Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्र औरंगाबादेत उभारणार
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची घोषणा
औरंगाबाद, ७ जुलै/खास प्रतिनिधी
मराठवाडय़ातील स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या उत्पादनाचे कायमचे प्रदर्शन असावे या हेतूने औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. ‘मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’च्या वार्षिक सभेत श्री. चव्हाण बोलत होते. तापडिया नाटय़मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास महापौर विजया रहाटकर, आमदार राजेंद्र दर्डा, डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख व सतीश चव्हाण, उद्योग खात्याचे प्रधान सचिव अजीज खान, चेंबरचे अध्यक्ष सचिन मुळे, सचिव आशीष गर्दे, मावळते अध्यक्ष उमेश दाशरथी, सचिव मुकुंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष उल्हास गवळी आदी उपस्थित होते.

नाकारलेल्यांचा स्वीकार!
प्रदीप नणंदकर
लातूर, ७ जुलै

समाजातील उपेक्षित, नाकारलेल्यांना सहसा कोणी जवळ करण्याचे धाडस करत नाही. क्वचितप्रसंगी थोडीबहुत आर्थिक मदत करण्याचे औदार्य दाखविले जाते एवढेच. अशा मंडळींसाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्यांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असते.

उस्मानाबाद जिल्हा बँकेसाठी ८३ टक्के मतदान
उस्मानाबाद, ७ जुलै/वार्ताहर

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज सरासरी ८२.९ टक्के मतदान झाले. एकूण १ हजार ४८६ सभासदांपैकी १ हजार २३२ जणांनी मतदान केले. आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर आलिशान गाडय़ांतून मतदारांना घेऊन येणे आणि आपल्या बाजूने मतदान करून घेणे यासाठी दोन्ही आघाडय़ांनी मतदारांची चांगलीच सरबराई केली. दिवसभरात कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.तब्बल १० वर्षांनंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ५७ उमेदवार रिंगणात होते.

कार्यकारी अभियंत्यास मारहाण; ‘लेखणी बंद’ आंदोलन
बीड, ७ जुलै/वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माधव रामाजी खवास यांना जिल्हा परिषद सदस्य महिलेच्या पतीने काल बेदम मारहाण केली. नाकावर ठोसा मारल्याने जखमी झालेल्या खवास यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.

बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी
परभणी, ७ जुलै/वार्ताहर

पालम तालुक्यातील उमरा येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात आज दोन जण गंभीर जखमी झाले.
उमरा येथील तानाजी गोविंदराव शिंदे (वय २५) सकाळी साडेसहाच्या सुमारास गावालगत असलेल्या विहिरीवरून पाणी घेऊन येत होता. विहिरीपासून काही अंतरावर बिबटय़ाने अचानक हल्ला करून त्याच्या डोक्यावर चावा घेऊन व पंजे मारून जखमी केले.

पावसाने सारेच सुखावले
नांदेड, ७ जुलै/वार्ताहर
जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने सर्वसामान्यांसह शेतकरी सुखावला असून सर्वात जास्त पावसाची नोंद हदगाव तालुक्यात झाली. दरम्यान, अर्धापूर तालुक्यात वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सात वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडली. जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. काल रात्री सुरू झालेला पाऊस आज दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला, असे सांगण्यात आले.

डाळी कडाडल्या
हरिहर धुतमल
लोहा, ७ जुलै

पाऊस लांबल्यामुळे सामान्य जनतेला महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तीव्र पाणीटंचाईची समस्या उद्भवली असून मजुरांच्या हाताला काम नाही; दुसरीकडे धान्याचे भाव कडाडले आहेत. तूर डाळ ८० रुपये किलो झाली असून, मूग डाळ ६० रुपये किलो आहे. दुसरीकडे शेतमालाचा भाव वाढला आहे. तूर ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये क्विंटल व हळद चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल दराने विकली जात आहे.

