Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

वेतन थकल्याने कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी

महापालिका कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासंदर्भात कर्मचारी युनियन आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जकातीतील चोऱ्यांमुळेच मनपावर अशी बिकट आर्थिक परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप युनियनबरोबरच माजी महापौर संदीप कोतकर व भाजपचे नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी आयुक्त कल्याण केळकर यांना निवेदन देऊन केला.

चोरटय़ांच्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू
बुरूडगाव रस्त्यावरील समर्थनगरमध्ये चोरांचा धुडगूस
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी
बुरूडगाव रस्त्यावरील समर्थनगरमध्ये राहणारी वृद्धा चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत ठार झाली. वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांसह ३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरांनी लांबविला. या परिसरात एकाच रात्रीत ३-४ घरफोडय़ा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीगोंदे तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी
कर्जत तालुक्यात दमदार पाऊस
श्रीगोंदे, ७ जुलै/वार्ताहर
शहरासह तालुक्यातील बहुतेक भागात दोन दिवसांत चांगला पाऊस झाला. काल मांडवगण परिसरात विक्रमी ६० मिलिमीटर पाऊस झाला. तरडगव्हाण येथील एक पूल पावसात वाहून गेला.तालुक्यातील बहुतेक भागात पाणी व चारटंचाई जाणवू लागली असतानाच दोन दिवसांत पावसाने नुसती हजेरीच लावली नाही, तर काही भागात दमदार तर मांडवगण परिसरात मुसळधार पाऊस झाला.

रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे थोरात, विखे, कोल्हेंवर आरोप
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी

रामदास आठवले यांच्या पराभवाला कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, तसेच बाळासाहेब विखे, शंकरराव कोल्हे जबाबदार असल्याचा थेट आरोप करून त्याचा वचपा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या बैठकीत आज करण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी सरकारी विश्रामगृहावर जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठवले यांचा पराभव झाल्याची कारणे व नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत मते जाणून घेतली. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी न करता पराभवाचा वचपा काढावा, असे मत व्यक्त केले.

शिर्डीत साईनामाचा जयघोष
साईबाबांना ११ लाखांचा सोन्याचा हार
राहाता, ७ जुलै/वार्ताहर
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वतीने तीन दिवस आयोजिलेल्या गुरूपौर्णिमा उत्सवाच्या आजच्या मुख्य दिवशी दोन लाखांहून अधिक भक्तांनी साईनामाचा जयघोष करीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुणे येथील झेड.एफ. स्टेअरिंग गिअर कंपनीचे कार्यकारी संचालक उत्कर्ष मुनोत व परिवाराने ११ लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला.
जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे व राजश्री ससाणे यांनी साईबाबांच्या समाधीची पाद्यपूजा केली.

कर्जतला भरपावसात राष्ट्रवादीचा मेळावा
कर्जत, ७ जुलै/वार्ताहर

जनतेच्या छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते प्राधान्याने सोडवा, असे कार्यकर्त्यांना बजावतानाच कर्जत शहराचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज भरपावसात झाला. सुमारे दीड तास मेळावा चालला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून व्यासपीठावरील मान्यवरही डोक्यावर छत्र्या घेऊन उभे राहिले.

टँकरप्रश्नी जि. प. अध्यक्षांसह सदस्यांचे उपोषण
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी

नगर तालुक्यात टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, इंधन बिले वेळेत अदा न करणाऱ्या सहायक लेखाधिकाऱ्याचा पदभार काढून घेतला जाईल, तसेच पं. स. कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर सुरू केलेले उपोषण रात्री मागे घेतले.
नादुरुस्त टँकर व थकित इंधन बिलांमुळे नगर तालुक्यातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होतो. सध्या १४ गावे व १२ वाडय़ांना टँकर सुरू आहे. गेल्या ८ दिवसांपासून थकित बिलांमुळे पंपचालकांनी इंधन देण्यास दिलेल्या नकारामुळे पुरवठा विस्कळित झाला.

छायाचित्र ओळखपत्रात नगर शहर सर्वात मागे
मनपाचे १५६ कर्मचारी करतात काय?
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी
छायाचित्र मतदारयादी व छायाचित्र ओळखपत्र या कामासाठी महापालिकेचे तब्बल १५६ कर्मचारी वापरत असूनही जिल्हा निवडणूक शाखेला नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे छायाचित्र मतदारयादीचे काम पुढे नेण्यात अपयशच येत आहे. दीडशेपेक्षा अधिक कर्मचारी नेल्याने मनपाचे काम अडचणीत आल्याची मनपा प्रशासनाची तक्रार आहे, तर मनपाने दिलेले कर्मचारी योग्य पद्धतीने काम करीत नसल्यानेच नगर शहर या कामात मागे पडले असल्याचे नगर तहसील कार्यालयाचे म्हणणे आहे.

