Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

२१ जुलैपासून महाराष्ट्र अंधारात बुडणार?
मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

राज्य वीज मंडळातील कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी यांची पगारवाढ आणि अन्य भत्त्यांबाबत विविध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीशी चर्चा करून व्यवस्थापनाने २० जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास २१ जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा कृती समितीने दिल्याने पाणीटंचाईबरोबरच राज्य अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाने पश्चिम घाटाकडे पाठ फिरविल्यानेच राज्यात पाणीटंचाई
अभिजित घोरपडे
पुणे, ७ जुलै

सर्वाधिक पावसाचा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदेश असलेल्या पश्चिम घाटाकडे या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. आषाढ महिना निम्मा संपला तरीही घाटातील आंबोली, महाबळेश्वर, ताम्हिणी, लोणावळा, त्र्यंबकेश्वर अशा सर्वच ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही. देशात ईशान्य भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यापाठोपाठ जास्त पावसासाठी पश्चिम घाटाचा क्रमांक लागतो. पश्चिम घाट हा किनारपट्टीला समांतर असा गुजरातपासून केरळपर्यंत पसरला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी
प्रकृती स्थिर
मुंबई, ७ जुलै/प्रतिनिधी
श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सोमवारी लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज दुपारी तातडीने अँजीओप्लास्टी करण्यात आली. ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन-तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, असे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले.

सहकाराचा ‘गड’ सर करण्यासाठी मुंडे-गडकरी यांच्यात संघर्ष!
संदीप प्रधान
मुंबई, ७ जुलै

भाजपचे विदर्भातील नेते नितीन गडकरी यांचा सहकार क्षेत्रातील ‘गड’ सर करण्याचा प्रयत्न त्याच पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. ‘आपण ही ढवळाढवळ सहन करणार नाही’, असा इशारा गडकरी यांनी दिला असल्याने भाजप पक्षांतर्गत संघर्ष सहकारातही सुरू झाल्याचे दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याकरिता गोपीनाथ मुंडे यांच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने आणि नितीन गडकरी यांच्या पूर्ती सहकारी साखर कारखान्याने निविदा दाखल केल्या असून मुंडे यांची निविदा अधिक दराची आहे.

‘मार्ड’चे डॉक्टर संपावर
शासकीय व महापालिका रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडणार
मुंबई, ७ जुलै / प्रतिनिधी

राज्यातील सरकारी आणि पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने आज रात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील शासकीय व महापालिका रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडणार आहे. निवासी डॉक्टरांची प्रतिनिधिक संघटना असलेल्या मार्डने संपाची हाक दिली आहे. आज मार्डच्या प्रतिनिधींची राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत मागण्यांबाबत आज चर्चा झाली . मात्र काही तोडगा न निघाल्यामुळे मार्डने संप पुकारण्याचा निर्णय घेतला, असे मार्डचे अध्यक्ष डॉ.जीवन राजपूत यांनी सांगितले. सवरेच्य न्यायालयाने निवासी डॉक्टरांना काय सुविधा द्याव्यात, या विषयी काही निर्देश दिले आहेत. मात्र त्याची राज्यात अंमलबवणी होत नाही, अशी मार्डची तक्रार आहे. दिल्ली येथील निवासी डॉक्टरांना आठ तास सेवा केल्यानंतर ४५ हजार रुपये महिन्याला पगार मिळतो तर राज्यातील डॉक्टरांना २४ तास सेवा दिल्यानंतरही महिन्याला फक्त १५ हजार रुपये मिळतात, असे डॉ. राजपूत यांनी सांगितले. शिवाय निवासी डॉक्टरांच्या निवास्थानाबाबत राज्य सरकारचे काहीच धोरण नाही. निवासी डॉक्टरांचे उमेदीचे वय रुग्णालयात २४ तास सेवा देण्यात जाते. त्याबद्दल्यात या डॉक्टरांना किमान सुविधाही मिळत नाहीत, अशी डॉ. राजपूत यांची तक्रार आहे. आम्ही केवळ आमच्या सोयीसुविधांसाठी संपावर जात नाही तर रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी आम्हाला संपावर जावे लागत आहे, असा दावा डॉ. राजपूत यांनी केला.

राजीव गांधी यांच्या नावाची अधिसूचना आज!
समर खडस
मुंबई, ७ जुलै

वांद्रे-वरळी सागरी पुलाला राजीव गांधी यांचे नाव देण्याबाबतची अधिसूचना उद्या निघणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (विशेष प्रकल्प) डॉ. विमल मुंदडा यांनी आज सांगितले. या पुलाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सेना-भाजपने केली असून त्यासाठी या पक्षांतर्फे निदर्शने करण्यात आली होती. त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव पुलाला देण्याची प्रक्रिया काही दिवसांसाठी लांबविली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता उद्या अधिसूचना निघणार असल्याने उद्यापासूनच हा पूल राजीव गांधी सागरी सेतू या नावाने ओळखला जाईल.
या पुलाला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, अशी सूचना या पुलाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा शरद पवार यांचा काँग्रेसला टाकलेला गुगली आहे की, स्वत शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर घातलेले लोटांगण आहे, या विषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्काना उधाण आले होते. प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी हे नाव सुचविल्यानंतरही नाव देण्याची प्रक्रिया मात्र सुरू होत नव्हती. हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणण्यात येईल, असे काही अधिकारी सांगत होते. मात्र असा नामकरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर येण्याची काही गरज नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर या पुलाच्या नावाबाबतचा प्रस्ताव असणार किंवा कसे, याबाबतही आज मंत्रालय परिसरात तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या विषयपत्रिकेमध्ये हा प्रस्ताव नाही. मात्र उद्याच याबाबतची अधिसूचना निघणार असल्याने आता याबाबतच्या चर्चा थांबणार आहेत. डॉ. विमल मुंदडा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, हा विषय स्वत मुख्यमंत्री व संबंधित खात्याची मंत्री म्हणून मी अशा दोघांच्याही अखत्यारीतला असून या विषयीची अधिसूचना उद्या निघणार आहे.

विलासराव व वेंगसरकर उपाध्यक्षपदी बिनविरोध
मुंबई, ७ जुलै / क्री. प्र.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदासाठीची निवडणूकही बिनविरोध होणार आहे. केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शरद पवार यांच्या गटासोबत न राहता स्वतंत्रपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बाळ महाडदळकर गटाचे रवी सावंत, यांचा मदतीचा हात स्वीकारल्याचे वृत्त आहे. उपाध्यक्षपदाचे प्रबळ उमेदवार श्रीपाद हळबे, रवी मांद्रेकर आणि प्रवीण बर्वे यांनी विलासराव यांना संधी मिळावी यासाठी आज माघार घेतली. त्यामुळे विलासराव देशमुख यांची उपाध्यक्षपदाची निवड निश्चित झाली. उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचीही निवड त्यामुळे निश्चित झाली.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी