Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

चार अंकी मिळकत पत्रिका रद्द
इचलकरंजी, ७ जुलै / वार्ताहर

 

चार अंकी मिळकत पत्रिका रद्द केल्या आहेत अशा मिळकत पत्रिकांचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगर भूमापन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भूमी अभिलेख अधीक्षक खामकर यांनी दिली. या निर्णयामुळे भूमापन कार्यालयातील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागल्याने मिळकत धारकांना दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजी नगरभूमापन खात्यातील अनागोंदी कारभाराबाबत १५ जून रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. परिणामी अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांनी आंदोलकांना बोलावून चर्चा करून मागण्या मान्य केल्या. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, राष्ट्रवादी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढोले आदी सहभागी झाले होते.
बैठकीतील अन्य निर्णय याप्रमाणे :- चार अंकी मिळकत पत्रिकेवरील नोंदी स्वत:हून पाच अंकी मिळकत पत्रिकेवर घेतल्या जात नाहीत. याबाबत नगर भूमापन अधिकाऱ्यांना आदेश काढले असून कार्यालयातील सर्व ६ परीक्षण भूमापकांना कामाचे वाटप करून दिले आहे. त्यांनी कोणत्या मिळकतीचे काम करण्याचे आहे तेही ठरवून दिलेले आहे.
ज्या मिळकत पत्रिकेवर चुका झाल्या असतील त्यांची दुरुस्ती अर्जाचा निपटारा होत नाही. अशा अर्जदारांच्या चुकांबाबत तक्रार असल्यास नगरभूमापन अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज स्वीकारून अहवाल सादर करावा. अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर हे महिन्यातून एक वेळा इचलकरंजी कार्यालयास भेट देऊन अशा प्रकरणांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करतील.
मिळकत पत्रिकेवरील क-१ सत्ता प्रकार असणाऱ्या मिळकती बिगर शेती झाल्यानंतर सत्ता प्रकारामध्ये क अशी दुरुस्ती वेळेवर करणेबाबत सक्षम प्रश्नधिकारी यांच्याकडून नियमित बिगरशेती आदेश मंजूर झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय विविध प्रकारच्या नोंदी, मोजणीसाठी चिरिमिरी, जुन्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांची दुरुस्ती याबाबतही खामकर यांनी निर्णय घेतला.