Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कराडला शिक्षक सोसायटीच्या सभेत गदारोळ
कराड, ७ जुलै/वार्ताहर

 

कराड-पाटण तालुका प्रश्नथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठय़ा गदारोळात पार पडली. सभासद वर्गणी वाढविण्याच्या मुद्दय़ावरून विरोधक व सत्ताधारी अशा सर्वच सभासदांनी संतप्त पवित्रा घेऊन सभागृह दणाणून सोडले. काही सभासदांमध्ये तूतू-मैमै होताना एकमेकांचे गचोटे पकडण्याचा प्रकार घडला. या धिंगाण्यामुळे महिला सभासदांनी सभागृहातून पळ काढला. तर हा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागल्याने एकंदरच शिक्षक सभासदांची सर्वत्र नाचक्की झाली.
शिक्षक सोसायटीच्या येथील सभागृहात आज सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कदम हे होते. सभेसमोरील ९ पैकी ६ विषयांवर किरकोळ बाचाबाची होऊन तोडगा निघाला. मात्र विषय क्रमांक ७ मध्ये समाविष्ट असलेल्या वर्गणी ४०० रुपयांवरून १००० रुपये करण्याच्या संचालक मंडळाच्या भूमिकेला सभासदांनी तीव्र विरोध केला. याचबरोबर व्याजदर कमी करण्याची मागणीही या सभासदांनी आक्रमकपणे लावून धरली आणि याविरुद्ध केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहच नव्हे, तर सारा परिसर दणाणून गेला होता.
सभासदात घोषणायुद्धाबरोबरच हमरी तुमरी असे प्रकार होऊन एकच राडा झाला. पाऊण तासानंतर हा गोंधळ शांत होऊन वर्गणी १००० रुपयांवरून ७०० रुपये करण्यास सभासदांनी संमती दिली.
या गोंधळामुळे प्रथमच सभागृहात पोलिसांना पाचारण करावे लागले. प्रथमच सर्व विषय व पोटनियम दुरुस्ती न होता सभा गुंडाळण्यात आली. व्याजदर कमी न करता वर्गणी वाढविल्याने सभासदांनी कमालीचा गोंधळ घातला. प्रथमच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा समोर आला, तर सभागृहातील धिंगाणा पाहून महिला सभासदांनी पळ काढला, अशा अनुचित प्रकारांनी कराड-पाटण तालुका प्रश्नथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा ५८ वर्षाच्या इतिहासात सावळा-गोंधळामुळे बहुचर्चित ठरली.