Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाने पश्चिम घाटाकडे पाठ फिरविल्यानेच राज्यात पाणीटंचाई
अभिजित घोरपडे
पुणे, ७ जुलै

 

सर्वाधिक पावसाचा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रदेश असलेल्या पश्चिम घाटाकडे या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. आषाढ महिना निम्मा संपला तरीही घाटातील आंबोली, महाबळेश्वर, ताम्हिणी, लोणावळा, त्र्यंबकेश्वर अशा सर्वच ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही.
देशात ईशान्य भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यापाठोपाठ जास्त पावसासाठी पश्चिम घाटाचा क्रमांक लागतो. पश्चिम घाट हा किनारपट्टीला समांतर असा गुजरातपासून केरळपर्यंत पसरला आहे. त्यातही महाराष्ट्रात नाशिकपासून कोल्हापूपर्यंत त्याचे अस्तित्व ठळकपणे आहे. त्यामुळे येथे पावसाचे प्रमाण मोठे आहे. महाबळेश्वर येथे वर्षांला सरासरी ५८८० मिलिमीटर इतका पाऊस पडतो, तर गगनबावडा, आंबोली येथे तो ६००० मिलिमीटरचा टप्पा ओलांडतो. महाराष्ट्राच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे अरबी समुद्रावरून येणारे वारे कोकणमार्गे येऊन या घाटांना अडतात व तेथे घाटमाथ्यावर मोठा पाऊस होतो. त्यामुळेच राज्यात इतरत्र नाममात्र पाऊस असताना घाटात मुसळधार पाऊस असतो.
या वर्षी मात्र या घाटाकडेच पावसाने पाठ फिरवली आहे. महाबळेश्वर येथे १ जूनपासून जुलैचा पहिला आठवडा संपेपर्यंत तब्बल १५०० मिलिमीटर पावसाची नोंद होते. या वेळी मात्र तिथे इनमीन ६०० मिलिमीटर पाऊस झाला. ताम्हिणी, भीरा, कोयना, डोंगरवाडी या घाटातील ठिकाणीसुद्धा पावसाने अजून ६०० मिलिमीटरचा टप्पा गाठलेला नाही. घाटातील अपुऱ्या पावसाचाच परिणाम सध्या राज्यातील पाणीटंचाईच्या रूपात पाहायला मिळत आहे. कारण घाटावरील पावसामुळेच राज्यातील बहुतांश धरणे भरतात. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात (नाशिक जिल्ह्य़ातील गंगापूरपासून कोल्हापूरमधील राधानगरीपर्यंत) सर्वच धरणे घाटातील पावसामुळे भरतात. मुंबईसाठीच्या वैतरणा, अपर वैतरणा यांच्यासाठीसुद्धा हाच पाऊस उपयुक्त ठरतो. याशिवाय पुणे जिल्ह्य़ातील उजनी, मराठवाडय़ातील जायकवाडी अशी मोठी धरणे भरण्यासही घाटावरील पाऊसच कारण ठरते. घाटात वरच्या बाजूला असलेल्या धरणांमधून सोडलेले पाणीच या धरणांना मिळते. त्यामुळे विदर्भ वगळता मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातील बहुतांश धरणे भरणार का, हे घाटातील पावसावरच ठरते. या वर्षी आतापर्यंत राज्यातील धरणांमध्ये केवळ ७ टक्के उपयुक्त साठा आहे. या वर्षी घाटावरच पावसाचे प्रमाण कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
हवामानातील हे वेगळेपण हवामानतज्ज्ञांनीसुद्धा नोंदवले आहे. कोकणात पाऊस असला तरी तो घाटमाथ्यापर्यंत पुढे सरकलेला नाही. घाटात एक-दोन दिवसच मोठा पाऊस झाला आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही. त्यामुळे अरबी समुद्रातील वारे कोकण ओलांडून घाटमाथ्यापर्यंत पोहोचले तरी त्यांना पुरेसा जोर नाही. त्यामुळे घाटावर पावसाचे प्रमाण कमी असल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुंबईतील उपमहानिरीक्षक डॉ. आर. व्ही. शर्मा यांच्या मते, अरबी समुद्रावरून येणाऱ्या वारे पश्चिमेकडून किंवा नैऋत्य दिशेने येणारे असतील, तर घाटावर चांगला पाऊस होतो. या वेळी मात्र हे वारे दक्षिणेकडून येत आहेत. ते घाटांना समांतर वाहात असल्याने पावसाचे प्रमाणही कमी आहे.