दोन्ही तरोडा महापालिकेमध्ये; सहा महिन्यांत निवडणूक
समावेशाची अधिसूचना
नांदेड, ७ जुलै/वार्ताहर
शहरालगत असलेल्या तरोडा खुर्द व तरोडा बुद्रुक ही दोन गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज महानगरपालिका प्रशासनाला पत्र पाठवून निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती मागवली आहे. आगामी सहा महिन्यांच्या आत या भागासाठी निवडणूक होईल, असे सांगण्यात आले.

मानसीच्या खुनाची चौकशी सीआयडीकडे देण्याची संघर्ष समितीची मागणी
खरे आरोपी मोकळेच असल्याचा आरोप
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
मानसी देशपांडे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे खरे नसून, त्यांच्याकडून पोलीस गुन्हा केल्याचे वदवून घेत आहेत. मानसीच्या खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) किंवा केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) यांच्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

दिमाखदार बैलगाडी
ज्ञानोबा सुरवसे
परळी वैजनाथ, ७ जुलै

‘चल रे राजा चल रे सर्जा
बिगी बिगी
वाट वाकडी दाट झाडाची, चालली गाडी घुंगराची!
वाट लागली डोंगराची, गाडी चालली घुंगराची!
घुंगराचा खळखळाट करत पहाटेच्या प्रहारी शेत शिवाराची पाऊलवाट पकडणारी बैलगाडी आज एकविसाव्या शतकातही चालू आहे.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा मानसीवर बलात्कार झाला नसल्याचा निर्वाळा
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी

खून करण्यापूर्वी मानसी देशपांडेवर बलात्कार झालेला नाही, असा निर्वाळा न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे. तो अहवाल आज मिळाला. शहरातील अहिंसानगरमध्ये राहणाऱ्या मानसीचा १२ जूनला खून झाला. बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.मानसीच्या पोटातील अन्नांश (व्हिसेरा) मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्या अहवालाकडे पोलिसांसह नागरिकांच्याही नजरा लागून होत्या. लवकरात लवकर हा अहवाल देण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी केली होती. आज दुपारी हा अहवाल प्राप्त झाला असल्याचे जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी सोपानराव बोरसे यांनी सांगितले. मानसीवर बलात्कार झालेला नाही, असे त्या अहवालात म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. हा अहवाल अभ्यासासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला असून त्यावर ते उद्या (बुधवारी) अभिप्राय देणार आहेत, असेही श्री. बोरसे यांनी सांगितले.मानसीच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलनेही झाली. पोलिसांनी अट्टल घरफोडय़ा जावेदखान हबीबखान उर्फ टिंगऱ्या अटक केली. त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांनाही पकडण्यात आले होते. टिंगऱ्या चोरीच्या उद्देशाने मानसीच्या खोलीत गेला. तिला जाग आली, ती ओरडेल म्हणून म्हणून त्याने मानसीला ठार केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचे निधन
हिंगोली, ७ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील कन्हेरगाव नाका येथील अशोक तुकाराम ठाकरे (वय २५) याचे दुर्धर आजाराने रविवारी निधन झाले. निधनाचा शोक अनावर झाल्याने मुलाची सावत्र आई इंदू ठाकरे यांनी २४ तासांतच प्राण सोडल्याची घटना घडली. तुकाराम ठाकरे हे मुळचे वाढोणा येथील रहिवासी आहेत. ते आडगाव शाळेचे केंद्रप्रमुख आहेत. ते कन्हेरगाव नाका येथे राहतात. त्यांचा मुलगा अशोक ठाकरे याचा रविवारी सकाळी दुर्धर आजाराने मृत्यू झाला. त्याच्यावर वाढोणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. मुलाच्या निधनाचा शोक अनावर झाल्याने त्याची सावत्र आई इंदू यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना वाशीम येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार
परभणी, ७ जुलै/वार्ताहर
चोरी, घरफोडीच्या गुन्ह्य़ांत अटक केलेल्या आरोपीने नैसर्गिक विधीचे निमित्त करून आज पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या! तो पोलीस ठाण्यातून पळून गेला.अनेक गुन्ह्य़ांत अडकलेला आरोपी शेख अजीम शेख लाल (माजलगाव) याला चोरीच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्य़ातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. नानलपेठ पोलिसांनाही हा आरोपी हवा होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कोतवालीत धडकले असता तिथे पोहोचण्यापूर्वीच शेख अजीम याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. नैसर्गिक विधीचे निमित्त करून पसार झालेल्या शेख अजीम याने पोलिसांना गुंगारा दिला.

