Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

खरे ज्ञान देऊन मानवाचे कल्याण करणारा खरा गुरू-डॉ. उपाध्याय
सोलापूर, ७ जुलै/प्रतिनिधी

 

भारतात गुरू-शिष्य परंपरेला शास्त्रीय आधार आहे. परंतु आजच्या व्यावसायिक जमान्यात आध्यात्मिक क्षेत्रातील गुरूसुध्दा व्यावसायिक झाले आहेत. यात ढोंगीपणा वाढला आहे. त्याबद्दल खंत बाळगत खरा गुरू मानवाचे कल्याण करणारा आणि खरे ज्ञान देणारा असावा, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली.
मंगळवारी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्या सोलापुरातील कारकिर्दीस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप कार्यक्रम झाला. अध्यात्माचा गाढा अभ्यास असलेले डॉ. उपाध्याय यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विषद करताना मुक्तचिंतन केले.
ते म्हणाले की, आपला पहिला गुरू आई असते. तिने दिलेली शिकवण माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही. अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणारा श्रीकृष्ण हा महागुरू होय. सध्याच्या ‘मार्केटिंग’च्या जमान्यात गुरूसुध्दा व्यावसायिक झाले आहेत.
या व्यावसायिक गुरूंसाठी प्रवचनाच्या वेळी व्यासपीठासमोर सुरक्षेसाठी डी झोनसह बुलेटप्रूफ पोषाख आणि वाहनांची व्यवस्था करावी लागते. चुकीचे मार्गदर्शन करून समाजमनात विष पेरणाऱ्या आणि कोटय़वधींची संपत्ती मिळविणाऱ्या ढोंगी गुरूंचे प्रस्थ वाढल्यामुळे समाज व देशाचे काय होणार याबद्दल डॉ. उपाध्याय यांनी चिंता व्यक्त केली.
आपल्या वर्षभरातील कार्यकाळाविषयी पोलीस आयुक्तांनी समाधानाची भावना व्यक्त केली. जनतेचा थेट संबंध असलेल्या शासकीय यंत्रणांचे काम हळूहळू कठीण होत चालले आहे. जनजागृती व माहितीचा अधिकार कायद्यामुळे कारभार पारदर्शक ठेवणे क्रमप्रश्नप्त झाले आहे. यात भ्रष्ट व अकार्यक्षम अधिकाऱ्यांची अडचण होते, तर चांगल्या पारदर्शक अधिकाऱ्यांची विश्वासार्हता वाढते, असे ते म्हणाले.
प्रश्नरंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय दिवाणजी यांनी स्वागत केले.