Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

तासभराच्या पावसाने नागपूरकरांची त्रेधा
* अनेक वस्त्यांमध्ये पाणी
* उत्तर नागपूरला फटका
* तीन झाडे पडली, पूलही खचला * महापालिकेचे नियोजन फोल
नागपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी

नागपूर शहराला आज सुमारे तासभर मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. मान्सून सुरू झाल्यानंतर हा पहिलाच जोरदार पाऊस होता. तासभरातच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेने पावसाळ्याची अजिबात पूर्वतयारी केली नसल्याचे उघड झाले. अनेक ठिकाणी गुडघाभर साचलेल्या पाण्याने नागरिकांचे आणि वाहनचालकांचे बेसुमार हाल झाले.उत्तर नागपूरसह इतरही भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले.

राजभवन परिसर स्फोटांनी हादरला
*इतवारीतील व्यापाऱ्याच्या घरावर बॉम्ब फेकण्याची सुपारी
* हे तर डुक्कर मारण्याचे बॉम्ब; जखमी आरोपींचा खुलासा
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
राज भवन या शहरातील अतिमहत्वाच्या वास्तूच्या पश्चिमेकडील रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीनंतर डुक्कर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोघे जखमी झाले. दोन्ही जखमींना इतवारीतील एका घरावर बॉम्ब फेकण्याची सुपारी देण्यात आली होती, असे पोलिसांनी दुपारी सांगितले. सुनील सदाशिव सोनावणे व नीलेश रमेश तायडे (दोघेही रा. नागपूर) हे दोघे एमएच ३१ डीबी ८४५१ क्रमांकाच्या हिरो होंडाने सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास जुना काटोल नाका चौकाकडून सेमिनरी हिल्सकडे वेगात जातहोते.

आजपासून अकरावीचे प्रवेश
९० टक्के मिळवूनही चिंता कायम

नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत उद्यापासून अकरावी प्रवेशाला सुरुवात होत असून ९० टक्क्यांच्यावर गुण मिळवूनही पालक आणि विद्यार्थी मात्र, चिंतातूर आहेत. एककाळ असा होता की ७५ टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोण म्हणून कौतुक व्हायचे आता मात्र, ९० टक्क्यांच्या वर गुण घेऊनही पालक आणि विद्यार्थ्यांवर अकरावी प्रवेशाची टांगती तलवार उभीच आहे. पूर्वी पर्सेटाईल, ९०:१०, स्पोर्ट कोटा, एन्ट्रन्स वगैरे प्रकारच अस्तित्वात नव्हते. येईल त्याला प्रवेश सहज मिळायचा.

ले-आऊट प्लॅन १५ दिवसात देण्याचे निर्देश
कामगार कॉलनी, तुकडोजीनगर झोपडपट्टी
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

कामगार कॉलनी आणि तुकडोजीनगर झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत येत्या १५ दिवसात ‘लेआऊट प्लॅन’ सादर करण्याचे निर्देश विधानसभा विनंती अर्ज समितीने आज महापालिकेला दिले. विधानसभेचे उपाध्यक्ष व समितीचे अध्यक्ष प्रमोद शेंडे यांनी सदस्य गणपतराव देशमुख आणि विश्वास नांदेकर यांच्यासह दोन्ही ठिकाणी भेट दिली. यानंतर विधानभवनात रहिवासी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ११ रहिवाशांनी आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून समितीकडे अर्ज केला होता. समितीने मुंबईत ३० जूनला अर्जदारांचे निवेदन नोंदवून घेतले होते.

बावनथडी व सोंडय़ा टोला सिंचन प्रकल्प मार्गी
प्रभाकर वाडीभस्मे

तांदळाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मधुकर कुकडे गेल्या १५ वषार्ंपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. तुमसर विधानसभा मतदारसंघ सिंचनाच्या सोयीपासून वंचित असला तरी उत्कृष्ट तांदळासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण तालुका शेती उद्योगावर अवलंबून आहे. तालुक्यातील बिडी उद्योग उद्योजकांनी परप्रश्नंतात हलवला आणि घराघरातील रोजगार दारिद्रय़ाला कारणीभूत ठरला. आमदार मधुकर कुकडे पाहिजे तेव्हा मदतीला धावतात.