मुलीची छेड काढल्याने दोन सख्ख्या भावांना अटक
मानवत, ७ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील उक्कलगाव शिवारात सायकलवर जाणाऱ्या शाळकरी मुलीची छेड काढल्याच्या गुन्ह्य़ातील आरोपी साजिद अब्दुल कुरेशी (वय १९) व समीर अब्दुल कुरेशी (वय १९) या दोन सख्ख्या भावांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. एक अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. वरील तिघांनी शनिवारी सायंकाळी मानवतहून सायकलवर शाळेतून आपल्या गावी जाणाऱ्या शाळकरी मुलीस मोटारसायकलने पाठलाग करून गाठले आणि गावाच्या शिवारात ती एकटी पाहून तिच्याशी लज्जास्पद वर्तणूक केली. तनिे घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पालकांनी काल रात्री फिर्याद दिल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गेल्या वर्षी १८ ऑगस्टलादेखील येथील बसस्थानकावर शाळकरी मुलींच्या छेडछाडीवरून मारामारी झाली होती.

सराफी दुकानास आग
अंबाजोगाई, ७ जुलै/वार्ताहर
बसस्थानकशेजारी असलेल्या ‘उज्ज्वल ज्वेलर्स’ या सोन्या-चांदीच्या दुकानातील गॅसच्या टाकीतून गळती सुरू झाल्याने आज सायं. ६ च्या सुमारास आग लागली. यात जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. शहरात विविध धंद्यांसाठी घरगुती गॅस वापर सुरू आहे. बसस्थानकासमोरील सावरकर चौकातील उज्ज्वल ज्वेलर्स भिकु जिरे यांच्या मालकीच्या दुकानात आज गॅसगळती सुरू होऊन सोन्या-चांदीच्या दुकानातील फर्निचरला आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली. यात ६० हजार रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले. जीवितहानी झाली नाही.

विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू
बीड, ७ जुलै/वार्ताहर
शेतात पाईप आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा कुंपणाच्या तारेमध्ये उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत बेलखंडी येथेही विजेचा धक्याने एकजण मरण पावला. दुसऱ्या घटनेत विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला. तालुक्यातील करचुंडी येथील रघुनाथ कुलगडे (वय ५०) आज शेतात पाईप आणण्यासाठी गेले होते. शेजारील शेताच्या तारेच्या कुंपणामध्ये उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. बेलखंडी येथील ईश्वर ऊर्फ रामभाऊ सावंत (वय ३६) हे शेतातील रविवारी विहिरीवर पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. पावसामुळे मोटारीमध्ये वीजप्रवाह उतरल्याने मोटार चालू करताच त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत भोपा येथील मेहराज विक्रम वाघचौरे (वय १७) हा सकाळी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने मरण पावला.

संत नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
येत्या २० जुलैला संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी असून यानिमित्त अखिल भारतीय क्षत्रिय आहिर शिंपी समाज औरंगाबाद शाखेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराध्यक्ष दिलीप प्रभाकर ब्रrो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सत्यनारायण महापुजेनंतर संत नामदेव यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विष्णूनगरातील शिवशंकर मंगल कार्यालयात होणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहरातील समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ब्रrो यांनी केले आहे.

