकडे करण्यात आली होती.
या पाश्र्वभूमीवर तहसीलदार शिर्के यांनी मंगळवारी बनेवाडीस भेट दिली व स्वस्त धान्य दुकानातील गैरप्रकार उघडकीस आला. या वेळी ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता खराब होत असल्याची तक्रार केली व वाळू ठेकेदाराकडून रस्त्याच्या नुकसानीपोटी गावास काही महसूल देण्यास सांगावे, असे सुचविण्यात आले.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार शिर्के यांनी वाळू ठेकेदार प्रताप बाबुराव मोरे (रा. रेठरेहरणाक्ष) यांना बोलावून घेतले व त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून सरपंच दीपक मोटे यांनी उकळलेल्या खंडणीचा प्रकार उघडकीस आला.
सरंपच दीपक मोटे व त्याचा साथीदार अर्जुन धोत्रे या दोघांनी वाळू ठेका बेकायदा आहे, त्याविरोधात उपोषण करून ठेकाच रद्द करण्याची धमकी दिल्याचे ठेकेदार प्रताप मोरे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ठेका रद्द करण्याची धमकी देऊन ते पैशाची मागणी करू लागल्याने दि. २८ एप्रिल ते दि. ३० मे या कालावधीत रेठरेहरणाक्ष येथील राजारामबापू पाटील सहकारी बँक शाखेवरील दोन धनादेशाद्वारे तब्बल ९० हजार रुपयांची रक्कम अर्जुन धोत्रे व रोखीने २५ हजार रुपये दिल्याचे नमूद केले आहे.
इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तातडीने सरपंच दीपक मोटे व अर्जुन धोत्रे यांना अटक केली. सरपंच दीपक मोटे याला खंडणीप्रकरणी अटक केल्याने वाळवा तालुक्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.