Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वर्धापनदिन उत्साहात
अक्कलकोट, ७ जुलै/वार्ताहर

 

गुरुपौर्णिमा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. छत्रपती श्रीमंत शिवाजीराजे शाहू महाराज भोसले (सातारा) यांच्या हस्ते महापूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला.
गुरुपौर्णिमा वर्धापनदिनानिमित्त अभूतपूर्व पालखी सोहळा रथोत्सव मिरवणुकीत दहा हजार भक्तजन सहभागी झाले होते. गुरुपौर्णिमा १९८८ साली जन्मेजय भोसले यांनी श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना केली. यंदाच्या २२ व्या वर्धापनदिनी आदर्शवत सेवाकार्यामुळे अन्नछत्र मंडळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावारूपाला आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा सीमा भागात श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा तब्बल सहा महिने करण्याचा विक्रम अन्नछत्र मंडळाने केला आहे.
अन्नछत्र मंडळाचा परिसर भगव्या तोरण पताकांनी, नयनरम्य रोषणाईने सुशोभित करण्यात आला असून, शहरात स्वागत कमानी, स्वागत फलक लावण्यात आले आहेत. अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन गुरुपौर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळात श्री स्वामी समर्थाची महापूजा छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे शाहूमहाराज भोसले (सातारा) यांच्या हस्ते करून स्वामींना महाप्रसाद अर्पण करण्यात आला. या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे, विधानसभा संसदीय सचिव आमदार माई जगताप (मुंबई), सिनेअभिनेते मोहन जोशी (मुंबई), पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश जगताप (पुणे), आयकर अधिकारी ए. आर. चंद्रशेखरन (पुणे), अन्नछत्र विश्वस्त शिवाजीराव पिसे, उपाध्यक्ष शिवशंकर लिंबीतोटे, सचिव श्याम मोरे, अभय खोबरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोलराजे भोसले आदी उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आला, तर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार शाल, श्रीफळ, स्वामी समर्थ प्रतिमा आणि मानपत्र देऊन करण्यात आला.
भव्य पालखी सोहळा अन्नछत्र वर्धापनदिन गुरुपौर्णिमा निमित्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य पालखी मिरवणूक आणि रथोत्सव सोहळा साजरा झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज आणि स्वामी समर्थ प्रतिमा असलेला ‘गजराज’ लक्षवेधी ठरला होता. महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध प्रकारची वाद्ये, दिंडय़ा, भजनी मंडळे, मर्दानी खेळ दाखविणारी पथके, लोकनृत्य सादर करणारे कलावंत, सनई चौघडा, अश्वारूढ भगवा ध्वजधारी मावळे, यांच्यासह श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करीत सुमारे दहा हजार भक्त मिरवणुकीत सहभागी होते. पुष्पमालांनी सुशोभित पालखीत श्री स्वामी समर्थाची तेजस्वी प्रतिमा विराजमान होती.
छत्र, चामरे, शिंग, तुतारीच्या निनादाने वातावरण भक्तिमय झाले होते. मिरवणुकीत सर्वात शेवटी जन्मेजय भोसले यांनी आपले पिताश्री विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ स्वामी चरणी अर्पण केलेला चंदनाचा रथ होता. पुष्पमालांनी आणि विद्युद्दीपांनी तो सुशोभित करण्यात आला होता. त्यात स्वामी समर्थाचे भव्य तैलचित्र होते.
पालखी सोहळ्याचा शुभारंभ पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश जगताप यांच्या हस्ते झाला. या वेळी अध्यक्ष जन्मेजय भोसले, उपाध्यक्ष शिवशंकर लिंबीतोटे, सचिव श्याम मोरे, विश्वस्त शिवाजी पिसे, अभय खोबरे यांच्यासह दत्तात्रय जाधव, नगरसेवक अमोल शिंदे, अरुण कंगे, संजय नाईक, डॉ. मनोहर मोरे, भाऊराव घाटगे, लक्ष्मण पाटील, सतीश शिरसाट, सुनील पवार, शहाजी यादव, आप्पा हंचाटे, प्रवीण देशमुख, किरण साळुंके, कुमार सागरे, प्रशांत किलजे, श्रीशैल कुंभार, नाना मोरे, राजेश शिर्के, अमोल सोमवंशी, महेश शिर्के, आप्पासाहेब पुजारी तसेच हजारो भक्त सहभागी झाले होते.