धनादेशात खाडाखोड करून साडेतीन लाखांची अफरातफर
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
तहसील कार्यालयातून संजय गांधी निराधार योजनेचे धनादेश पळविल्यानंतर त्यावर खाडाखोड करून ३ लाख ४३ हजार रुपयांची अफरातफर करण्यात आली असल्याची तक्रार तहसील कार्यालयाकडून पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पंचशिला सुरेश धनराज, दिगंबर हरिबा, हिरकणाबाई सखाराम पाटील आणि आणि इतर २० जणांनी ही अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १८ जानेवारी ते १० जून या काळातील हा प्रकार आहे. आरोपींनी तहसील कार्यालयातून गर्दीचा फायदा घेऊन पाच धनादेश पळविले. हे धनादेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा कचनेर या नावाचे होते. मात्र आरोपींनी त्यात खाडाखोड करून ते जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा जवाहर कॉलनी आणि चिकलठाणा, हर्सूल, अदालत मार्ग अशी खाडाखोड करून परस्पर रक्कम काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

यश फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
यश फाऊंडेशन या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या संस्थेतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे.पहिला गट- (८ वी ते १०वी)- १) नको रे बाबा ‘बोर्डा’ची परीक्षा, २) पर्यावरणाचा ऱ्हास अन् माणसाचा विकास?, ३) चलो स्कूल चले हम. दुसरा गट- ११ ते पदवी- १) मी शेतकऱ्याचा मुलगा बोलतोय!, २) पाणी पाणी रे.., ३) वाढती गुंडगिरी आणि उपाय.तिसरा गट- पदवी ते पदव्युत्तर- १) विद्यार्थी चळवळ आणि राजकारण, २) उदंड झाल्या ‘पदव्या’, नोकऱ्यांचे काय?, ३) प्राथमिक शिक्षण- शासन आणि आपण. वरील विषयावरील निबंध १५ जुलैपर्यंत यश फाऊंडेशन, आकार रेसिडेन्सी, ४, वसुंधरा कॉलनी, नंदनवन कॉलनीच्या मागे, औरंगाबाद येथे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

चोराकडून दहा मोबाईल जप्त
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या जमील मुन्सी पठाण (वय २३, मिसारवाडी) या मोबाईलचोराकडून गुन्हे शाखेच्या पथकाने दहा मोबाईल जप्त केले आहे. हे मोबाईल विक्रीसाठी नेत असताना त्याला सापळा लावून अटक करण्यात आली.जमील हा चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने कनॉट प्लेस परिसरात सापळा लावला होता. जमील तेथे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल आढळून आले. जमीलला सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

‘मसाप’च्या ‘स्वागत’मध्ये डॉ. बालाजी नागटिळक
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्वागत या उपक्रमांतर्गत येत्या शनिवारी (११ जुलै) सायंकाळी ६ वाजता कवी डॉ. बालाजी नागटिळक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. नागटिळक हे येथील सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख आहेत. त्यांचा ‘आयुष्य कोरण्यासाठी’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवोदित लेखकाच्या लेखननिर्मितीची प्रेरणा, त्यांनी हाताळलेल्या साहित्य प्रकाराविषयी त्यांची आस्था व लेखकांची जीवनदृष्टी या संबंधाने लेखक स्वत: रसिकांसमोर निवेदन करतो.

बीपीएडचा निकाल ६८.१६ टक्के
औरंगाबाद, ७ जुलै/खास प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.) परीक्षेचा निकाल ६८.१६ टक्के लागला आहे. या परीक्षेस बसलेल्या ६९१ विद्यार्थ्यांपैकी ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

औरंगाबादमध्ये पावसाची हजेरी
औरंगाबाद, ७ जुलै/प्रतिनिधी
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने औरंगाबाद शहर आणि परिसरात आज सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर परिसरातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागला असून या पावसामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यास अटक
उस्मानाबाद, ७ जुलै/वार्ताहर
अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या अण्णासाहेब बाबुराव थोरात (वय २५) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. कळंब तालुक्यातील धारगाव येथे सोमवारी छापा घालून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून एक तलवार व बंदूक जप्त करण्यात आली. शिराढोण पोलीस ठाण्यात त्याच्यवर गुन्हा नोंदविला आहे.

