Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी ३३० कोटी
कोल्हापूर, ७ जुलै/विशेष प्रतिनिधी

 

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे, यावर्षी त्यासाठी ३३० कोटी रुपये उपलब्ध केले असून, याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी दिली असल्याचे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी सांगितले. राज्याचे वित्त सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या दालनात दिग्विजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी चर्चा केली. तत्पूर्वी पणन महिला व बालविकासमंत्री मदन पाटील यांच्याकडे याप्रश्नी चर्चा करण्यात आल्याचे खानविलकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही. राज्य शासनाकडून तरतूद होऊनही कर्मचाऱ्यांचे पगार थकित राहातात. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणे गरजेचे आहे. थकित मानधनासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेरावो घातला. हा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्य़ापुरता मर्यादित नसून राज्यव्यापी आहे. याबाबत त्वरेने निर्णय होणे गरजेचे असल्याचे खानविलकर यांनी श्रीवास्तव यांना सांगितले.
वित्त सचिव श्रीवास्तव यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा सुशीला कुलकर्णी, उपाध्यक्षा अलका जाधव, सचिव सुवर्णा तळेकर, खजिनदार शर्मिला कशाळकर, दत्तू आत्याळकर, मधुकर जांभळे, आप्पासाहेब धनवडे, बाळू पाटील यांचा समावेश होता.