विदर्भात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र
* गटविकास अधिकारी, बालविकास अधिकाऱ्यांचा समावेश
* बदली रद्द करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

विदर्भातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांचा समावेश आहे.
राज्य शासनाने २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात नागपूरचे अतिरिक्त जिल्हधिकारी धिरजकुमार व वनामतीचे श्याम तागडे यांची बदली झाली होती. तत्पूर्वी ३० जूनला विदर्भातील सात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

‘रिअ‍ॅलिटी’मुळे गीत सादरीकरणाची कला उमगली
सारेगमपच्या महाअंतिम फेरीतील कलाकारांची प्रश्नंजळ कबुली
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
व्यावसायिक कलाकार म्हणून आजपर्यंत अनेक कार्यक्रमात वेगवेगळी गीते सादर केली. रसिकांनी त्यांना चांगला प्रतिसादही दिला पण, सारेगमप रिअ‍ॅलिटी शोमुळे एकंदरीत सादरीकरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलल्याचे तसेच त्यातील खाचखळगे कळल्याचे मत झी टीव्हीवरील महाराष्ट्राचा महागायक सारेगमप या महाअंतिमफेरीतील कलाकार ऋषिकेश रानडे, मधुरा दातार व अमृता नातू या गायकांनी व्यक्त केले.

रेल्वे भरती धोरणाचा आढावा; मंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत
झोनल कार्यालय व भरती बोर्डाची वैदर्भीयांची मागणी
नागपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी
रेल्वे भरती धोरणाचा रेल्वेमंत्र्यांकडून आढावा घेतला जाणार असल्याने महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या असून या भागातील खासदारांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून झोनल कार्यालय आणि रेल्वे भरती बोर्डाची मागणी करावी, असा राग येथील जनतेने आळवला आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली की, रेल्वे भरती प्रक्रियेबाबत बऱ्याच तक्रारी आल्या आहेत.

जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्याकार्यालय दुरुस्तीसाठी १० कोटी
विदर्भाच्या वाटय़ाला ३.६० कोटी

नागपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी

देखभाल दुरुस्ती अभावी मोडकळीस आलेले जिल्हा परिषद, पंचायत समितीची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या दुरुस्तीपोटी विदर्भाच्या वाटय़ाला ३.६० कोटी रुपये मिळाले आहेत. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती कार्यालयांची देखभाल दुरुस्ती अभावी दूरवस्था झाली आहे.

नागपूरकरांपुढे अजूनही पाणी टंचाईचे सावट
*जिल्ह्यातील सर्व जलसाठे अद्यापही कोरडेच
*पावसाअभावी समस्या गंभीर होण्याची शक्यता
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली असली, तरी पाणी टंचाईचे सावट अजूनही नागपूरकरांना भेडसावत आहे. गेल्या आठवडय़ात चांगला पाऊस झाला असला, तरी अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्य़ातील जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. उन्हाळ्यातील दोन महिन्यात नागपूर विभागातील जलसाठय़ांच्या पातळीत गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगलीच घट झाल्याने सध्या पाण्याचे गंभीर संकट भेडसावत आहे.

स्त्रियांच्या चळवळीने आंबेडकरी विचारांची कास धरण्याचे आवाहन
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

स्त्रियांची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित असावी. वेगवेगळ्या संस्था किंवा संघटना स्थापन करण्यापेक्षा स्त्रियांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन महिलांच्या समस्या सोडवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संबुद्ध महिला संघटनेच्या संयोजक छाया खोब्रागडे यांनी येथे केले. सोलापूर, पुणे, सांगली, बीड, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, नासिक येथील सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच आमदार निवासात पार पडली.

शाळांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व कमी होता कामा नये
खासदार प्रकाश जाधव यांचा इशारा
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

हिंदी ही आमची राष्ट्रभाषा असून ती स्वीकारली असली तरी महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व कमी होता कामा नये, असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला. शिक्षण क्षेत्रात होणारा काळाबाजार आणि मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना त्याकडे अधिक लक्ष देण्यासंदर्भात प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भरकाडे, शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

कामगारांच्या हिताचा एकही निर्णय नाही
भारतीय मजदूर संघाची अर्थसंकल्पावर टीका
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
कामगार क्षेत्रासाठी अनेक आश्वासने देणाऱ्या केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कामगारांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्यामुळे केवळ आश्वासन देणारे हे सरकार असल्याचे मत भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अर्थविभाग प्रमुख वसंतराव पिंपळापुरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पाच वर्षात देशातील ६ कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची केलेली घोषणा दिशाभूल करणारी आहे.