तलाठय़ाला शिवीगाळ
बीड, ७ जुलै/वार्ताहर

पाटोदा येथे रामराव गुणाजी राख हे तलाठी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेबाबतच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी कादर उस्मान पठाण यांनी बैठकीत येऊन राख यांना, ‘तुम्ही लोकांची कामे करीत नाहीत,’ असे बजावत शिवीगाळ करून कागदपत्रे हिसकाविण्याचा प्रयत्न केला. पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुंडलिक जिंकलवाड यांचे निधन
मानवत, ७ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील सावळी येथील प्राथमिक शिक्षक पुंडलिक जिंकलवाड यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते २५ वर्षांचे होते. जिंकलवाड यांचे १७ मे रोजी लग्न झाले. लग्नाच्या केवळ ५० व्या दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातली. काल सायंकाळी शाळेत मुलांना मैदानावर खो-खो शिकवीत असताना अचानक छातीत दुखू लागले. ते रुग्णालयात गेले. तेथे ते जमिनीवर कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी नांदेड जिल्ह्य़ातील कलंबर या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

समाधानकारक पावसामुळे बोरी परिसरात पेरणीस सुरुवात
बोरी, ७ जुलै/वार्ताहर
बऱ्याच दिवसांपासून वाट पहायला लावणाऱ्या वरुणराजाने अखेर बोरी व परिसरात हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. रविवार व सोमवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आजपासून पेरणीस सुरुवात केली आहे. काल, सोमवारी रात्री भिज पाऊस पडल्याने पेरणीच्या लगीनघाईत शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. बोरीसह कौसडी, दुधगाव, आसेगाव, वस्सा, कुपटा सर्कलमध्ये समाधानकारक पाऊस झाला. रविवारी बोरीजवळील करपरा नदीला पाणी आले होते. आहे.

‘उपेक्षित घटकांना सामावून घेण्याचे संस्कार पाल्यांवर करावे’
गंगाखेड, ७ जुलै/वार्ताहर
समाजातील उपेक्षित घटकांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची वृत्ती जोपासून पाल्यांवरही हेच संस्कार करावेत, असे आवाहन परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे यांनी केले. पूजा मंगल कार्यालयात आयोजित लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात श्री. खैरे बोलत होते. या वेळी लायन्सचे माजी प्रांतपाल के. सी. पारीख, डॉ. अनिल कांबळे, पोलीस निरीक्षक सतीश देशमुख आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल घुले, सचिव ज्ञानेश्वर महाजन, कोषाध्यक्ष विश्वंभर कुलकर्णी यांना शपथ देण्यात आली. मावळते अध्यक्ष संतोष मुंडे, प्रा. व्यंकट कांदे कार्यक्रमास उपस्थित होते.

धारूरमध्ये पावसाअभावी शेतकरी हवालदिल
धारूर, ७ जुलै/वार्ताहर

चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने वेळेवर पेरण्या होणार की नाही, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मृगनक्षत्रात पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु मृगाबरोबर आद्र्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार दिवसांपासून काळेकुट्ट ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. पावसाचा मात्र थेंबही पडत नाही. आभाळ भरून येत असल्याने पाऊस आज-उद्या पडेल या आशेवरच शेतकरी समाधान मानत आहे. मोठय़ा किमतीचे बी-बियाणे, खत खरेदी करून ठेवल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गुरुपौर्णिमेनिमित्त सेलूकर महाराजांच्या समाधीवर भक्तांची रीघ
गंगाखेड, ७ जुलै/वार्ताहर

मराठवाडय़ासह राज्यातील हजारो शिष्यांनी मंगळवारी शहरातील यज्ञभूमी येथे गुरुवर्य रंगनाथकृष्ण सेलूकर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत याज्ञवल्क्य यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांचे आशीर्वाद घेतले. गुरुपौर्णिमेनिमित्त आज सकाळपासून यज्ञभूमी येथे याज्ञवल्क्य यज्ञेश्वर सेलूकर महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिष्यांनी तोबा गर्दी केली होती. मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागांतून गुरूंच्या आशीर्वादासाठी शिष्यांनी आपली हजेरी लावली.

