Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात मतदार ओळखपत्रांचे काम वेगाने
कोल्हापूर, ७ जुलै / विशेष प्रतिनिधी

 

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदारांची ओळखपत्रे तयार करण्याचे काम जिल्ह्य़ात शिघ्रगतीने सुरू करण्यात आले आहे. यानुसार ३१ जुलै अखेर ९५ टक्क्य़ापेक्षा जास्त मतदारांच्या ओळखपत्रांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी कादबाने यांनी येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिल्ह्य़ात निवडणूक विभागाच्या वतीने ७ ते २२ जुलै या कालावधीत मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने रहिवाशाच्या पुराव्यासाठी भाडेपावती, रेशनकार्ड, लाईटबिल, फोन बिल, लग्नपत्रिका अथवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे आलेले पोस्टाचे पत्र स्वीकारण्यात येते. तथापि हे पुरावे जरी नसले तरी ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावयाचे आहे अशा व्यक्तीने जर स्वत: एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली तर संबंधितांचा अर्ज स्वीकारला जाईल आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी स्वत: प्रत्यक्ष जागेवर जाऊन पुराव्याची शहानिशा करून यादीत नांव समाविष्ट करतील असे कादबाने म्हणाले.
निवडणूक यादीमध्ये नवविवाहित महिला आणि वृध्द नागरिक यांच्या समावेशावेळी महिलांना सासरच्या शिधापत्रिकेवर नांव समाविष्ट नसणे आणि वृध्दांकडे वयाचा दाखला नसणे अशा अडचणी येतात. यामुळे हे मतदार मतदानाच्या हक्कापासून दूर राहात असल्याचा मोठा अनुभव असल्याचे नमूद करताना कादबाने म्हणाले, या दोन्ही प्रकारांसाठी आता मतदाराचे प्रतिज्ञापत्र पुरेसे आहे. केवळ या प्रतिज्ञापत्राआधारे त्यांचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्यांची छाननी विभागाचे अधिकारी स्वत: जागेवर जाऊन केल्यानंतर ही नांवेही समाविष्ट होतील असे ते म्हणाले. याखेरीज ज्या मतदारांची नांवे अद्यापही यादीत समाविष्ट नाहीत आणि त्यांची ओळखपत्रे काढण्यात आली नाहीत अशा मतदारांना आता ओळखपत्रे काढण्यासाठी विशिष्ट तारखेला शासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याची गरज नाही. कारण अशा मतदारांनी आपला मतदार यादीतील समावेशाच्या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र जोडण्याची सवलत निवडणूक आयोगाने दिली आहे. हा अर्ज प्रश्नप्त होताच निवडणूक विभागाचे अधिकारी जागेवर येऊन संबंधित अर्जाची छाननी करतील आणि आपोआपच त्याचे कार्ड तयार केले जाईल असे ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील दहा विधानसभा मतदारसंघात एकूण २५ लख ६६ हजार ३३६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ८४.८० टक्के मतदारांची ओळखपत्रे तयार करण्यात आली असून १५.२० टक्के मतदार ओळखपत्रापासून वंचित असल्याने त्यांची ओळखपत्रे तयार करण्याचा एक धडक कार्यक्रम निवडणूक विभागाने आखला आहे. या दहा विधानसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर दक्षिण (७७.८५ टक्के), कोल्हापूर उत्तर (७४.७१ टक्के) व इचलकरंजी (८३.९६ टक्के) या तीन विधानसभा मतदारसंघात ओळखपत्रांचे प्रमाण कमी आहे. या तीन मतदारसंघात एकत्रित दीड लाख मतदारांची ओळखपत्रे अद्याप बाकी असल्याने तेथे ७० डिजीटल कॅमेरे लावून मतदारांचे घरोघरी जाऊन फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंती ओळखपत्रांचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले.