Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबादच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास आक्षेप घेतल्यामुळे वाद
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी

 

औरंगाबाद येथे येत्या १०, ११ व १२ जुलै रोजी होणारे ८ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन बेकायदेशीर असून, त्यास अ. भा. मुस्लिम मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रश्न. फक्रोद्दीन बेन्नूर यांचा एकाधिकारशाही कारभार कारणीभूत असल्याचा आरोप परिषदेचे कथित सचिव प्रश्न. डॉ. अजीज नदाफ यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात आपण धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांचा हा आरोप प्रश्न. बेन्नूर यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.
तब्बल सात वर्षानंतर ८ वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन औरंगाबाद येथे होत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच वाद निर्माण होऊन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे बहुसंख्य पदाधिकारी वर्षापूर्वी बदलण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या या वादाला राजकारणाचा वास येत असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.
मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना १९९१ साली सोलापुरात झाल्यानंतर गेल्या १८ वर्षात या संस्थेची अवघी सात संमेलने होऊ शकली. यापूर्वी २००२ साली कोल्हापूर येथील सातव्या साहित्य संमेलनानंतर संस्थेला अक्षरश: अवकळा प्रश्नप्त झाल्याच्या पाश्र्वभूमीवर अलीकडे औरंगाबादच्या बैठकीत संस्थेत नवचैतन्य आणण्यासाठी संमेलन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी औरंगाबादकरांनी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या अनुषंगाने संस्थेचे बहुसंख्य पदाधिकारी बदलले गेले. यात सचिव प्रश्न. डॉ. नदाफ व खजिनदार एजाजहुसेन मुजावर यांना वगळण्यात आले. परंतु त्यानंतर एका वर्षाने डॉ. नदाफ यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रश्न. बेन्नूर यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करून संस्था औरंगाबादकरांच्या ताब्यात देण्यास विरोध केला. त्यांच्या मदतीसाठी परिषदेचे पहिले खजिनदार अ. लतीफ नल्लामंदू हे धावून आले आहेत. यापूर्वी नाशिकच्या सहाव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी झालेल्या परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नल्लामंदू यांना खजिनदारपदावरून मुक्त करून त्यांच्या जागी मुजावर यांची निवड करण्यात आली होती. त्या वेळी निर्णयप्रक्रियेत सचिव डॉ. नदाफ यांचा सहभाग होता. ही वस्तुस्थिती असताना आता संमेलनाच्या तोंडावर डॉ. नदाफ व नल्लामंदू यांची युती झाल्याबद्दल अध्यक्ष प्रश्न. बेन्नूर यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना डॉ. नदाफ व नल्लामंदू यांनी औरंगाबादच्या साहित्य संमेलनाला हरकत घेतली. औरंगाबाद येथे साहित्य संमेलन भरविणाऱ्या अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेशी आपल्या मूळ व खऱ्या संस्थेचा संबंध नाही. आपल्या संस्थेच्या नावाशी साधम्र्य असलेल्या दुसऱ्या संस्थेने जनतेची दिशाभूल करून मुस्लिम मराठी साहित्य संमेलन घेणे बेकायदेशीर आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवाल सादर न करताच नवे पदाधिकारी निवडणे आणि मूळ बँक खाते बदलून नवे खाते उघडणे आक्षेपार्ह असल्याचा आरोपही डॉ. नदाफ यांनी केला.