Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात घरफोडय़ांचे सत्र
कोल्हापूर, ७ जुलै / प्रतिनिधी

 

गेल्या चार दिवसांपासून अज्ञात चोरटय़ांनी शहराच्या विविध भागात घरफोडय़ांचे सत्र सुरू केले आहे. गुजरी परिसरातील सुवर्णकारांची पाच दुकाने एका रात्रीत फोडल्यानंतर चोरटय़ांनी रुईकर कॉलनी आणि नागाळा पार्क या परिसरात आणखी दोन ठिकाणी चोऱ्या करून रोख रकमेसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
नागाळा पार्क येथील नागोबाच्या मंदिराजवळ राहणारे भालचंद्र शिवप्रसाद परदेशी यांच्या घरात सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे आठच्या दरम्यान चोरी झाली. चोरटय़ांनी परदेशी यांच्या घरात मागच्या दारातून प्रवेश केला. घरातील तिजोरीत असलेले १ लाख २७ हजार रुपये व सोन्याचे दागिने लंपास केले. परदेशी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.
रुईकर कॉलनी येथील गौरीशंकर रेसिडेन्सीमध्ये राहणारे सुधीर बाबासाहेब देसाई यांचा फ्लॅट आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोडण्यात आला. फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून चोरटय़ांनी आत प्रवेश केला आणि रोख २० हजार रुपये आणि ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीची फिर्याद शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गेल्या आठवडय़ात शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका रात्रीत ९ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. तर रविवारी पहाटे गुजरी सराफ बाजारपेठेतील पाच दुकानांमध्ये चोरी झाली. या चोरीमध्ये १ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.