चंडीपुराने चार बालकांचा मृत्यू;
आरोग्य विभागाची धावपळ
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

पूर्व विदर्भात आतापर्यंत चंडीपुरा मेंदूज्वराने चार बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या आजाराचे किमान २५ संशयित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गडचिरोली व भंडारा जिल्ह्य़ात या आजाराचे सर्वाधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

विदर्भात बियाणे, खतांचा काळाबाजार
चंद्रपुरात व्यापाऱ्यांची साठेबाजी
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
विदर्भात सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाल्याने खते आणि बियाणांची मागणी बाजारात एकदम वाढली आहे, याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांनी खत आणि बियाणांचा साठा करून काळ्याबाजारात त्याची विक्री सुरू केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. चंद्रपुरात कृषी विक्रेत्यांनी शहरातील नव्या इमारतीतील दुकानांचा गोदाम म्हणून वापर करून खत, बियाण्यांची मोठय़ा प्रमाणात साठेबाजी केली. जून महिन्यात पेरण्या करायच्या म्हणून शेतकऱ्यांनी त्यापूर्वी थोडय़ा प्रमाणात खत आणि बियाणांची खरेदी केली होती.

अडचणीतील शेतकऱ्याला मदतीचा हात द्या
हेमंत गडकरी यांची मागणी
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
नागपूर विभागातील सहाही जिल्ह्य़ात पावसाचे उशिरा आगमन व अनेक भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. राज्य शासनाने तात्काळ उपाययोजना करून त्यांना अडचणीतून बाहेर काढावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी केली आहे. तात्काळ उपोययोजना केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कोकणातील अनुशेष दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. तशीच बैठक गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ात आयोजित करून त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या कार्यक्रमासाठी विदर्भात न येता सिंचन प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. ट्वेंटी-२० सामन्याप्रमाणे कारभार चालवायचा आहे, असे जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री कसोटी सामन्यातील कंटाळवाण्या खेळीपेक्षाही विलंब लावताहेत, अशी टीकाही हेमंत गडकरी यांनी केली.

मॉडर्न स्कूलचा रूपम शर्मा शास्त्रीय संगीतात तिसरा
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलचा रूपम शर्मा या नववीतील विद्यार्थ्यांने सोलो व्होकल हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पुण्याचा अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक अ‍ॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही अखिल भारतीय स्तरावरची बहुभाषक संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ७ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. अरविंद मोहन या दहावीच्या विद्यार्थ्यांने मे महिन्यात झालेल्या जागतिक सांस्कृतिक जैवविविधता या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानेसुद्धा सोलो व्होकल कर्नाटकी गायकीमध्ये तिसरे पारितोषिक पटकावले होते.

१४ जुलैच्या संपावर शिक्षक संघटना ठाम
नागपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी
१४ जुलैच्या लाक्षणिक संपाचा निर्णय कायम असल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या नेतृत्वात १४ तारखेला एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. सहावा वेतन आयोग सर्व घटकांना लागू करावा, वेतनेतर अनुदान नियमित द्यावे, चिपळूणकर समितीच्या निर्णयाप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरावी इ. मागण्यांसाठी हा संप होणार आहे. नागपूर जिल्ह्य़ातील प्रश्नथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी होतील, असा निर्णय दत्तात्रय मिर्झापुरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सुळे हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, रवींद्र फडणवीस, सुभाष आष्टीकर, माधव कुकडे, राजेंद्र झाडे वगैरे उपस्थित होते.

रामकरणसिंह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

अखिल भारतीय क्षत्रीय महासभेच्या प्रदेश संमेलनात अलाहाबाद येथील लेखक रामकरणसिंह लिखित ‘क्षत्रीय वंशावली’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे खासदार संजय सिंग यांच्या हस्ते प्रकाशन झाले. शंकरनगरातील महाराणा प्रताप सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे सदस्य चंदनसिंग रोटेले, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नलिनी चंदेले यांच्यासह महासभेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंदनसिंग रोटेले यांचा जन्मदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी वक्तयांनी क्षत्रीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला महासभेचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

स्थलांतरित ऐवजदारांसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी
नागपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्थलांतरित ऐवजदार कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी नागपूर महापालिका एम्प्लॉईज युनियनने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर याच्याकडे केली आहे.महापालिकेत ऐवजदारांना दर महिन्यात फक्त २० दिवस काम दिले जाते. या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्वच्छतेच्या कामासाठी जावे लागते, तेथे जातांना या कर्मचाऱ्यांसाठी कुठलीही वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत नाही.मंगळवारी येथील ऐवजदारांना लक्ष्मीनगर, गिट्टीखदान, जयताळा, हजारीपहाड, ओकारनगर या भागात पाठवण्यात आले आहे. महापालिका स्वतच शहर बससेवा चालवत असल्याने या कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेचे प्रमुख जम्मू आनंद यांनी केली.