दरोडय़ाच्या तयारीत असलेली पुण्यातील टोळी केडगावमध्ये पकडली
गावठी पिस्तूल, तलवारी जप्त
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी
दरोडा घालण्यासाठी आलेल्या पुण्यातील ६जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडील इंडिका मोटार, गावठी पिस्तूल, दोन तलवारी, लोखंडी गज व मिरचीची भुकटी जप्त करण्यात आली. काल (सोमवारी) संध्याकाळी केडगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या सहाजणांना न्यायालयाने दि. १३पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

जामखेड, श्रीगोंदे व अकोल्यातील एकही गाव तंटामुक्त नाही!
जिल्हा मूल्यमापनात ७३ पैकी ३२ गावे नापास
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्य़ातील ७३ पैकी ३२ गावे जिल्हा मूल्यमापन परिक्षणात नापास झाली. जिल्हा मूल्यमापन समितीने १० ते २५ जूनदरम्यान केलेल्या परिक्षणात ४१ गावे पात्र ठरली. जिल्ह्य़ातील १४ तालुक्यांतील १४ समित्यांनी ही पाहणी केली. या समितीमध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सरकारी वकील, पंचायत समितीचे सभापती व एक पत्रकार यांचा समावेश असतो. एका तालुक्यातील समितीने दुसऱ्या तालुक्यात जाऊन हे परीक्षण करावयाचे असते.

भूखंड व जागा खरेदी-विक्रीसाठी पालिकेच्या ‘एनओसी’ची सक्ती!
श्रीरामपूरमधील व्यवहारांवर परिणाम
श्रीरामपूर, ७ जुलै/प्रतिनिधी
शहरातील भूखंड व जागांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ना हरकत प्रमाणपत्र असल्याखेरीज क रू नये, असे पत्र पालिकेने दुय्यम निबंधकांना दिले आहे. पालिकेच्या बेकायदेशीर पत्राची दखल निबंधकांनी घेतल्याने खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. भूखंड व जागामालकांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हस्तक्षेप करणारी श्रीरामपूर पालिका ही राज्यात पहिलीच ठरली आहे! राज्यात हा प्रयोग राबविला गेला तर नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

कोल्हार-भगवतीपूरचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले
विश्वस्त नेमणुकीचा वाद
कोल्हार, ७ जुलै/वार्ताहर
कोल्हार-भगवतीपूर देवस्थानच्या प्रशासकीय मंडळाची निवड तातडीने रद्द व्हावी व नवीन विश्वस्त मंडळ ग्रामसभेतून निवडावे, तसेच शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सहायक धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकून देवस्थानमध्ये राजकारण आणले, त्याची त्वरित चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हार बुद्रुकचे सरपंच सुरेंद्र खर्डे यांनी आज शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

मानवी हक्क अभियानचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
नगर, ७ जुलै/प्रतिनिधी

मानवी हक्क अभियानच्या जिल्हा शाखेने जिल्ह्य़ातील दलित, आदिवासी, भटके-विमुक्त यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, तसेच अंतोष गायकवाड, सुनीता पोटे, नंदाताई साळवे, नतीशा भोसले, सुभाष शिंदे, राजेंद्र राक्षे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. सरकारी जमिनींवरील भटक्या-विमुक्त समाजाचा गेली अनेक वर्षे असलेला रहिवास अतिक्रमण न समजता कायम करण्यात यावा या व अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

राहाता ते शिर्डी पायी पालखी सोहळ्यात साईभक्त सहभागी
राहाता, ७ जुलै/वार्ताहर
आज गुरुपौणिमेनिमित्त राहाता ते शिर्डी साई पायी पालखी काढण्यात आली. शहरातील हजारो भाविक या पालखीत सहभागी झाले होते. शिर्डी-पंढरपूर वारीसाठी तयार केलेला साई पालखी रथ यावर्षी प्रथमच या सोहळ्यात सहभागी झाला होता.काही काळ साईबाबा विश्रांतीसाठी शहरातील वीरभद्र मंदिरासमोरील जागेत येऊन बसत. त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी शिवगर्जना मित्रमंडळ राहाता ते शिर्डी पायी पालखी सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करतात. गेल्या सहा वर्षांपासून हा सोहळा सुरू आहे. पालखीचे शहरात तसेच साकुरी, गोदावरी वसाहत व शिर्डीत स्वागत केले गेले.गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायण कार्ले, उपनगराध्यक्ष गंगाधर बनकर, संजय पिपाडा, माजी उपनगराध्यक्ष अनिल टाक यांच्या हस्ते पालखीची पूजा केली गेली. ग्रामदैवत वीरभद्रमहाराज मंदिरासमोरून पालखीने शिर्डीकडे प्रस्थान ठेवले. शहरातील हजारो साईभक्तांनी साईनामाचा गजर केला.

श्रीरामपूर- शिर्डी पायी पालखीचे प्रस्थान
श्रीरामपूर, ७ जुलै/प्रतिनिधी
गुरूपौर्णिमेनिमित्त श्रीरामपूर ते शिर्डी पायी पालखीत मोठय़ा संख्येने भाविक सहभागी झाले. पालखीचे हे सातवे वर्ष आहे. बेलापूर रस्त्यावरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून पालखी सुरू झाली. पोलीस निरीक्षक शंकरराव जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी नारायण डावखर, इंदूताई डावखर, नाना पाटील, काशीबाई डावखर, अशोक जगधने उपस्थित होते. पालखी मिरवणुकीत मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजीत पाटील, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे, अशोक मोरगे, भगवान सोनवणे, दिनेश वाघ, कैलास भागवत, प्रदीप जाधव आदी सहभागी झाले होते. हरिश्चंद्र घावटे, शरदराव राजवाळ, अण्णासाहेब दौंड, खपकेमहाराज आदी भजनी मंडळांनीही सहभाग घेतला. वाकडी येथे पालखीचे सरपंच संपतराव लहारे व गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष नारायण कार्ले, शिवाजी लहारे यांनी स्वागत केले.