पावसासाठी वरुणराजाला महिलांचे साकडे
लोहा, ७ जुलै/वार्ताहर
तब्बल एक महिना लोटल्यानंतरही पाऊस समाधानकारक झाला नाही त्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. दुष्काळाच्या गडद छायेत बाजारातील खरेदीदारांची गर्दी कमी झाली आहे. पाऊस पडावा यासाठी जागोजागी देवाकडे साकडे घालून अन्नदान केले जात आहे, तर धोंडी धोंडी पाणी दे म्हणत महिला वरुणराजाला साकडे घालत आहेत. मृग नक्षत्रानंतर तब्बल एक महिना उलटला तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. रोज आकाशात काळे ढग दाटून येतात, पण वाऱ्याच्या झोताने ढग न बरसताच पुढे जात आहेत. प्रत्येक दिवशी पावसाची आतूरतेने वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे. पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. वरुणराजाला साकडे घालण्यासाठी जागोजागी अन्नदान केले जात आहे. गल्लोगल्ली अन्नाचा भंडारा करून जेवण दिले जात आहे. महिला मोठय़ा संख्येने देवाला पाऊस पाडा, अशी प्रार्थना करीत सकाळी पाणी घालत आहेत. पावसाच्या ओढीमुळे जनजीवनावर परिणाम झाला असून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. चारा डेपोही त्वरित सुरू करावेत, अशी मागणी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केली.

जालन्याला १४ जुलैपासून पांचजन्य व्याख्यानमाला
जालना, ७ जुलै/वार्ताहर
पांचजन्य व्याख्यानमाला येत्या दि. १४ ते १६ या काळात आयोजित करण्यात आली आहे. यात तीन व्याख्याने होतील. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १४ जुलैला सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक (मुंबई) ‘केंद्रीय अर्थसंकल्प चिकित्सा व भविष्यातील गुंतवणूक’ या विषयावर गुंफतील. दि. १५ला मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्रबुद्धे यांचे ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान होईल. दि. १६ला भटके-विमुक्त विकोस परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा व गुजरात क्षेत्राचे बौद्धिकप्रमुख दादा उपाख्य भिकुजी इदाते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदुत्व’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतील.ही तिन्ही व्याख्याने कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात रोज सायंकाळी ६.३० वाजता सुरू होतील. व्याख्यानांना उपस्थित राहाण्याचे आवाहन पांचजन्य व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. जुगलकिशोर भाला यांनी केली आहे.

दूषित पाण्यामुळे गंगाखेड तालुक्यात गॅस्ट्रोची साथ
गंगाखेड, ७ जुलै/वार्ताहर

पिण्याच्या दूषित पाण्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गॅस्ट्रो झालेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे.गेल्या आठवडय़ात केवळ उपजिल्हा रुग्णालयात गॅस्ट्रो झालेल्या १५० रुग्णांनी उपचार घेतले. सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ४० ते ४५ आहे. खासगी व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयात दररोज किमान १५ ते २० रुग्ण गॅस्ट्रोची लागण झालेले उपचारासाठी दाखल होत आहेत.उपजिल्हा रु ग्णालयात संपर्क साधला असता प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर ब्याळे यांनी शहरासह तालुक्यात गॅस्ट्रोची साथ आल्याचे मान्य केले. उपजिल्हा रुग्णालयासह बहुतांश प्राथमिक आरोग्य कें द्रांवर सलाईनच्या बाटल्यांची तीव्र टंचाई आहे. गॅस्ट्रोच्या साथीवर जिल्हा प्रशासनावरील जबाबदार अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बॅडमिंटन स्पर्धा
नांदेड, ७ जुलै/वार्ताहर

दर वर्षीप्रमाणे यंदाही कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बॅडमिंटन संघटना व महानगरपालिका यांनी मुला-मुलींची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेला शुक्रवारी (दि. १०) सुरुवात होईल व ती सोमवापर्यंत (दि. १३) चालेल. स्पर्धेत साधारणत: ८०० स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. नांदेडचे महापौर प्रकाश मुथा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डी. पी. सावंत असतील. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर डॉ. शीला कदम उपस्थित राहतील.स्पर्धेचे परितोषिक वितरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नामांकित खेळाडू सायना नेहवाल व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.