अल्पसंख्याकांना उद्योगासाठी साडेसहा लाखाचे कर्ज वाटप
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे सुक्ष्म पतपुरवठा कर्ज योजना, मुदत व थेट कर्ज योजनेंतर्गत अल्पसंख्याक समाजाच्या २ बचत गट व ८ वैयक्तिक लाभार्थ्यांना ६ लाख ५० हजार रुपये कर्जाच्या धनादेशाचे व १५० अल्पसंख्याक मुलींना शिलाई मशीनचे वाटप जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक विकासमंत्री अनिस अहमद होते.
या प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या उन्नती व आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्जरूपाने आर्थिक मदत करते. या कर्जाचा उपयोग त्यांनी उद्योग व्यवसायासाठीच करावा. या समाजातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना ५ कोटी रुपये खर्चातून शिलाई मशीनचे मोफत वाटपही त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक जुल्फीकार भुट्टो, सय्यदा बेगम, महामंडळाचे सहाय्यक विभागीय अधिकारी राजेश मिश्रा, शासकीय तंत्रनिकेतनचे मुख्याध्यापक मोहन चौधरी, प्रश्नचार्य अर्चना चव्हाळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रश्नचार्य अशोक रंगारी व नागरिक उपस्थित होते.

उमा भारती यांच्या पुतळ्याचे दहन
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी
भारतीय जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षा उमा भारती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उमा भारती यांच्या पुतळ्याचे सक्करदरा चौकात दहन केले. उमा भारती यांनी केलेली टीका अत्यंत चुकीची आहे. राहुल गांधी हे देशातील गरीब, बेरोजगारांचे निर्विवाद नेतृत्व करतात, हे लोकसभा निवडणुकीतील निकालावरून देशाला दाखवून दिले, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे निलेश घवघवे म्हणाले. आंदोलनात निलेश खोरगडे, सचिन देशमुख, राकेश गवळी, प्रमोद शिंगणे, पंकज चापलेस, मंगेश शांतलवार, निलेश मोहिते, चक्रधर भोयर, अनिल चौधरी, रणजित ठाकूर, हर्षल धर्माळे, संदीप चांदेकर, अंकुश भाते, डॉ. राजेस गादेवार सहभागी झाले होते.

समर्पण बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरीब मुलीच्या लग्नासाठी मदत
नागपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी

समर्पण बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवाजीनगरातील पुनम वाघमारे या युवतीच्या विवाहात वरातीसाठी भोजन सामग्री आणि वस्त्र प्रदान करण्यात आले. सर्व सामग्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक सूचक, संजय पटेल, धुनेश्वर पेढे, चंदू मानसाता, समर्पण महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रमिला गौर आणि चंद्रिकाबेन चांपानेरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. आर्थिकदृष्टय़ा मागास वाघमारे कुटुंबीयांनी पुनमच्या विवाहासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहे.

भाडेकरू दांपत्य नवजात बालकास ठेवून पळाले
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

भाडेकरू दांपत्याने घरी नवजात बालकास सोडून पळ काढला. नरसाळा मार्गावरील महालक्ष्मी नगरात सोमवारी सकाळी हे उघडकीस आले. दामोदर भोजराज दवंगळे यांच्या घरी राजू भोसले व त्याची पत्नी वीस दिवसांच्या तान्हुल्यासह एक जुलैला राहण्यास आले. काल सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तान्हुल्याचा रडण्याचा आवाज आल्याने घर मालकांनी बघितले असता तान्हुल्याशिवाय घरात कुणीच नव्हते. त्या दोघांचा शोध घेतला तरी ते घरी परत न आल्याने त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्या तान्हुल्याला मेडिकल रुग्णालयात दाखल केले आणि त्याला सोडून जाणाऱ्या राजू भोसले व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अशीच घटना लता मंगेशकर रुग्णालयातही घडली. एक महिला २ जुलैला सकाळी रुग्णालयात प्रसूत होऊन तिने बालकाला जन्म दिला. काल वार्डात पलंगावर तान्हुले रडत असल्याचे दिसल्याने नर्सने महिलेला शोधले. पण ती न आल्याने रुग्णालयातील अधीक्षकांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.