Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी
प्रकृती स्थिर
मुंबई, ७ जुलै/प्रतिनिधी

 

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सोमवारी लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज दुपारी तातडीने अँजीओप्लास्टी करण्यात आली. ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन-तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, असे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉ. जलील परकार यांनी अन्य डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास बाळासाहेबांची प्रथम अँजीओग्राफी करण्यात आली. या चाचणीत त्यांच्या ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये तीन ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत हे स्पष्ट झाले. ठाकरे यांच्यावर १३ वर्षांपूर्वी स्व. डॉ. नितू मांडके यांनी बायपास शस्त्रक्रिया केली होती. या ठिकाणीही अडथळा निर्माण झाला होता. हे अडथळे दूर करण्याचा निर्णय डॉ. मॅथ्यू, डॉ. परकार आणि अन्य डॉक्टरांनी घेतला.
आज सकाळी बाळासाहेबांची प्रकृती काहीशी चिंताजनक होती. भारतातील अँजीओप्लास्टीचे जनक डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांच्याकडून ठाकरे यांच्यावर तातडीने अँजीओप्लास्टी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान अँजीओप्लास्टी पार पडली. यावेळी डॉ. परकार यांच्याबरोबरच डॉ. जमशेद दलाल, डॉ. भट्टाचार्य, डॉ. अजित मेनन हे डॉक्टरांचे पथक हजर होते. अँजीओप्लास्टीनंतर ठाकरे यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील दोन ते तीन दिवसांनंतर ठाकरे यांना घरी पाठविण्यात येईल, असे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनाकरिता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे गेले होते. अचानक बाळासाहेबांची प्रकृती खराब झाल्याने उद्धव तातडीने भारतात परत आले. उद्धव यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर डॉ. परकार यांनी बाळासाहेबांची अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.
हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाकरे यांच्यावर उपचार करणारे परकार हे मुस्लिम असून अँजीओप्लास्टी करणारे मॅथ्यू ख्रिश्चन आहेत, हा योगायोग आहे.