Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सहकाराचा ‘गड’ सर करण्यासाठी मुंडे-गडकरी यांच्यात संघर्ष!
संदीप प्रधान
मुंबई, ७ जुलै

 

भाजपचे विदर्भातील नेते नितीन गडकरी यांचा सहकार क्षेत्रातील ‘गड’ सर करण्याचा प्रयत्न त्याच पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. ‘आपण ही ढवळाढवळ सहन करणार नाही’, असा इशारा गडकरी यांनी दिला असल्याने भाजप पक्षांतर्गत संघर्ष सहकारातही सुरू झाल्याचे दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याकरिता गोपीनाथ मुंडे यांच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने आणि नितीन गडकरी यांच्या पूर्ती सहकारी साखर कारखान्याने निविदा दाखल केल्या असून मुंडे यांची निविदा अधिक दराची आहे. मात्र हा कारखाना मुंडे यांच्याकडे जाऊ नये याकरिता गडकरी मैदानात उतरले आहेत.
महात्मा सहकारी साखर कारखाना २००५ मध्ये बंद पडला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे १४ कोटी रुपयांचे कर्ज कारखान्यावर झाले. भाजपच्या वध्र्यातील कार्यकर्त्यां किरण महल्ले यांचे पॅनेल २००६ मध्ये कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झाले. मात्र आपण हा कारखाना चालवू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची विनंती करण्याकरिता महल्ले यांनी २००७ मध्ये गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी या दोघांचीही भेट घेतली. माजी सनदी अधिकारी दिनकरराव तथा डी. एच. देशमुख यांनी १९८७ साली हा कारखाना स्थापन केला होता. महल्ले यांच्या विनंतीला मुंडे यांनी प्रारंभापासून प्रतिसाद दिला. महात्मा कारखान्याच्या परिसरात एक हजार एकरावर लागणारा ऊस सध्या हा कारखाना बंद असल्याने गडकरी यांच्या पूर्ती कारखान्यात जात आहे. गडकरी यांनी हा कारखाना खरेदी केला तरी ते तो चालवतील, असे महात्माशी संबंधित कुणालाही वाटत नाही. त्यामुळे मराठवाडय़ातील गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना खरेदी केला तर तो पुन्हा सुरू होईल व महल्ले यांच्या वडिलांचे स्वप्न भंगणार नाही, असे अनेकांना वाटते. राज्य सहकारी बँकेने मालमत्ता विक्रीचा निर्णय घेतला. त्यानुसार १६ जून रोजी निविदापूर्व बैठक झाली. त्यामध्ये गडकरी यांच्या निकटवर्तीयांच्या नेतृत्वाखाली काही संचालकांनी मालमत्ता विक्रीच्या प्रस्तावाला विरोध केला. मात्र कारखाना खरेदीकरिता ज्या चार निविदा दाखल झाल्या आहेत त्यामध्ये वैजनाथ, पूर्ती, खंडेलवाल, संभाजी पवार यांच्या कारखान्यांचा समावेश होता. १७ जून रोजी बँकेने पुन्हा ऑफर मागितल्या तेव्हा मुंडे यांच्या वैजनाथने ११ कोटी रुपयांची ऑफर दिली तर गडकरी यांची निविदा १० कोटी ११ लाखांची होती. गडकरींनी वाढीव ऑफर दिली नाही. नांदेडमधील संभाजी पवार यांनी ११ कोटी ४० लाख रुपयांची ऑफर दिली. मुंडे व पवार यांनी गडकरींच्या पूर्तीला मागे टाकण्याकरिता हातमिळवणी केली होती.